पुस्तक परिचय क्रमांक-१०२ शब्दांगण चारोळी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१०२
पुस्तकाचे नांव-शब्दांगण
कवीचे नांव-श्रीगणेश शेंडे
प्रकाशक-मराठीचे शिलेदार प्रकाशन, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती वर्ष २०२१
पृष्ठे संख्या--१००
वाड़्मय प्रकार-चारोळीसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--८०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
१०२||पुस्तक परिचय
शब्दांगण
कवी: श्रीगणेश शेंडे
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃
श्र्वास माझा
छत्रपती शिवाजी महाराज
आराध्य दैवत महाराष्ट्राचे…..
जय जिजाऊ जय शिवराय
श्र्वास माझा मनमंदिरी साचे….
श्री.श्रीगणेश शेंडे
भाव काव्यानं फुललं
मनातलं तारांगण….
शब्द शब्द गुंफलेलं
नित्य नवं शब्दांगण…..
'अंगण शब्दांचं, माझ्या मनातलं, नित्य सजलेलं…
मनातील वेधक भावभावनांचे अचूक आणि यथार्थ शब्दफुलोऱ्यात सजविण्याचे,गुंफण्याचे कार्य दिलदार आणि संवेदनशील मनाच्या कविवर्य मित्राने 'चारोळी'या तरुणाईत फेमस असलेल्या काव्यरचनेचा प्रकार 'शब्दांगण'या पुस्तकातून फुलांसारख्या चारोळ्यांचा सडा वाचायला आणि वेचायला उपलब्ध करून दिला आहे..
'दवबिंदू'
गोल पारदर्शक
रम्य दवबिंदू इवला…...
बरसूनी श्रावण
पानावरती विसावला….
'घाटमाथा'
खोल दरी पाहताना
घाटमाथा श्रावणात…..
मन झाले ओलेचिंब
निसर्गाच्या सान्निध्यात…..
निसर्गाचा उत्तम आविष्कार मनचक्षूने वेचून मनाला मोहविणाऱ्या त्या दृश्याला चारोळी त बध्द करण्याची किमया अक्षरसाजात साधली आहे.
'शब्दांगण' हा चारोळी संग्रह माझे सन्मित्र ,व्यासंगी कवी आदर्श शिक्षक श्री श्रीगणेश शेंडे यांनी लोकार्पण केलेला पहिला वहिला चारोळी संग्रह आहे.कवी श्रीगणेश शेंडे भारतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांचे नंदनवन असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील आदर्श आणि नामांकित मेटगुताड प्राथमिक शाळेत सहाध्यायी असून त्यांना नुकताच तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच आविष्कार फाऊंडेशननेही त्यांच्या शैक्षणिक कार्याचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले आहे.तसेच लॉकडाऊनच्या काळात अनेक काव्यरचनेचे समूह विस्तारले.त्यातील संयोजक काव्यप्रतिभावंतांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत कित्येकदा प्रथम क्रमांकाचे मानांकित मिळविले आहे.त्यांच्या रचना छंदबध्द आणि गेयता असणाऱ्या आहेत.दिलेल्या विशिष्ट आशयविषयाशी चाकोरीबध्द रचना करणे. हीच त्यांची खासियत आहे.त्यामुळेच विविधांगी प्रकारात त्यांनी रचना केलेल्या चारोळ्या आमच्या समूहावर वाचायला मिळतात..शेंडे सर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या तालुका अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे पार पाडत असतात. वाढदिवसानिमित्त त्यांनी जिल्ह्यातील निमंत्रित नवकवींची काव्यमैफिल आयोजित करून व्यक्ततेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.
मनोगतात त्यांची लेखणी विलक्षण संयमाने आणि आदबिने भावना व्यक्त करीत आहेत.
ते म्हणतात की,"हा चारोळी संग्रह आपणा सारख्या चोखंदळ काव्यरसिकांच्या हाती सोपविताना मला हृदयातून अत्यानंद होतआहे. निसर्ग,व्यक्तीरेखा,मौलिक क्षण आणि भावविश्वाला हळूवारपणे,तरलपणे, अलगदपणे शाब्दीक स्पर्शाने चारोळी लेखन केले आहे."
या संग्रहाचे प्रकाशन करताना मराठीचेशिलेदार समूहाचे संस्थापक राहूल पाटील दादांचे मौलिक सहकार्य लाभल्याचे आवर्जून उल्लेख करतात.
'शब्दांगण' या चारोळी संग्रहाला सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक दीपस्तंभ महाबळेश्वरचे माजी गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री.एम.के. वाशिवले साहेब यांची प्रस्तावना चैतन्याच्या चांदण्यासारखी शिंपण करणारी आहे.तसेच नवोगतांची सर्जनशीलता नव्या उन्मेशाने कशी उभारी घेत आहे. चारोळीत मनात उमटलेले मुद्रांकित झालेले भाव कागदावर उमटावेत याचं अस्खलित वर्णन केले आहे.चारोळींचा हा निर्मळ झरा अलगदपणे सळसळत मनाला स्पर्शून जाणारा आहे.ते शुभेच्छा देताना म्हणतात की,"शेंडे सर मितभाषी असून शब्दांशी बोलतात.त्यांच्याशी रमतात.अवती भोवतीचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यातून ध्वनित होणारा अर्थ जाताना त्यांची प्रतिभा शब्दोशब्दी जाणवते.ही काव्यसरिता जीवनदायिनी कृष्णेच्या शांत,शीतल आणि पवित्र धारेसारखी
अविरत प्रवाहीत राहो.."
ऋणनिर्देशात मराठी मायबोलीचा गोडवा व कौतुक उत्तम शब्दकोंदणाच्या चारोळीत गुंफलाय…
शिलेदार मी मराठीचा,उरी माझ्या हा स्वाभिमान…
जागवी शब्दांगणातूनी,ही माय मराठी महान…
सर्वच ज्ञात-अज्ञात हातांनी सहकार्य केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.ते आई, वडिल, नातेवाईक, मित्रपरिवार आणि मार्गदर्शक यांच्या ऋणाईतच राहू इच्छितात..
चारोळीच्या पहिल्या आवर्तनात पिताजींप्रती नतमस्तक होऊन 'आधारवड'चारोळीतून त्यांचा लौकिक अधोरेखित करतात.
आधारवड
सांभाळीसी साऱ्या कुटुंबाला
पडू न देई कशाचीही नड…
धन धान्य संरक्षक मदतगार
बाप हाच खरा आधारवड…..
द्वितीय चारोळी जन्मदात्री आईस
'आई तू नसताना'
स्वामी तिन्ही जगाचा भिकारी आईविना
कामात यश नाही आई तू नसताना...
आठव तुझ्या मायेच्या नित्य माझ्या मना
तुझ्याविना कुठेही मन माझे रमेना
गुरुपदेश, हर हर महादेव,उधळण, नौबती यशाच्या…, मनोहारी, खळाळता झरा,चांदवा प्रेमाचा, विश्वास एक धागा,कर्तव्य, दवबिंदू, सावर रे, डोळे तुझे, निसर्ग, योगसिध्दी मेघ दाटले,टिपूस, मनमयूरा..,थेंब,आकार,सांज प्रीतीची,पावसांगण..,शान,रानफूल,पाऊलवाटा,शिकवण आदी रचना मनाला भावतात.तर काही हृदयाचा ठाव घेऊन वेगळे स्थान अधोरेखित करतात.चार ओळीही शीर्षकाशी आशयगर्भता दाखवितात.तसेच इतरही सर्वच चारोळी रचना छंदबध्द,अक्षरबध्द,मात्रावृत्तबद्ध शब्दफुलोऱ्यात सजविलेल्या,गुंफलेल्या आहेत. प्रवाही आणि सहजसुंदर चारोळी रचना आहेत.
कवी श्रीगणेश शेंडे यांनी सुंदरशा आविष्कारात 'शब्दांगण'चारोळीने फुलविले आहे.सजगता आणि निर्मळपणा त्यांच्या चारोळीतून आनंद घेताना दृष्टीस येतो.त्यांच्या प्रयत्नास त्रिवार वंदन...आणि सातत्याने लिहिते रहायला हार्दिक शुभेच्छा!!!!
पुस्तकासाठी संपर्क
श्री.श्रीगणेश पुरुषोत्तम शेंडे
मु.पो.भुईंज ता.वाई जि.सातारा
पिन.४१५५१५
भ्रमणध्वनी-८६०५१३९१४०
परिचयक -रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक- ३० डिसेंबर २०२१
******************************************
Comments
Post a Comment