पुस्तक परिचय क्रमांक:११७ झोंबी
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
११७||पुस्तक परिचय
झोंबी
लेखक: आनंद यादव
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-११७
पुस्तकाचे नांव--झोंबी
लेखकाचे नांव- आनंद यादव
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण जानेवारी, २०२२
पृष्ठे संख्या--३८२
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र पहिला खंड
किंमत /स्वागत मूल्य--३७०₹
"""""""""""""""""""""""""""""""
"दररोज पोटभर अन्न मिळण्यासाठी मळ्यात गुरांढोरांसारखं राबून शिक्षणासाठी केलेल्या संघर्षमय धडपडीची 'झोंबी'.... साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आत्मचरित्र 'झोंबी' सर्वात लोकप्रिय अभिजात कलाकृती शेतीशी नाळ जपणाऱ्या साहित्यिक आनंद यादव यांची आहे."
गरिबीचे श्रीमंत शब्दचित्र उभारणारी' झोंबी'
आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे.त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झाल्याचं आहे.हे व्हायला हवेत होते.शिवाय,साऱ्या जगातलं साहित्य समृध्द केलं आहे.ते या 'झोंबी'सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथानीच!
पु.ल.देशपांडे
ग्रामीण दरिद्री भारतीय समाजाच्या संघर्षाचे ,उत्कट भावविश्वाचे दर्शन घडवणाऱ्या जागतिक परिणाम लाभलेल्या आनंद यादव यांची सर्वात प्रकटन करणारी अभिजात साहित्यकृती 'झोंबी' आत्मचरित्र आहे.
गावखेड्यातील ग्रामीण पात्रांच्या आयुष्यातील जीवनानुभवाची वेदना, भीषण सुखदुःखं आणि व्यथांची कथा करून जगासमोर मांडली. लेखक आनंद यादव यांनी संवेदनशील मनाने हाताळलेल्या अनेक साहित्य प्रकारांना भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. विद्यापीठे आणि पाठ्यपुस्तकांतूनही त्यांच्या विविध साहित्य -कृतींचा समावेश अभ्यासक्रमात केलेला आहे.
'झोंबी'या आत्मचरित्राला मानांकित आठ पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील सर्वश्रेष्ठ साहित्य अकादमीचा पुरस्कार सन १९९० साली मिळाला आहे.
खेड्यातल्या शिकू पाहणाऱ्या पहिल्या पिढीची ही लढाई आहे. शेतकऱ्याच्या घरात भरपूर मुले, अन्नाची दशा,शेतात काबाडकष्ट, शिक्षणाची अनास्था,अन् दुष्काळ तर पाचवीलाच पूजलेला असतो. शिकू पाहाणाऱ्या पिढीतले लेखक आंदा (आनंद यादव)या सर्व गोष्टींचा नायनाट करण्यासाठी धडपडतो आहे.निर्मितीसाठीचे जीवनबध्द निर्माणक्षम आणि कष्टाळू मन आनंद यांच्या उभारणीत ऊर्जेचे काम करते.
एक निखळ ग्राम्यजीवनातील ही संघर्षाची
हकिकत गतकाळाला, शेतकरी कुटुंबाला, खेडेगावाला जिवंतपणा देणारी ललितकृती ठरली आहे. गांवकरी वर्तमानपत्रातील अभिप्राय भूमिपुत्राच्या बालपणीच्या जीवनाची आणि शिक्षणाची संघर्षगाथा झोंबीत उलगडून दाखवितात.'झोंबी'हे आत्मकथन त्यांनी कागल गावच्या मायमातीस अर्पण केले आहे.
रसिक वाचकांच्या हृदयसिंहासनवर विराजमान झालेले प्रचंड लोकप्रिय आत्मचरित्र आहे.या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत.
या अक्षरशिल्पाचे हिंदी,कन्नड आणि बंगाली भाषेत भाषांतरे झालेली आहेत.पहिल्या आवृत्तीत लेखक आनंद यादव तीर्थरूप भाई पु.ल.देशपांडे आणि सौ.सुनीताताई यांच्या ऋणातून मला कधीच मुक्त होता येणार नाही.माझ्या बाबतीत ते वाढतच जाणारे घटित आहे.असं कृतज्ञतापूर्वक ते व्यक्त होतात.
या आत्मकथेस आदरणीय भाई पु.ल. देशपांडे यांनी 'झोंबी:एक बाल्य हरवलेलं बालकांड'या शिर्षकाची विस्तारीत प्रस्तावना आहे.ललित साहित्यातल्या लेखक आनंद यादव यांच्या कसदार लेखनामुळे आणि समीक्षणात्मक लेखनात दिसणाऱ्या व्यासंगी वृत्तीमुळे आजच्या मराठी साहित्यातील यशस्वी ग्रामीण लेखकात त्यांच्या नावाचा अंतर्भाव सहजपणे होतो. त्यांची आत्मकथा सत्य व भावनांच्या उभ्याआडव्या धाग्यांच्या ताण्याबाण्यात विणलेल्या वस्त्रासारखी आहे.मात्र हे वस्त्र तलम, मऊ व मुलायम नसून घोंगडीसारखं आशा आकांक्षाचे व सुखदुःखाचे खालीवर घालून वापरायचे गरजेचं अंथरुण पांघरुणआहे.
दारिद्र्याचे आसूड खात जीव जिवीत ठेवणाऱ्या कुटूंबातल्या एका पोराच्या हाती 'पाटीपेणशिल'आल्यापासून ते तो मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत करीत राहाव्या लागणाऱ्या झोंबीची आनंद यादव यांनी चित्तर कथा सांगितली आहे. यातील भाषाशैली अतिशय भावस्पर्शी व हृदयस्पर्शी वास्तव आहे.आनंदाच्या बाळपणी रात्रंदिवस चालणाऱ्या ह्या झोंबीची सुरुवात घरापासूनच होते.कारण घर हे मुळी मुकाट राबणाऱ्या आणि आसूड खाणाऱ्या बैलांच्या गोठ्याला चिकटलेल्या वास्तुसारखं होतं. वडिलधाऱ्यांच्या पोटात पोरांविषयी माया ममता प्रेम जरासुद्धा परवडणारं नव्हतं.जशी झुडपं आपसूक उगवावी,आपसूकच वाढावी.तशीच सुकावी. एखादं दुसरं मरुन जावं अशीच कुटूंबात जन्मलेल्या मुलांची अवस्था होती.मग तिथे बालपण,किशोरपण आणि तारुण्य ह्या जीवनाच्या अवस्थांचा परीघाला आंजारावं गोंजारावं हा विचारही आईबापाला अन् भावंडांना शिवतही नव्हता.आईला युक्त्या प्रयुक्त्या केल्यावाचून पोरांच्या पोटाला पोटभर खाऊ कधी देता आला नाही. माया-ममतेला पारख्या असलेल्या आनंद यादवांची हकिकत कादंबरीत बीजरुपाने आढळते.दिनरात शारीरिक कष्ट करून दोन वेळची भाकरी न मिळणाऱ्या त्या आनंदाचं आयुष्य काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटेत ठेचकाळत गेलं.तरीही ते शिक्षणासाठी हालअपेष्टा सहन करीत अनवट वाटा कोवळ्या पाऊलांनी कशी तुडवली याची ही आत्मकथा आहे.
कामचुकार,हेकेखोर व कोपीष्ट दादा (वडिल), एकापाठोपाठ एक झालेल्या अकरा मुलांचा सांभाळ करणारी माता, त्यासाठी अहोरात्र शेतात मेहनत करणारी त्यांची आई. खंडाने घेतलेल्या मळ्यात बालपणातच कष्टप्रद काम करत राहणं.हे दादांचं ब्रीदवाक्य.दादा बोलतानाच पहिल्यांदा शिवी हासडूनच सुरुवात करणार आणि मग हातात असेल त्या वस्तुने मारझोड झालीच म्हणून समजा. बायकोला आणि मुलांनाही मारायला त्यांना काहीही वाटायचे नाही. प्रतिकूल परिस्थितीशी सतत झगडत प्रसंगी समायोजन साधत शिकत राहिले.पुस्तके वाचायला मिळावित म्हणून दारोदार हिंडत,आबाजी सणगर,वसंत पाटील अशा मित्रांशी सलगी करत.सहृदय शिक्षकांच्या शाबासकीच्या अनुभवाने फुलत गेले.गोडापेक्षा कडूच जास्त गिळत शिक्षण पूर्ण केले.
हृदय हेलावून टाकणारे अनेक भावस्पर्शी प्रसंग आपणाला विचार मंथन करायला लावतात. वाचताना अक्षरशः मन अस्वस्थ होऊन जातं.आनंद यादव यांची 'धुणं'कविता दारिद्रयाशी झगडणाऱ्या शेतकरी कुटूंबातील हलाखीच्या परिस्थितीत होरपळून निघालेल्या यातनांची सोशिकता दाखविणे.
कशापायी आणलसं, माझं वेगळून धुणं?
रुमालात बांधल्यास,का घड्या
त्येंच्या का करुन चड्ड्या कुडती झग्यांचं,
चोळ्या लुगड्याचं पिळं
भावंडाच्या वाळलेलं,का ग धडुत्यांचं बोळं||
त्याच फाटक्या धडप्यात,बांध आई माझं धुणं
रिठं बेलफळं लाव,सदा त्येला साऱ्यासंगं
जरी शिकलो मी आई,नको टाकू वेगळून
बघून ह्यो भेदभाव,तुटे तटातट मन||
दादाला लेखकांना बालपणी शाळेत जाऊ का? म्हणून विचारल्यावर ''साळा शिकून काय बी उपेग न्हाई. शेवटी हात शेनामुतातच घालायचं." अशी मानसिकता लेखकाच्या वडिलांची होती पण शिक्षण घेऊनच या सगळ्या दरिद्री चक्रातून बाहेर पडता येईल. हे त्यांच्या मनाला पटलं होतं, हायस्कूल मध्ये इतर सधन वर्गासारखी शिफारसपत्र नसल्याने फ्रिशिप मिळाली नाही, प्रसंगी शेतात जास्तीचं काम करुन, जमेल तसं गवताचे भारे विकून, मिळालेल्या वेळेत अभ्यास करुन शिक्षणाचे ध्येय साध्य केले.
या कथेत लेखक आनंद यादव यांच्या घराण्याचा इतिहास, लेखकांसह भावंडांचे जन्म, बालपणीच्या आठवणी, मळ्यातील शेतीची कामे करणे आणि शिक्षणाचा गंधही नसलेल्या शेतकऱ्याच्या घरातील एक भूमिपुत्र शिकायला मिळावं म्हणून प्रतिकूल परिस्थितीशी कसा संघर्ष करतो.अन् अकरावी (एस.एस.सी.)परीक्षा सेकंड क्लासमध्ये पास होतो. कागलातील हायस्कुलमध्ये तिसरा नंबर मिळवितात. बालपण, मळ्यातल्या शेतीकामाचे किस्से आणि बिगरी ते अकरावी पर्यंतच शैक्षणिक १९५५ पर्यंतच जीवनरथ उलगडून दाखविला आहे.
मळयातील कामे,पीकं,मेहनतीची हत्यारं व अवजारे, घर, गैबीची यात्रा, मळ्यातील कामे तसेच दादा, आई, भावंडांची रोजची कामे, दादांचे मित्र,मामा, शेजारी पाजारी, शाळकरी सवंगडी,शिक्षक आदी व्यक्तींचे शब्दचित्र अतिशय भावनिक शब्दात वास्तवदर्शी शैलीत प्रसंगानुरूप रेखाटली आहेत. शाळेतील दोस्त,शाळेचे वर्णन,शिक्षकांचे शिकवणं, शिकण्यासाठी लागणाऱ्या पैशाची तजवीज करायला केलेलं दिव्य आदींचे वर्णन मनाला स्पर्शून जाते.मन हळवं होऊन आपलं बालपण आणि शाळेचे दिवस डोळ्यासमोर ठाकतात. आठवणींची मालिका क्रमशः पुढेपुढे सरकतं इतकं अप्रतिम लेखन या कादंबरीत मांडलेले आहे.अनेक नवनवीन शब्दांची ओळख होते.शेतकऱ्यांच्या प्रपंचातील व शेती उपयोगी अवजारे व साहित्याची महती समजते.स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील भारतातील घडामोडी आणि शिक्षणाची पध्दत याचीही माहिती समजते.
यापूर्वी झोंबीतील काहीअंशी लेखास 'रसिक' व 'बागेश्री' या नियतकालिकांच्या दिवाळी अंकात पुर्वप्रसिद्धी मिळालेली आहेत. वाचकांचं मन अस्वस्थ करणारं आत्मचरित्र आहे.पुस्तकातील कोल्हापुरी बोलीभाषेची शैली वाचकांना खिळवून ठेवते.वाचताना रसिक एकरुप होऊन जातो.इतकं दर्जेदार आणि अस्सल मराठमोळ्ं लेखन भावते. लेखक आनंद यादव यांच्या जादुई लेखणीस मनापासून कडक सलाम आणि त्रिवार अभिवादन!! अप्रतिम साहित्यकृतीचा वाचनातून अनुभव मिळाला..
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment