पुस्तक परिचय क्रमांक:१२७ वाचिक अभिनय
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१२७
पुस्तकाचे नांव-वाचिक अभिनय
लेखकाचे नांव- डॉक्टर श्रीराम लागू
प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-फेब्रुवारी २०१७/ आठवी
पृष्ठे संख्या–९४
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य--१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१२७||पुस्तक परिचय
वाचिक अभिनय
लेखक: डॉक्टर श्रीराम लागू
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
"बोलण्यात नेमस्तपणा ठेवला म्हणजे भाषण चित्तवेधक होते."
आपल्या बोलण्याला कसा आकार द्यायचा,हे सहज सुंदर शब्दात पण आवश्यक तो तांत्रिक नेमकेपणा साधून; तो समजावण्यासाठी या पुस्तकात 'नैसर्गिक अभिनयाचे मास्टर' अभिनय सम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांनी काही युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत.
'वाचिक अभिनय' हे खऱ्या अर्थाने आपला आवाज अभिनयासाठी कसा स्पष्ट आणि शुध्द असावा.याची कार्यशाळाच जणू या पुस्तकातून घडत जाते.प्रत्येक अक्षराचे उच्चारशास्त्र समजावून सांगितले आहे. आवश्यक तिथे वैज्ञानिक माहितीही दिली आहे.
स्वरसाधना व उच्चारसाधना चांगला आवाज म्हणजे आवाजाचा मोकळेपणा, आवाजाची 'गोलाई',आवाजाची 'गोलाई' म्हणजे स्वरांची शुध्दता.संगीतातल्या स्वरांना ज्याप्रमाणे शुध्दता असते त्याप्रमाणे भाषणातल्या स्वरांनाही आली पाहिजे.उत्तम आवाज हे 'साध्य'आहे.पण आवाज हे 'साधन'आहे हे विसरता कामा नये.आवाज हा केवळ कंठातून निघता कामा नये,तो 'डोक्या'तून निघाला पाहिजे. आपला आवाज नेहमी सुस्थितीत आणि कार्यक्षम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. अक्षर,शब्द,वाक्य व भाषा यांचा शब्दोच्चार आशयाच्या अभिव्यक्तीत असणारा वाटा..भाषा हे एकमेकांशी संवाद साधण्याचे साधन आहे.वाचिक अभिनयाला सुस्पष्ट, प्रवाही आणि अर्थवाही उच्चारणाचा पाया हवा.डॉक्टर श्रीराम लागू आपल्या मनोगतात व्यक्त होताना म्हणतात की," बंगलोरला माध्यमिक शिक्षकांसाठी नाट्यशिबीराचे आयोजन सुप्रसिध्द नाटककार आद्य रंगाचार्य यांनी केले होते.तिथं मला 'व्हाईस न् स्पीच'या विषयी इंग्रजीत सहा व्याख्याने द्यायची होती.त्याची तयारी करण्यासाठी इंग्रजी चार पुस्तकांचा अभ्यास करून व्याख्यानांची तयारी केली होती.त्याचीच हे पुस्तक म्हणजे ब्ल्यू प्रिंट होय.
आवाज कसा निर्माण होतो.त्याचे गुणधर्म,स्वरयंत्र त्याची रचना व कार्य, श्वसनाचे कार्य कसे चालते.शब्दफेक नेमकी कशी करावी.पल्लेदार व स्पष्टोच्चारणासाठी काय काय करावे लागेल या अनेक प्रश्नांचा उलगडा त्या पुस्तकातून झाला. त्यातच डॉक्टर श्रीराम लागू हे मेडिकलचे पदवीधर असल्याने स्वरशास्त्राचा अभ्यास सखोलपणे मांडता आला.याचा आवर्जून ते उल्लेख मनोगतात करतात."
ज्यांना आपला आवाज व्यवसायाकरता वापरावा लागतो. अशांसाठी पाश्चिमात्य देशांत 'स्वरसाधना'या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.हे पुस्तक त्यांनी रंगमंचावर बोलल्या जाणाऱ्या भाषेचा आशय दीर्घकाळापर्यंत जास्तीत जास्त सामर्थ्याने, भाषेच्या सर्व अर्थछटांसह प्रेक्षकांपर्यंत लीलया पोचवता यावा म्हणून! त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
आपला आवाज, स्वरयंत्र व श्वसनसंस्था, शंका निरसन, आपली वाणी,वाणी , आशयानुरुप संवाद आणि गांजलेल्या नामांकित नाटकातील उतारे खास अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले आहेत."हजारो अरसिक प्रेक्षकांनी टाळी दिली,पण सहृदय प्रेक्षकांपैकी एकाने जरी नाक मुरडले,तरी सर्व खेळावर पाणी पडले असे तुम्ही मानले पाहिजे. "शेक्सपिअर या पुस्तकातील गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेलं भाषांतर…
नाटकात सादर करायची भूमिका ही एखाद्या मैफिलीप्रमाणे रंगतदार केली पाहिजे.त्यासाठी बंधमुक्त, तणावरहित, पल्लेदार आवाज, भरपूर दमसास, स्पष्ट शब्दोच्चार,निर्मळ वाणी, भरपूर वाचन, रक्तात भिनलेले तंत्र,मनन,चिंतन, विश्लेषण सखोल आशय पेलण्याची बौद्धिक क्षमता, अत्यंत गुंतागुंतीच्या क्षणी मानसिक, भावनिक प्रक्रिया आत्मसात करणारी संवेदनशीलता,हे सारे व्यक्त करु शकणारी समर्थ अभिव्यक्ती एवढी सारी शिदोरी वाचिक अभिनयासाठी जमा करणे गरजेचे आहे.
वाचिक अभिनय साधना हस्तगत करण्यासाठी या पुस्तकाचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अप्रतिम पुस्तक आहे.जणू काही अभिनयासाठी वर्कशॉप घेणारं दस्तावेज आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे वाई
Comments
Post a Comment