पुस्तक परिचय क्रमांक १०१रानातल्या कविता





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१०१

पुस्तकाचे नांव-रानातल्या कविता

कवीचे नांव-ना.धों.महानोर

प्रकाशक-पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तिसरे पुनर्मुद्रण २०२१

पृष्ठे संख्या--१०२

वाड़्मय प्रकार-कवितासंग्रह 

किंमत /स्वागत मूल्य--१५०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚

१०१||पुस्तक परिचय

          रानातल्या कविता

कवी:ना.धों.महानोर

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃

"ह्या शेताने लळा लाविला असा असा की,

सुखदुःखाला परस्परांशी हसलो-रडलो.

आता तर हा जीवच अवघा असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो||"


ही कवीच्या अंतरात्म्यातील मंत्राक्षरे आहेत. विख्यात लेखक, निसर्गकवी व सिनेगीतकार नारायण धोंडू महानोर यांच्या साहित्यावर वाचन साखळी 'वाचन समृद्धी' कविता लेखन स्पर्धेसाठी 'शिवाराचं अमृत'ही रचना केलेली होती. 


         शिवाराचं अमृत

मातीच्या चैतन्याचे गाणे गाऊन 

शब्दांच्या फुलांचे मळे फुलवले

शेतीमधी काबाडकष्ट करून 

शब्दफळांचे सुगंध दरवळले||


निथळ घामाची शाई करुन 

शेतीमातीची ओवी बहरली

खुरप्याची लेखणी करुन 

रानातली कविता फुलविली ||


रानशिवारातल्या कवितांचं

चित्रपटात झालं सुरेल गाणं

रसिकांच्या मनावर कोरलं

ताल बोल अन् ठेक्यानं ||


काव्यविश्वातले निसर्ग कवी

साहित्य पंढरीचे वारकरी 

शेतीचा महिमा गाणारे 

जगाचे पोशिंदे शेतकरी||


माती अन् बोली भाषेचे 

नाते सांगणारी शब्दकळा

गाणे मातीच्या चैतन्याचे

गाऊन डवरतो फुलमळा||


स्पर्श गंध ध्वनींचा मिलाफ

रान काव्याच्या प्रांगणात

लोककथांचे व्यक्तीचित्रण 

शब्दझुल्यांच्या अंगणात||


'रानातल्या कवितां'चं झालं काव्य 

 निसर्गाच्या सौंदर्याचं गाणं झालं

 सूरताल लय बोल अन् ठेक्यानं 

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजलं||


वरील काव्यपंक्ती वाचन साखळी समूहाच्या काव्यरचना स्पर्धैत तयार केलेलं होतं.त्यातून त्यांच्या 'रानातल्या कवितांचा'फुलोरा गंधित करतो.या काव्यसंग्रहास राज्यशासने 'केशवसुत'पुरस्कार बहाल केलेला आहे. 


निसर्ग कवी ना.धो.महानोर यांची कर्मभूमी असलेल्या पळसखेडे येथे वास्तव्यास असताना,शेतात काम करत,रमतगमत निसर्गाचा मनचक्षुने आस्वाद घेत,अंतर्मनाचे शब्द हिरव्या पातीवर उमटत 'रानातल्या कविता’ हा काव्यसंग्रह तयार केला आहे.या संग्रहात सन १९६० ते १९६६ मधील चौसष्ट कविता आहेत. विशेष म्हणजे या कवितांना शीर्षके नाहीत. या सगळ्या कवितांत संपृक्त आशयाने भरून आलेले कविमन हे रान झालेले आहे.निसर्ग सौंदर्य,प्रेम आणि श्रृंगार या आशयातील शब्दांगणातील काव्य पुष्पे रसग्रहण करायला उद्युक्त करतात.


पहिला उद्गार स्व-हस्ताक्षरामधून आलेला आहे.एकदा का ती मर्मदृष्टीने समजून घेतली तर त्याच्या कवितेची कळ आकळते.त्यांच्या प्रतिभेचा सर्वांग स्पर्श या सर्वच कवितांना झालेला आहे.महानोरांचे आपल्याभूमीविषयीचे उत्कट ममत्व,कृषिजीवना विषयीचा जिव्हाळा, या दोहोंशी एकरूप होता होता निःसीम निष्ठेने केलेली अक्षरसाधना, त्यातून निर्माण झालेली अनोखी प्रतिमासृष्टी आणि उत्कट प्रेमानुभूतीचे विभ्रम या सर्वांच्या संयोगाने त्यांची काव्यसृष्टी  फुलून आलेली आहे. 


निसर्ग कवी ना.धो.महानोर 'रानातल्या कविता'

विषयी हितगुज करताना म्हणतात की,"माझ्या जन्माच्या काळात खेडं म्हणजे भजन कीर्तन प्रवचन नामस्मरण,सण-उत्सव,लोककला आणि लोकनृत्याने सांस्कृतिक वैभव बहरलेले होते.सूर्योदयाला जात्यावरली प्रसन्न ओवी, हलकं फुलकं संगीत आणि सुखदुःखं गाणारी जाण्याची घरघर, आणि अस्सल भाव जपणारी कविता म्हणजे ओवी होती."

"असं हे लोकसंस्कृतीचे देणं लहानपणापासून ऐकत आलो आहे. लिखित साहित्याच्या आधी हे मौखिक साहित्य अनेकांच्या ओठांवर गुणगुणत होतं.हेच साहित्य म्हणजे माझ्या काव्यरचनेचे बीज होय,"असे ते आवर्जून नमूद करतात.शेतीत अहोरात्र राबणारे खेडूत शेतकरी कामकरी. आपल्या शिवारावर आभाळमाया करणारे, निस्सीम प्रेम करणारे ,अन्नाचा घास अवघ्या जगाला देणारे पोशिंदे.

आपल्या शेतीवर बक्कळ माया करतात.हे त्यांच्या कवितांतून दिसून येते.झाडांना चैतन्य देणारे ऋतू,आणि पिकांचा गंध आसमंतात घेऊन जाणारा वारा, पीकांचे बीजांकुरण करणारी धरा, तिचं चित्रण आणि वर्णन काव्यातून मांडले आहे.अशा खेड्यातील सुखदुःखाचे गाणे काव्यातून उलगडले आहे.


अनेक रचना वाचताना त्यांतील गंधित अर्थ शब्दकळेतून फुलत जातो.मनाला भुरळ घालणाऱ्या रचना...मोहित करणाऱ्या रचना..

त्याचं गाणं गुणगुणायला लावणाऱ्या रचना आहेत.


''ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्याला चांदणे लखडून जावे."

कृषिसंस्कृतीतील समृद्धी पाहून कविमनात असीम सुखाच्या लडीमागून लडी उलगडल्या जातात.अटळ आशय मग अभिव्यक्त होतो.

प्रतिकांमधून गेयता आणि आशयगर्भता संचित करणारी मी रचना...जगाला अन्नाचा घास देणाऱ्या वसुंधरेची आणि शेती पिकविणारा जगाच्या पोशिंदा यांचं गौरव करणारी रचना.


कवितासंग्रहात श्रीमती विजया राजाध्यक्ष यांनी त्यांच्या रचनेचा मतितार्थ इतर प्रतिभासंपन्न साहित्यिक आणि कवी यांच्या रचनेशी भाव फुलवून दाखविला आहे.विश्लेषण आणि विवेचन बहारदार आणि प्रवाही शैलीत मांडले आहे. तेही वाचताना आपणाला ना.धो.महानोरांच्या कवितांची ओळख उठावदारपणे होते.

     गुंतले प्रयाण हत्या रानात माझे

फाटकी ही झोपडी काळीज माझे

      मी असा आनंदुनी बेहोष होता

शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे….

या कवितांवर समिक्षणात्मक लेख'सत्यकथेत'

श्रीमती विजया राजाध्यक्ष यांनी लिहिले आहेत.

अनेक साहित्यिकांनी पळसखेडे ला भेट दिली आहे.तोच गोतावळा मला जगभर लाभला असा उल्लेख आवर्जून महानोर करतात.

जुन्या आठवणींचा सुंदर झोका मन तजेलदार करत राहतो.अशा हा 'रानातल्या कविता'संग्रह आहे.

सिनेजगतात गाजलेली प्रेम गीतं आपल्या मनाला तजेला देतात...


**घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती

पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती


घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती

डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती


घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले

आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला….


*मी रात टाकली, मी कात टाकली

मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली


हिरव्या पानांत, हिरव्या पानांत चावंळ चावंळ चालती

भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती


ह्या पंखावरती, मी नभ पांघरती

मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती


अंगात माझिया भिनलाय ढोलिया

मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली

मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली


ओठांवर गुणगुणत राहणाऱ्या श्रवणीय आणि आशयघन बहारदार वर्णन असणारी लिरीक्स .अशा अवीट गाण्यांचे गीतकार निसर्गकवी यांच्या काव्यप्रतिभेस त्रिवार मानाचा मुजरा!!!


परिचयक श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे 

लेखन दिनांक- २६ डिसेंबर २०२१


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड