एवढं पुकारा ओ...गुरुजी!
एवढं पुकारा ओ….गुरुजी!
नोकरीच्या गावात,स्वताच्या गावात धार्मिक कार्यक्रमात विशेषतः लग्न समारंभ नाहीतर सामाजिक कार्यक्रमात त्यांच्या हक्काचा,हाक दिली की, हाकेला ओ देणारी व्यक्ती म्हणजे त्या गावच्या शाळेतील गुरुजी होय. साधारणपणे २५ते ३० वर्षांपूर्वी लग्नात स्वागत समारंभापेक्षा मानाचे पोशाख,आहेर,पेहरावा, नातेवाईकांची नवरदेव व नवरीमुलीला भेट आणि भावकीतल्या व्यक्तींचे मानपान करताना त्यांच्या नावाचा पुकारा माईकवरुन हमखास केला जायचा! हे काम बऱ्याचदा गावच्या शाळेतील गुरुजींना करावं लागायचं. त्यातूनच काहींच्या हातात नावं पुकरायला माईक आला.आपलाच माणूस म्हणून लोकं बोलवू लागली. बोलण्यातील तारतम्य आणि आवाजातील सफाईदारपणा लोकांना आवडू लागला. 'गुरुजी बेस काम झालं.'अशी जनमानसातील कौतुकाची थाप मिळू लागली.
मग कार्यक्रमात पुकारायला गुरुजींनाच सांगायचं, याचं आवातणं मिळू लागलं.त्याचाच परिपाक म्हणजे आजतागायत कित्येक गुरुजी विविध सभा-संमेलन, लोकोत्सव कार्यक्रम, फेस्टिव्हल,लग्न समारंभ,बारशे, स्नेहसंमेलन,गॅदरिंग, विविध खेळांच्या स्पर्धा,बाल आनंद मेळावे,वाढदिवस, भूमिपूजन आणि उद्घाटन आदी कार्यक्रमात निवेदन अथवा सूत्रसंचालन करून परिचित होऊ लागलेत. ''अॅकर''अशी वेगळी बिरुदावली समाजाने अशा निवेदकांना चिकटवली. कित्येकांनी मग त्या दृष्टीने सरावात सातत्य ठेवले.स्वत:चा आवाज कमवून, मधाळ वाणीत,अचूक शब्दशैलीत आणि समर्पक संवादफेकीतून रसिकांना, श्रोतृवृदांना कानसेन बनविले.प्रदीप भिडे, सुधीर गाडगीळ,भक्ती बर्वे,ज्योत्स्ना किर्पेकर,चारुशीला पटवर्धन,अनंत भावे,अमीन सयानी, रामदास फुटाणे, कवी अरुण म्हात्रे,निलेश साबळे, लक्ष्मीकांत रांजणे,श्यामसुंदर मिरजकर, विठ्ठल माने असे सुहास्य व प्रसन्न चेहऱ्याचे वृत्त निवेदक तथा मुलाखतकार यांना अॅकरिंगमधील आॅयडॉल मानून आपोआपल्या परिघाप्रमाणे कित्येकांना वलय प्राप्त झाले आहे.
आज कोणत्याही कार्यक्रमात अॅकरिंग करण्याची गरज निर्माण झाली आहे. 'इव्हेंट मॅनेजमेंट'या व्यावसायिक दृष्टीकोनातून याकडे पाहिले जावू लागले. अनेक शहरांत कार्यशाळा, सेमिनार व क्लासेस आयोजित करुन 'सूत्र संचालन' कलेची साधना होऊ लागली.अनेकांनी ही कला अवगत केली.प्रत्येकाला आवाजाची शैली सरावातील सातत्य, स्वरांचा विशिष्ट पद्धतीचा व्यायाम करुन सरावात सातत्य ठेवून आवाज कमविला आहे.तर अनेक सुत्रसंचलन करणाऱ्या शिक्षक प्राध्यापक महोदयांनी,प्रतिभावंतांनी साहित्यकृती प्रकाशित करुन या कलेच्या अभ्यासासाठी लिखित स्वरूपात साहित्य उपलब्ध करून दिले आहे. गुगलबाबा, ब्लॉग आणि युट्यूबने तर लिखित आणि दृकश्राव्य साहित्याचा खजिना (कविता,चारोळ्या, स्लोगन, श्र्लोक, गाणी ,प्रार्थना आणि कोटेशन रुपात ) अवतरवलेला आहे.लक्षवेधी अवतरणांची पेरणी,शाब्दिक कोट्या,अल्पाक्षर रमणीय संभाषण,आरोहअवरोहासह स्पष्ट उच्चारण,संवाद फेक,प्रसंगावधान आणि हजरजबाबीपणा,बहुश्रुतता आणि शांत संयमीवृत्तीने हल्ली कार्यक्रमाचे संचालन होतंय. त्यामुळे बहारदार माहोल तयार करायला,नियोजनबद्ध नेटका कार्यक्रम संपन्न करायला एका कुशल कसबी हजरजबाबी संवादकाची गरज भासू लागलीय.कार्यक्रम संपन्न झाल्यावर अनेक जाणकार कौतुकाची थाप द्यायला पुढे येतात…..वाणी समृध्द व्हायला,आत्मबळ आणि आत्मविश्वास निर्माण व्हायला अशा अनेक कौतुकाच्या गोड शब्दातून प्रेरणा मिळते.अनेक कार्यक्रमाचे संचलन करताना अनुभवांची शिदोरी मिळते. यासाठी नामवंत निवेदकांचं अॅंकरिंग तसेच सिनेसृष्टीतील आणि दूरवाहिनी क्षेत्रातील अनेक कलाकारांचे कार्यक्रमही श्रवण करणं ही तर पर्वणीच असते. त्यामुळे शब्दभंडार समृध्द होते.आवेगात बोलताना कुठं पॉझ घ्यावा हे समजतं. भावयुक्त शब्दफेक कशी करावी हे समजून येते.
त्यादिवसापासून पुढे अनेक कार्यक्रमात संचालन करण्यास्तव हातात माईक आवर्जून मिळायला सुरुवात झाली……..
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment