पुस्तक परिचय क्रमांक:२८२ क्रिकेटर्स मनातले
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२८२
पुस्तकाचे नांव-क्रिकेटर्स मनातले
लेखक: द्वारकानाथ संझगिरी
प्रकाशन-सुरेश एजन्सी, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२४
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–२५६
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-३४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२८२ ||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -क्रिकेटर्स मनातले
लेखक: द्वारकानाथ संझगिरी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला ज्यांच्या अत्युत्तम खेळीने सुवर्ण झळाळी लाभली.
त्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या कार्यकर्तृत्वाचा उंचावणारा आलेख म्हणजे ‘क्रिकेटर्स मनातले’.
हल्ली तेच क्रिकेट भारतीय क्रिडा रसिक प्रेक्षकांच्या हदयसिंहासनी विराजमान झाले आहे.त्या महान क्रिकेटपटूंच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यातील,रणजी सामन्यातील आणि काउंटी सामन्यातील
संस्मरणीय खेळीची ओळख ‘क्रिकेटर्स मनातले’या पुस्तकाचे लेखन लोकप्रिय
स्तंभलेखक, चतुरस्त्र लेखक आणि क्रिडा समिक्षक क्रिकेटच्या विश्वासातील संदर्भ आपल्या लेखणीतून बोलके करणारे द्वारकानाथ संझगिरी यांनी केले आहे.
अफाट कर्तृत्व असणारे लेखक खेळ चित्रपट संगीत आणि भटकंतीवरही त्यांनी साहित्य लेखन केले आहे.
द्वारकानाथ संझगिरी यांची लेखनशैली सहज, सुंदर ,ओघवती, विनोदी आणि वाचकांना खिळवून ठेवणारी आहे.जणु काही क्रिकेट विश्वातील लेखांचे माहेरघर असणाऱ्या ‘षटकार’सप्ताहिक वाचण्याची आठवण हे पुस्तक वाचताना आली. तसेच क्रिकेटमधील तांत्रिक बाबी सामान्य वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्यात त्यांचा हातखंडा होता.ते लिहितात खुसखुशीत आणि बोलतात सुध्दा खुशखुशीत.जणू काही एखाद्या सामान्यात फलंदाज चौकार- षटकारांची आतषबाजी करत आहे.त्यावेळी सगळे प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात दाद देतात.असं त्यांचं ‘संझगिरी’शैलीत लेखन आहे.असा उल्लेख संजीव पाध्ये यांनी केलाय.
रणजितसिंहजी यांच्या पासून अनेक नवरत्नांनी भारतात क्रिकेट समृद्ध केलं. त्या निवडक हिरे माणिक मोत्यांचा परिचय करून दिला आहे.त्याच बरोबर त्यांचे धम्माल किस्से,आठवणी,संस्मरणीय खेळी, आकडेवारी,बालपण,क्रिकेटचा सराव आणि स्वभावगुण यांची रंजक माहिती दिली आहे.तसेच त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आणि संस्मरणीय खेळीतील वैशिष्ट्ये अधोरेखित केली आहेत.अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि विवेचन करत हरेक क्रिकेटपटू सर्वश्रेष्ठ कसा आहे ते पटवून दिले आहे.
क्रिकेट विश्वातील सामन्यात गौरवास्पद फलंदाजी करणारे विजय मर्चंट,गुंडाप्पा विश्वनाथ आणि अजित वाडेकर यांचे आकर्षक मुखपृष्ठ तर मलपृष्ठावरील लेखक संजीव पाध्ये यांचा ‘ब्लर्ब’ पुस्तकातील आशयाचे समर्पक शब्दात वर्णन करत आहे.क्रिकेटच्या सामन्यातील बॅट,बॉल आणि त्रिफळासह बेल्स सामन्यातील क्रिकेटपटूंची संस्मरणीय खेळीचे प्रतिक दर्शवितात.
मनोगतात स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी आवर्जून उल्लेखितात की, “भारतीय क्रिकेटचे भलं केलेल्या खेळाडूंची युट्यूबवर मालिका केली होती.तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.आज जरी मोबाईलवर क्रिकेटची सगळी माहिती उपलब्ध असली तरी, वाचक रसिकांना व प्रेक्षकांना अजूनही पुस्तकांचे गारुड कायम आहे.म्हणून त्याच मालिकेतील निवडक हिरेमाणिकमोती घेऊन ‘क्रिकेटर्स मनातले’हे पुस्तक प्रकाशित केले.”
आपल्या या महान क्रिकेटपटूंनी आपल्या कलाकौशल्याने, धाडसाने,जिद्द व चिकाटीने गुणवत्ता सिद्ध करून भारतीय क्रिकेट समृद्ध केलं.अश्या प्रतिभाशाली खेळाडूंचा वेध घेतला आहे.
या पुस्तकामुळे खेळाडूंच्या कामगिरीची ओळख होतेच.त्यापेक्षा खेळातील नियम आणि कसोटी सामन्यातील यशस्वी कामगिरीची माहिती समजते.त्यामुळे क्रिकेटचा इतिहास अजरामर करणाऱ्या महान क्रिकेटपटूंची महती समजते.तीच महती उपमा आणि चपखल अलंकारिक भाषेचा गरजेप्रमाणे वापर करुन लेख चितारले आहेत.खमंग आणि खुसखुशीत लेखांची चवदार थाळी बनवली आहे.तिचा आस्वाद रसिक वाचक निश्चितच घेतील.इतकं सुंदर लेखन केले आहे.
रणजितसिंहजी,सी.के.नायडू,लाला अमरनाथ,विजय मर्चंट,सैयद मुश्ताक अली,विनू मंकड,विजय हजारे,पॉली उम्रीगर,विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते, बापू नाडकर्णी,चंदु बोर्डे, रमाकांत देसाई, सलीम दुराणी, टायगर पतौडी,फारुख इंजिनिअर,इरापल्ली प्रसन्ना, दिलीप सरदेसाई, वसंत रांजणे, बी.एस.चंद्रशेखर, वेंकटराघवन, अजित वाडेकर,बिशनसिंग बेदी, एकनाथ सोलकर,गुंडाप्पा विश्वनाथ, अंशुमन गायकवाड,करसन घावरी,सैयद किरमाणी अशा नवरत्नांची लेख मालिका आहे.अष्टपैलूत्व सिध्द केलेल्या महान क्रिकेटपटूंची गाथा.सगळेच महान खेळाडू आहेत.कारण भारताला कसोटी सामना जिंकून देण्यासाठी त्यांनी केलेली खेळी कर्तृत्ववान आहे.खेळाचे सौंदर्य दाखवणारे आहे.नशिबवान प्रेक्षक ज्यांनी या खेळाडूंना सामना खेळताना प्रत्यक्ष मैदानावर बघितलं…… जबरदस्त गोलंदाजी करत अचानक पुढील चेंडूवर फलंदाजाला त्रिफळाचित करणारे गोलंदाज,शांतचित्ताने चेंडूचा अचूक टप्पा ओळखून मिडॉन, मिडऑफ व स्ट्रेटला ड्राइव्ह करून चौकार षटकारांची आतषबाजी करत फटकेबाजीने अर्धशतकी, शतकी खेळी करणारे फलंदाज, फलंदाजांच्या बॅट न लागता विकेट वरील चेंडू चपळाईने धरणारे पकडणारे यष्टिरक्षक आणि चित्याच्या चपळाईने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत झेल घेणारे क्षेत्ररक्षक तर गोलंदाज असून संघाचा धावफलक हलता ठेवण्यासाठी फलंदाजी करणारे खेळाडू.
भारतीय क्रिकेट विश्वातील गौरवास्पद अभिमानास्पद कामगिरी केलेल्या खेळांडूंचे क्रिकेट खेळाचे सिक्रेट एका सुंदर पुस्तकातून रसग्रहण करायला वाचकांना आवडेल असं सुंदर पुस्तक क्रिडा समिक्षक द्वारकानाथ संझगिरी लिखित, ‘क्रिकेटर्स मनातले’...
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ३जून २०२६

Comments
Post a Comment