परिसर भेट घळवी कोंढावळे
आज आमच्या शाळेची सहल परिसर भेटीसाठी कोंढावळे गावातील डोंगर उताराच्या वहाळीच्या(ओढा) उगमा जवळील घळवी बघायला गेली होती.
घळवीच्या डोक्यावर एक भलामोठा खडक येऊन बसलेला आहे.त्यामुळे आतमध्ये अतिशय गारवा असून पाण्याचा झिरप कमी होत आलेला आहे. आतमध्ये दहा-बाराजण आरामशीर बसतील एवढी जागा आहे.
सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे दगडातच घडीव गोल आकाराचे कुंड तयार झाले आहे. कुंड भरल्यानंतर पाणी लगतच्या भिंतीवरुन वाहत पुढे पुढे मोठ्या प्रवाहास मिळते. पावसाळ्यात तो प्रवाह पांढऱ्याशुभ्र धारेत प्रवाहित होताना अतिशय मजेशीर दिसत असतो.साधारणपणे ३० वर्षांपूर्वी याच घळवीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी वाडीतील लोकं करत होती.घळवीच्या आजुबाजुलाही मोठमोठाले ओबड धोबड दगड येऊन पडलेले दिसतात.
प्रत्यक्ष धबधबा वहात असताना त्याच्या पायथ्याला वहाळ कशी प्रवाहित होते.यांचे प्रत्यक्ष उदाहरण पहायला मिळाले.पायथ्याच्या भागात उतारती छोटीछोटी चंद्रकोरीच्या आकारात शेतीची खाचरं असून त्यातील नाचणी, वरी आणि भात ही पिकं काढलेली दिसून आली. तदनंतर पाण्याचा झिरप नसल्याने आणि जंगलातील प्राण्यांच्या वावरांमुळे, उपद्रवामुळे पेरलेल्या पिकांचे अतिशय नुकसान होते.त्यामुळे पावसाळी एकच पिक कसतरी हाताला लागतं. हे प्रत्यक्ष तिथं नेहमीच गुरं चारणाऱ्या शेतकऱ्याकडून सर्वांना माहित झाले.
निसर्गाच्या सान्निध्यात अध्ययन अनुभव मुलांना घेता आला.मनसोक्त मुलांना खेळायला,उड्या मारायला, बागडायला आणि इकडे तिकडे फिरायला मिळाले. तदनंतर रानातच दगडांची चुल मांडून आणि इंधन म्हणून काट्याकुट्या गोळा करून मसालेभात बनविला.पावटे-वाटाणे घालून केलेल्या गरमागरम मसालेभाताचा आस्वाद सर्वांनी घेतला.आनंदी आणि समाधानी निसर्ग पर्यटनाचा अनुभव...
फेसबुकवरील अभिप्राय
समाजामध्ये दोन खूप मोठे हस्ती असतात, जाईल त्या परिसराचं चित्ररूपी दर्शन तो आपल्या चित्रामधून सर्वांना घडवत असतो तो चित्रकार आणि दुसरा म्हणजे लेखक, तो जाईल त्या परिसरामध्ये डोळ्यांनी पाहिलेले, नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या निसर्गरूपाचे वर्णन हुबेहूब आपल्या जादुई शब्दात मांडून प्रत्यक्ष नजरेसमोरच ते चित्र दर्शवण्याचा प्रयत्न करतो. जीवनातील या दोन महान मूर्ती, मानव स्वरूपामध्ये आजही या जगामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्या तुमच्या रूपाने पहावयास मिळतात. सर खूप छान लिहिता मनःपूर्वक शुभेच्छा!
दीपक भंडारे , सोलापूर
Comments
Post a Comment