पुस्तक परिचय क्रमांक:२०५ येते जगाया उभारी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२०५
पुस्तकाचे नांव-येते जगाया उभारी
लेखक: सचिन बेंडभर
प्रकाशन-यशोधन पब्लिकेशन्स,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-
प्रथमावृत्ती ९जुलै, २०१८
पृष्ठे संख्या–१२०
वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२०५||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-येते जगाया उभारी
लेखक: सचिन बेंडभर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
बालसाहित्यिक आणि आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार विजेते श्री.सचिन बेंडभर यांचा मातीत राबून माणिकमोती पिकविणाऱ्या अन् शिवाराशी इमान राखून जगाच्या पालनपोषणाची जबाबदारी घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाची काहिली ‘येते जगाया उभारी’या काव्यसंग्रहात आर्त वेदनेने आणि भावस्पर्शी शब्दात लेखनीरुपी तिफणीनं पेरलेली आहे…
सुंदर आकर्षक नजरेत भरणारी देखणं मुखपृष्ठ आहे.तर मलपृष्ठावर कविचा आजवरचा साहित्याचा प्रवास अधोरेखित केला आहे.मातीत राबणाऱ्या हातांना त्यांनी हा काव्यसंग्रह समर्पित केलेला आहे.यातील अनेक कविता दैनिक सकाळ,मासिके, दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत.लेखक श्री. सचिन बेंडभर यांनी प्रस्तावनेत आजवरचा लेखन प्रपंच आणि प्रत्यक्ष भेटलेल्या रसिक वाचकांचे अभिप्राय तसेच आभासी पटलावरील शेअरिंग बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
साहित्य मार्गदर्शक आणि स्नेहजणांचे आभार प्रदर्शित केले आहेत.तदनंतर अल्पपरिचयासह आजवरची ग्रंथसंपदा पाहता सरांच्या वयापेक्षा जास्त त्यांची साहित्य संपदा असेल असे वाटते.
‘येते जगाया उभारी'या काव्यसंग्रहात एकूण ८५ रचनांची शब्दपेरणी केली आहे.यातील ‘कळो निसर्ग मानवा’या कवितेची दखल पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने घेऊन इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.. याबद्दल लेखकाचे हार्दिक अभिनंदन!यातील काही कवितांचे गायन युट्यूबवर उपलब्ध आहे.
अनेक पारितोषिकांची मोहर या काव्यसंग्रहावर उमटलेली आहे.त्यामुळे यातील कविता रसिकांना मंत्रमुग्ध करतात.यातील काही कवितांतून शेतकऱ्यांचे आनंदाश्रू आणि दु:खाश्रू ओघळताना दिसतात.‘येते जगाया उभारी'या ही शीर्षक कविता शिवाराचे गुज सांगत, पक्षी अन् वाऱ्याचं नातं पटवून देतात.आपला देश शेतीप्रधान आहे.पण जगाच्या पोशिंदा कष्टमय जीवन कसं जगतोय?हे सांगणारी कविता‘शेतीप्रधान देश आपला’.
निसर्ग आपणास पोटभरून देतो.पण आपण कसं ओरबाडून घेतो.हे पटवून देणारी कविता ‘कळो निसर्ग मानवा'. पर्यावरण जपण्यासाठी काय करणं खरंच गरजेचं आहे.हे अधोरेखित करणारी ही कविता चिंतन करायला उद्युक्त करते.
व्यवस्थाच नासत चालली, खाली दिसते तेच वर…
आधाराला जागाच नाही,कुंपणच इथे खातंय घर…
किती मार्मिकपणे चपराक मारणाऱ्या ओळी ‘खुशाल त्याला हात उगार’या कवितेतील आहेत. खरं तर वास्तव जिणं दाखविणारे काव्य आहे.
पक्ष्यांना फळ पिकलं आहे हे कसं उमगतं.
त्यांना गंध कसा येतो.याची प्रचिती करून देणाऱ्या ओळी…
गंध सांगतो वाऱ्याला,आता गाभाळला पेरू
गेलं टोकरुन वेडं,पिक्या फळाला पाखरू
पानाआड फळ तरी,त्याला लागतो सुगावा
आंबा पाडाचा खायाला,कोण धाडितो सांगावा?
खूप छान! समर्पक शब्दात पक्ष्यांच्या अनुभूतीची गुंफण ‘त्याचा पिकावर डोळा’या कवितेत केली आहे. ‘भल्लरी’ लावणी-काढणी करताना कामाचा थकवा जाणवू नये म्हणून समूहात म्हटली जाणारी वाद्यांच्या तालावरची गाणी.ती गाताना रंजन होत होतं कामही पुर्णत्वास कधी जातं, ते कळतही नाही.अतिशय चपखलपणे शब्दांची फवारणी करत ‘भल्लरी’ची टिपूर चांदण्यात जोंधळा काढण्याचं चित्र उभे केले आहे.तर पुढे शेती करायला लागणाऱ्या अवजारांची तसेच इतर स्थळांची
कवितेतील रचना वाचल्यावर त्यांची नेमकी युगत काय?हे पटवून देणाऱ्या खळं, पाभर, गुऱ्हाळ , शेततळे,गावचा डोंगर, इत्यादी कविता आहेत.
श्रावणातील ऊनपावसात चिंब भिजत पडणाऱ्या इंद्रधनुचे रुप पाहून आनंदित होतो. तोच पाऊस जर पडला नाही तर पिकं कोणत्या अवस्थेत असतात याचं वर्णन ‘श्रावणसरीने आता तरी यावे’.या कवितेत केले आहे.पावसाच्या वेगवेगळ्या रुपांची,पेर्ते व्हा!,अमृताचे कुंभ,आली पावसाची सर,वळीव,सृष्टीची नवलाई, पहिला पाऊस, श्रावणाची सर, मुसळधार आणि बहुरुपी तू असे पावसा या काव्य रचनेतून उलगडून दाखविले आहे.
आली पावसाची सर
मना गुदगुल्या करी
जणू चिखलात चाले
पायी आषाढीची वारी….
शेतकऱ्याच्या कारभारणीचं वर्णन ‘घरधनीन’या रचनेत केलं आहे.आपल्या
प्राणप्रिय सख्याला न्याहरी घेऊन येणारी
बायकोचं आशयघन वर्णन…खालील काव्यात आहे.
नीटस बांधा, नजर बावरी
अबोलीचा लेवूनी रंग
तिला पाहुनी मनी हिरमुसली
कोमल हिरवी चवळी शेंग||
घरधन्याला आणून न्याहारी
प्रेमे भरवी ती वृक्षतळी
गोंधळलेला चाफा बोले
खरी कोणती चाफेकळी ||
शेतातल्या पिकांची राखणी, पाणी देणं अन् मशागत करणं.हे शब्दरुपी सिंचनाने ‘गाणं शिवाराचं’नक्षत्रावाणी अक्षरात कोरलं आहे.
शेतकऱ्याच्या जीवनातील स्वानुभवाचे दाखले उठावदार करणाऱ्या बळीराजा, कसे जगावे विधात्या,व्यथा खुपते मनाला, इमान, गूज सांगतो लेकाला, सावध हो गाफील नको, यमयातना या कविता आहेत.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या खेड्यातील
शेताभातात रमणाऱ्या कृषकाच्या व्यथा अतिशय भावस्पर्शी शब्दात मनभावन काव्यात थेंबाची शाई करून वावऱ्यातल्या वृक्षलतांच्या पर्णिकेवर चितारल्या आहेत.भुईचं धन शब्दात उमटवलं आहे.
शिवाराचं गाणं त्यांच्या अनेक कवितांतून प्रगटते.ते रसग्रहण करताना मनाला चटके बसतात तर कधी विचार प्रवृत्त करायला लावतात. अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करत निढळाचा घामाचा काळ्या आईला अभिषेक करणाऱ्या धनधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा जीवनाची दास्तान कवितेत अक्षरबध्द केली आहे. लेखक तथा कवी सचिन बेंडभर यांनी ‘येते जगाया उभारी’ या काव्यसंपदेतून. अतिशय सुंदर रचना या कविता संग्रहात आहेत…
मातीवर प्रेम करणाऱ्या निसर्गप्रेमी वाचकांनी मनमुराद वाचनाचा आस्वाद घ्यावा असा काव्यसंग्रह आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:१४मार्च २०२५
समर्पक शब्दात पुस्तक परिचय👌
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद मित्रहो
ReplyDelete