पुस्तक परिचय क्रमांक:११६ आपण माणसात जमा नाही.




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-११६

पुस्तकाचे नांव--आपण माणसात जमा नाही

लेखकाचे नांव- राजन गवस

प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथम आवृत्ती/ जुलै २०१७

पृष्ठे संख्या--१७६

वाड़्मय प्रकार-कथासंग्रह

किंमत /स्वागत मूल्य--१८०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚

११६||पुस्तक परिचय

           आपण माणसात जमा नाही

लेखक:राजन गवस

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃

       भारतीय कृषीसंस्कृतीशी नाळ जोडणारे ,विश्वज वासल्य, कारुण्यानं भरलेली आणि भारलेली दृष्टी ज्या साहित्यात वाचायला मिळते.वास्तवाचे दर्शन तटस्थपणे वाचकांना होते.कृषीप्रधान जगण्याकडे आतून येणाऱ्या जाणिवेने आणि दूरस्थपणे पाहण्याची क्षमता ज्या साहित्यिकांना आहे.त्यातील लौकिकार्थाने राजन गवस यांचे साहित्य लोकप्रिय आहे.

   महाराष्ट्रातील गावगाड्याचं बदलतं अवकाश आणि शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण ग्रामीण भागात कसेकसे पसरले आहे.याचा उलघडा 'आपण माणसात जमा नाही'या कथा संग्रहात सिध्दहस्त लेखक व कादंबरीकार राजन गवस यांनी करून दिलेला आहे.

      'तणकट'या लोकप्रिय कादंबरीला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच त्यांना साहित्य सेवेबद्दल अनेक प्रतिष्ठित शासकीय व संस्थांच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

ललित गद्य मुक्त लेखक, गाजलेल्या'चौंडकं' कादंबरीचे लेखक कर्मवीर हिरे कॉलेजमध्ये २८वर्षे प्राध्यापक होते.तदनंतर ते शिवाजी विद्यापीठाच्या विभाग प्रमुख पदावरून निवृत्त झाले.त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे.भाऊ पाध्ये यांच्या साहित्यावर त्यांनी पी.एचडी डॉक्टरेट मिळवली आहे. भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करून ते प्रभावीरीत्या लोकांसमोर मांडण्याचे कसब त्यांच्या लेखणीत आहे. त्यांच्या  साहित्यकृतींचे कन्नड भाषेतही अनुवाद झाले आहेत.'मराठीचे आशययुक्त अध्यापन'यासारखे संशोधनात्मक लेखनही त्यांनी केले आहे.त्यांनी दैनिक सकाळच्या साप्ताहिक सप्तरंग पुरवणीत व लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत लेखन केले आहे.

  रणधीर शिंदे यांचा मलपृष्ठावरील लेख या पुस्तकातील लेखांची आशयघनता सिध्द करतात.गावखेड्यातील गावची आणि गावकुसाबाहेरील माणसांची स्वभाववैशिष्ठ्ये कथेतून मांडलेली आहेत.त्यातून शहराकडे स्थलांतर केलेल्या चाकरमान्यांची गावा विषयीची मनाची घालमेल,उलघाल शब्दबध्द केली आहे.यातील कथांचे रसग्रहण करताना आपल्याही बालपणाला उजाळा मिळतो. मनात स्थळ काळ दृश्यांची मालिका सुरू होते.आपण आपल्याच भुतकाळातील घटनांच्यात रमतो.इतकं वास्तव आणि सामर्थ्यवान लेखन या कथांमधून प्रभावीपणे मांडलेले आहे.

        राजन गवस यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयी विशिष्ट मूल्यदृष्टियुक्त जाणिवा,बदलता गावगाडा या संबंधीची आशयसुत्रे प्रभाविपणे सादर केली आहेत. त्यांच्या प्रत्येक कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा संवेदनशील स्वभाव या कथांमधून साकारला आहे.कृषिसंस्कृतीतील विविध तऱ्हेचे संबंध, समूहमाणस, सत्तासंबंधआणि जातियतेची उतरंड यांबद्दलचा जीवनार्थ व्यक्त करते.आधुनिक काळातील शहरकेंद्रीत मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण भागात कसे पसरते आहे.त्यामुळे लोकमाणसामध्ये घडलेल्या बदलांचे, स्थित्यंतराचे,ताणाचे चित्रण यातील कथा करतात.माणूस आपमतलबी कसा झाला आहे.जीवनातल्या व्यवहारात स्वार्थार्थाची रुजवात कशी झालीय.त्याच्या या सूचक कथा आहेत.

'आपण माणसात जमा नाही'या शीषर्ककथेसह एकूण तेरा कथांचा समावेश या पुस्तकात केला आहे. पाझर, तुटल्या प्रदेशाचा प्रवास,ठराव, बहुलकरांच्या मुलांची गोष्ट,वळसंग्या काका,सन्नाटा,लेखकराव,तिप्या मी आणि सैराट श्वापद,जळणारी गोष्ट,नवाचं तीन चतुर्थांश,घव,आपण माणसात जमा नाही आणि तळ.

प्रत्येक कथेतील शब्दचित्र फारच बोलकं आहे. इतकं वास्तववादी निरपेक्ष लेखन दिसून येते. कथा बालपण ते सद्यस्थिती यावर प्रकाशझोत टाकते.त्यामुळे विचाराधारा माणसांच्या पैलूंचे चित्रण करीत करीत पुढे सरकते.विशेष म्हणजे यातील कथांना विविध दिवाळीअंकांत पुर्व प्रसिद्धी लाभलेली आहे.त्यामुळे वाचक रसिकांच्या आवडीची मोहर मुद्रांकित झालेली आहे.

'पाझर'कथेत एका मुस्लिम कुटूंबाची कमवून जगण्याची जगरहाटी मांडलेली आहे.दररोज सायकलवरून ताजे पाव विकणारा बाबर व घरोघरी बांगड्या भरायला जाणारी जैतुनबी म्हणजे गावची भाभी.नवऱ्याच्या आकस्मिक निधनाने मुलांचा सांभाळ तिनं स्वकष्टाने केला. 

गावातील देवाचं बकऱ्या कोंबड्यांना सल्ला मारण्याचे काम  इमानेइतबारे  करायला बाबूल हातातलं काम करायला लगेच तयार.टि.व्ही. वरील संसद हल्ल्याच्या सचित्र बातम्या ऐकून पोरांची माथी भडकली.मग पोरांनी बाबलचा द्वेष करुन त्याला चांगला चोप दिला.त्याचा माल फेकून दिला.बाबल विमनस्क अवस्थेत घरी आला,मग गावच्या गोंदा पाटलानं त्या पोरांना समजुतीने पटवून दिलं.ती'पाझर' कथा वाचताना आपल्याही डोळ्याला पाझर फुटल्याशिवाय राहत नाही.

     गावातल्या मुलाची शिक्षणाची आस भागवायला गावचा प्रमुख आबा घरोघरी जाऊन पैसे जमवितो.आणि बाबलचं शिक्षण पूर्ण करतो.त्याला शहरात नोकरी लागल्यावर तो गावपण जपायचा प्रयत्न करत असतो.पण आईचं खेड्यातून शहराकडे त्याच्याकडे रहायला येत नाही. ही खंत सतत मनात सलत राहते.त्याची तगमग होते.ती 'तुटल्या प्रदेशाचा प्रवास'या कथेत मांडलेली आहे.

'बहुलकरांच्या मुलांची गोष्ट' या कथेत मुलाला अभ्यासासाठी शिक्षक असणारा बाप काय काय दिव्य करतो.प्रसंगी मारझोड करतो. कारण  बालपणी बापाने कष्टाने शिक्षण पूर्ण केले होते.त्यामुळे त्याला नोकरी मिळाली होती.भाऊ भावाला वेळप्रसंगी मदत न करता स्वार्थीने कसा रहात असतो.तो सहकारी शिक्षकांशी शेजाऱ्यांशी कधीही पटवून घेत नाही.अभ्यासाच्या तकाट्याने मुलगं घल सोडून जातं.आपल्या अवतीभवती सगळीकडे घडणाऱ्या घटनांचे वर्णन आणि विश्लेषण या लेखात मांडलेले आहे.

 सहकारी क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुकांसाठी मत मिळवायला त्या संस्थेचा ठराव विश्वासू माणसाचा करणं महत्त्वाचा भाग असतो.त्याची चित्तरकथा शब्दरुपात'ठराव' कथा प्रस्तुत केली आहे.ही कथा रसग्रहण करताना निवडून यायला काय काय दिव्य करतात त्यांची माहिती समजते.

बालपणीच्या काही घटना दु:खदायक असतात.घरातील थोरल्या मुलास घरातील सर्वांचे करताना अग्निदिव्यातून  जाताना स्वता:ची कशी ससेहोलपट होते.त्याचा साक्षीदार असणारी दोस्तालाही किती मानहानी सहन करावी लागते.प्रसंगी दोघेही अबोल होतात.ती कथा 'वळसंग्या काका'आपल्या मनाचा ठाव घेणारी आहे.

यल्लाप्पा हा सालगडी बुगट्या आलुऱ्याचा सालगडी असतो.त्याची शेती असणारा यल्लाप्पाची 'सन्नाटा'ही गोष्ट कुतूहल निर्माण करणारी आहे.तसचं अशीही काय अवलिया माणसं असतात याचं नवलही वाटते.

'लेखकराव' ही आत्मचरित्र लिहिणाऱ्या लेखकाची कथा फारच बोलकी आहे. लेखकाला चरित्र  लिहिण्यासाठी कसं प्रवृत्त केले आहे.त्याची प्रकटता या लेखातून होते.

'तिप्या,मी आणि सैराट श्वापद'ही कथा म्हणजे अस्सल मासलेवाईक नमुना आहे. एक मित्र आपल्या मित्राचं चांगलं व्हावं म्हणूनतिप्याच्या आजीला सांगायला आईला विनवणी करायला सांगतो. तदनंतर तिप्या गावात राहून नोकरी करत करत गावचा पुढारी होतो.मग नको त्यागोष्टीच्या आहारी जाऊन तुरुंगात जातो. तदनंतर दोस्ताला भेटल्यावर तोच तिप्या म्हणतो.''मास्तल , तुझ्यामुळं हे झालं.माझ्या जन्माची वाट लागली.''मी फक्त डोळ्यांकडं पाहतच राहिलो.त्याच्या डोळ्यात हिंस्र श्वापद सैराट धावत होतं.'माझं काय चुकलं?'हे मित्राला सांगताच आलं नाही.

सर्वांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या यातल्या कुलकर्णीला अंततः आत्महत्या का करावी लागते.याची शोकांतिका 'छळणारी गोष्ट'या कथेत मांडलेली आहे.उपकार करणाऱ्यांवर कृतघ्नपणा कशी करतात.त्याची भावस्पर्शी कथा कथाकाराला कशी छळते.याचा उहापोह केला आहे.

सरपंचपदाचा उमेदवार एका पार्टीचा अन् इतर सदस्य दुसऱ्या पार्टीचे असल्यावर कोणत्या खेळल्या कराव्या लागत्यात. त्याची कथा, 'नवाचं तीन चतुर्थांश' त्यामुळे गावातील सरपंच निवडणूकीचा विषय कुठंही कसा चघळला जातो.अन् त्याचवेळी गावातील आंतरजातीय प्रेमीयुगल पळून गेलेलं असतं.गावपुढारी त्याची सांगड निवडणूकीशी कशी घालतात. गावपुढारी याचं भांडवल कसं करतात.याची कथा वाचताना एकमेकांना चेकमेट करायला गावगुंडींचं राजकारण कसं होतं हे लक्षात येतं.

       गावातल्या कमळा सुतारणीची कथा 'घव' झाडपाल्याच्या औषधानं गावातील समद्यांना आजारपणात उपयोगी पडणारी कमळा आज्जी कथाकाराला घरी जात असताना, गावच्या जंगलात कशी हिंडवते.अन् त्यालाच माझ्यानंतर तुच लोकांवर उपचार कर, असं पालूपद लावते.त्याची रहस्यमयी कथा…

'आपण माणसात जमा नाही' ही कथा तर उपकाराला अपकारक कशी आहे.याचं दर्शन घडविणारी कथा आहे.आजोळात लहानाचा मोठा झालो.म्हणून आपल्या भाच्याला आपल्याकडे आसरा देऊन  शिक्षण पूर्ण करावं असं वाटतं.पण भाचा आणि बहिण आल्यावर बायकोचा अवतार बदलतो, ती रुसतेफुगते.हे बहिणीच्या लक्षात येतं.ती त्याला गंमत नाही म्हणून माझ्याकडे ठेवण्यास नकार देऊन.परत गावाकडे भाच्याला घेऊन जाते.ते म्हणतात की,'माझं आजोळ डोळ्यासमोरून सरकत गेलं.आमचा आता ग्रेट होता.तेव्हाच ठरवलं, ''गावाची शीव नाही बघायची.आपण माणसात ज्याचं नाही!"

तळागाळातील माणुसकीचं दर्शन घडविणारी 'तळ'ही कथा.डेरिंगबाज सत्याची बायको कल्लव्वाच्या जिद्द आणि धाडसाची कथा .कल्लव्वा तिनं तालुक्यांची वेस असणाऱ्या जंगलाजवळ एका झोपडीत हातभट्टीची दारु एकटीच बायमाणूस दारु विकत असते. अतिशय जिगरबाज असणाऱ्या कल्लव्वाचं व्यक्तीचित्रण शब्दचित्रात व्यक्त केलेलं आहे.


प्रत्येक कथेतून शहरी आक्रमणाचा ताण केंद्रवर्ती आहे.नव्या कृषीसंस्कृतीकडे पाहण्याची मर्मदृष्टी या कथेतून मांडलेली आहे. तिच्यात जीवनार्थाच्या अनेक शक्यता सामावलेल्या आहेत.अतिशय वास्तव आणि ज्वलंत लेखन शैलीने कथांचा मतितार्थ सांगितला आहे.लेखक राजन गवस यांच्या लेखणीस मनस्वी सलाम!


परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई







Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड