पुस्तक परिचय क्रमांक:१३५ थोरली पाती
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१३५
पुस्तकाचे नांव- थोरली पाती
लेखकाचे नांव- ग.दि.माडगूळकर
प्रकाशक-साकेत प्रकाशन , औरंगाबाद
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- तिसरी आवृत्ती २०२२
पृष्ठे संख्या–२९४
वाड़्मय प्रकार- कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--३५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१३५||पुस्तक परिचय
थोरली पाती
लेखक: ग.दि.माडगूळकर ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
खेड्यातील जगरहाटीतील व्यक्तींचे शब्दचित्र 'थोरली पाती 'या कथासंग्रहात अतिशय खुमासदार आणि मनभावन शब्दाविष्कारात महाराष्ट्राचे वाल्मिकी प्रतिभावंत सर्जनशील साहित्यिक आणि सिनेजगतातील सुप्रसिध्द कथा व गीतलेखक गदिमांनी 'शब्दचित्र' रेखाटले आहे.अतिशय सूक्ष्मपणे केलेल्या निरीक्षणातून व्यक्तिचित्र शब्दातून उमटविले आहे.वाचताना नेत्रांसमोर प्रत्यक्ष व्यक्तीचं भेटल्याचा भास होतो.इतकी ताकद लेखणीची दिसून येते.रसिक वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी साहित्यकृती आहे.
'थोरली पाती'या कथासंग्रहात लेखकांनी सहवासातील आप्तेष्ट,नातेवाईक, मित्रमंडळी आणि संस्थानिकांपैकी पंचवीस व्यक्तींची शब्द चित्रांची अतरंगी रंगावली सहज, सुंदर शैलीत रेखाटली आहे.या पुस्तकाचे संपादन व प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक पु.भा.भावे यांनी केली आहे. प्रस्तावनेत कथांचा लेखाजोखा समिक्षण पध्दतीने अचूक वेधला आहे.
सदर पुस्तक लेखक बंधू व्यंकटेश माडगूळकर यांना अर्पण केले आहे.तर मुखपृष्ठ डिझायन चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारले आहे.थोरली पाती या पुस्तकातील मला भावलेल्या कथांमधील व्यक्तिमत्त्वांचा ओळख अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वभावाने अत्यंत कनवाळू असणारा गदिमांच्या बालपणीचा सवंगडी स्नेहमित्र नेमिनाथ बलवंत उपाध्ये उर्फ 'नेम्या' याची ही चित्तरकथा आहे.मोत्याच्या दाण्यासारखे सुंदर हस्ताक्षरअसणारा गदिमांच्या लाडका नेम्या,कच्च्या कविता फेअर करून ठेवण्यात वाकबगार होता. त्यांच्या घरचे हरेक काम तो करायचा.पण सनक आलीकी न सांगता निघून जायचा. चित्रविचित्र असंबंध्द बोलायचा वागायचा.त्याची कथा 'नेम्या' ते म्हणतात की,''नेम्याचे माझे नाते वेगळे आहे.त्या नात्याला नांव नाही.दगडाला देवत्व देणारे संत आणि माणसासारखाच मातीच्या पोटी जन्मलेला दगड,यांच्यातील नात्याला नांव काय? तसेच आमचे निनावी नाते आहे."
'औंधाचा राजा' या कथेत श्रीमंत राजे भवानराव पंडित पंतप्रतिनिधी यांच्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती या कथेतून प्रकर्षाने लक्षात येते.राजे आणि गदिमा यांच्यात बालपण ते प्रौढपणात घडलेल्या सहवासाचे हितगुज अत्यंत समर्पक शब्दांत गुंफले आहे.
नाटकातील काम पाहून बक्षीस समारंभात पारितोषिक देताना ,राजे यांनी काढलेले उद्गार "हा मुलगा हास्याचे डोंगर उत्पन्न करील.बाळ तू टाकीत जा,शिकला नाहीस तरी चालेल.'' टाकी म्हणजे सिनेसृष्टी. तिथंच प्रथम अभिनय आणि गाणी लेखन करणारे गदिमा.श्रीमंत प्रजाहितदक्ष राजे पंतप्रतिनिधी यांचे सुंदर व्यक्तिचित्रण उत्तुंग राजे ऐश्र्वर्या सारखे, व्यक्तिमत्त्वासारखे शब्दालंकारात वाचायला मिळते.गदिमाही राजाश्रयाने औंधमध्ये शिक्षण घेत होते.
"दो आॅंखे बारह हाथ'या हिंदी सिनेमाची बीजकथा औंधसंस्थानात पंतप्रतिनिधी यांनी राबविलेल्या गुन्हेगारांना माणुसकीने वागविण्याचा प्रयोग माझ्याच एका मित्राच्या सांगण्यावरून बाबांनी केला होता."हेऔंधचे राजे यांचे चिरंजीव बॅरिस्टर अप्पासाहेब पंत यांनी गदिमांना पत्र लिहून कौतुक केले होते.
रामा बालिष्टर मुलखाचा बोलभांड, सतत बोलत राहण्याच्या गुणामुळे त्याला गावकऱ्यांनी 'बालिष्टरी' किताब बहाल केला होता.गोष्टींचा अनंत साठा. सांगण्याची धाटणीही कुतूहल वाढविणारी, ऐकणारा जागच्या जागी.शांतपणे कान देऊन ऐकत असत.अगदी गावातल्या बारीकसारीक घटनांची माहिती कानावर घालणारा रामा. खाश्या स्टाईलने ब्रेकिंग न्यूज प्रसारित करण्यात महावस्ताद होता. गोष्टी अगदी मिश्किलपणे कथन करायचा. ऐकणारा दु:की कष्टी होईल पण हा मातुर हसत हसत बातम्या सांगायचा.
भुईमूगाच्या शेंगा,मक्याची कणसे भाजून विकणाऱ्या भीमाची ही कथा 'गावरान शेंग'अगदी ग्राम्य बोलीत तिचे शब्दचित्र रेखाटले आहे. मोठ्याने घोगऱ्या आवाजात बोलणारी अन् हसण्याची विशिष्ट लकब आणि तोंडात सदा पुरुषी शिव्या असणारी भीमा.शेंगा विकायची पध्दत, शाळेतल्या मुलींशी बोलण्याची पध्दत आणि त्यांच्याशी घटलेल्या संवादाची झलक वाचताना आपलेही शाळेचे दिवस नजरेसमोरून जातात.आपण कथा वाचताना गुंगून जातो.अन् अचानक शाळा शिकणाऱ्या कमळीची कथा सुरू होते.तिचा लाडं लाड भीमा करते.शाळेची फी भरते.अन् तिला नटण्याच्या वस्तू आणून देते.अन् रखडलेले घरभाडेही बन्सी भाच्याकडून मिळवून देते.पण त्या बदल्यात पुढे काय द्यावे लागेल हे मात्र तिला समजत नाही. अचानकपणे कथानक समाप्त होते.
दादा गोडबोलेंची चित्रं कथा 'वसुली 'होय.गप्पा आणि गोष्टीतून सुंदर शैलीत उलगडत जाते.महादू बकू या इरसाल व्यक्तिची ओळख लक्षात राहते.दोघांची मैत्री आणि महादूचे निधन यांचे वर्णन समर्पक शब्दात खुलविले आहे.
नागूदेव हे कथापुष्प धार्मिक कर्मकांड पारंपरिक निष्ठेने पंचक्रोशीत करणाऱ्या नागू पुरोहिताचे आहे.निंबुरी गावच्या नानाचा आणि जयदेवाचा घडलेला संवाद.नानाच्या मुलामुलींच्या पुढील शिक्षण आणि मुंज या विषयीचा सहज सुंदर शब्दात खुलविला आहे.त्यांच्या कथेतून पात्रांची देहबोली,कार्य आणि स्वभाव वैशिष्टे यांची उकल होते.सुमन नागूदेवाकडे कडगावला शिक्षणासाठी राहिली होती. त्यामुळे जणू काही त्याचा संसार नव्याने सुरू झाला.त्याचे व्यंकटेशाची पूजा करायला परगावी जाणं.त्याच काळात अचानक मानस आई(नागूची पत्नी) आजारी पडते.आजारी आईवर उपचार करण्यासाठी सुमनला सरकारी दवाखान्यात जायला लागणे.त्यातून तिची मानस आई बरी होते.पण रुग्णसेवेचा निमित्ताने घडलेल्या ओळखीचा तो डॉक्टर गैरफायदा घेतो.सुमाशी संबंध येऊन ती पोटूशी राहते.तिचे खरे आईवडील कडगावला येतात.तदनंतर नागूदेवाचे आगमन झाल्यावर त्याला बायको ही बातमी देते.तर तो तिचं बाळंतपण करुन तिचे मूल संभाळतो.या कृत्याने समाज नागूदेवाला भ्रमिष्ट समजतो.सुमाचे आईवडील एका शिक्षकाचे स्थळ सुमासाठी घेऊन नागूच्या घरी येतात.पण तो मान्यता देत नाही. "औषधासाठी तोंड वेंगडणाऱ्या पोरीवर वैद्य बलात्कार करतो. आई-बाप तिच्या पोटचं पोरं ठार मारीत पाहतात तर एक तरुण त्या बाटलेल्या पोरीशी लग्न करु इच्छितो.परम संतोष. सांभाळा तुमचा समाज आणि तुम्ही. आमच्या सारख्यांना आता जागा नाही इथं."असं म्हणत नागूदेव सुसाट धावत विठ्ठलाच्या देवळात शिरतो आणि दंडवत घालून निश्चल होतो.अशी ही नागूदेवाची कथा आहे.
तुपाचा नंदादीप कथेत कोल्हापूरातील 'दामले आणि कंपनी'चे मिठाईचे दुकान आणि नोकर सदूचे जीवन रेखाटले आहे.दामलेंचा व्यावसायिकपणा,सदूची नोकरी, त्यास बक्षिसपत्राने मिळालेली संपत्ती,त्याचे लग्न आणि पत्नीचे भावाला लिहिलेलं पत्र वाचल्यावर त्याच्या पत्नीचा आणि मेहुण्याचा खोटारडेपणा कळल्यावर त्याची झालेली अवस्था आदींचे वर्णन रहस्यमय आहे.
केसुतात्यांंनी केलेल्या पापाचा घडा त्यांच्या मृत्यूसमयी डोळ्यासमोर तरळत राहतो. अन्याय अत्याचार करुन रुबाब अन् जरब निर्माण करणाऱ्या केसुतात्यांंच्या पातळयंत्री व्यक्ती रेखेची कथा 'शेवटचा दिवस गोड व्हावा'या कथेत परामर्श घेतला आहे."याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा….."
'अधांतरी'कथा लेखक आणि वैमानिक यांच्या भेटीतच घडलेली कथा रहस्यमय आणि भावस्पर्शी आहे.एखाद्या घटनेनं मन कसं अस्वस्थ होतं आणि धास्तास्वतं याची प्रचिती येते.अप्रतिम शब्दात तेथील भोजन,परिसर आणि वैमानिक यांच्या कन्येच्या बालगीताचे वर्णन केले आहे.
श्रीमंतीच्या कर्तृत्वातून गरिबी आलेल्या मोहनची आणि गरिबीतून श्रीमंत झालेल्या काशिनाथची कथा 'सिनेमातला माणूस' कथेत प्रस्तुत केली आहे.
भोळसर आणि एककल्ली स्वभावाच्या तात्यांची कथा खुमासदार शैलीत 'वेडा पारिजात 'कथेत प्रस्तुत केली आहे. भावाला दिलेल्या वचनाला जागुन स्वतःचे गावात घर असुनही शेतातल्या झोपडीत व्रतस्थ जीवन जगणारे तात्यांची कथा. रानातली पाखरं, जनावरं आणि झाडाझुडुपांवर कणव व संवेदना बाळगणारे तात्या. वडिलांनी लावलेल्या पांढऱ्या कण्हेरीच्या झाडावर आभाळासारखी माया करणारे व्यक्तिचित्र आहे.लेखकाच्या घराच्या परसदारी पारीजातकाचे झाडं लावून बागेची मशागत करणारे तात्या.
'थोरली पाती 'कथासंग्रहातील कथा माणदेशी गावगाड्यातील व्यक्ती माणुसकीचं दर्शन घडवितात.त्या कथांचे रसग्रहण करताना त्याकाळातील सांस्कृतिक आणि सामाजिक अभिसरणाची ओळख अधोरेखित होते.
ऋषीतुल्य लोकप्रिय साहित्यिक गदिमांच्या लेखणीस सादर प्रणाम!!!
आस्वादक:श्री रविंद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
सुंदर शब्दांकन👌👍
ReplyDeleteधन्यवाद पुस्तकप्रेमी
ReplyDelete