पुस्तक परिचय क्रमांक-१११ चेहऱ्यामागचे चेहरे







वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,

 वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१११

पुस्तकाचे नांव--चेहऱ्यामागचे चेहरे

लेखकाचे नांव--महादेव मोरे

प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण आॅक्टोंबर २०१६

वाड़्मय प्रकार-- व्यक्तीचित्रण,कथासंग्रह

पृष्ठे संख्या-२०६

मूल्य/किंमत--२२०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚

१११||पुस्तक परिचय

          चेहऱ्यामागचे चेहरे

          लेखक: महादेव मोरे 

############################

तळागाळातील माणसांच्या मनाचं निरीक्षण सूक्ष्मपणे करून ग्रामीण बाजातील भाषेत लिहिलेलं शब्दचित्र म्हणजे 'चेहऱ्यामागचे चेहरे' हा कथासंग्रह आहे. समाजातील उपेक्षित वंचित घटकातील माणसांची व्यक्तिरेखा अतिशय मर्मभेदक शब्दात त्यांनी मांडलेली आहे.या व्यक्तींच्या कथांमधून त्यांचे खडतर आयुष्य जगताना उपभोगलेल्या हाल अपेष्टा, सुखदुःखाच्या घटना,आर्त वेदना आणि संवेदना परखडपणे वास्तवपणे मांडलेल्या आहेत.

पोटाची खळगी भरण्यासाठी तळागाळातील लोकांना कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते.पोटची मुलं जरं अव्यवहारी मार्गाला लागल्यावर त्यांच्यासाठी आई बापाला कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागते याचे जीवंत चित्रण या कथा वाचताना आपल्या समोर उभे ठाकते. माणसांच्या देहयष्टीची, त्यांच्या बेफिकीरवृत्तीची, इरसालपणाची प्रामाणिकपणाची,खोटारडेपणाची आणि सडेतोड स्वभावाचे चेहरे हुबेहूबपणे रेखाटले आहेत,तीच शब्दचित्रे माणसाचे विविध पैलू उलगडून दाखवतात.


'चेहऱ्यामागचे चेहरे'या कथासंग्रहाला सन १९७५-७६साली राज्यपुरस्काराचे मानांकन लाभले आहे.२००७साली महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांचा 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. विशेषत: म्हणजे  लेखक महादेव मोरे यांनी सर्वंच कथेतील   नायक तळागाळातील उपेक्षित लोकांचे चेहरे शब्दाक्षरांनी रंगविलेले आहेत.

आजपर्यंत त्यांनी १४कथासंग्रह,१७ कादंबऱ्या आणि ललित लेख असा साहित्याचा प्रवास असून यात उपेक्षित माणसांना हिरो करून त्यांचे पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागणारी आर्तता,धडपड आणि परिस्थितीचे चटके यांचे भाषिक अभिव्यक्तीच्या फटकाऱ्याने अंतरंगातील व्यक्तता केलीय. लेखकांना हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून चरितार्थासाठी अंगमेहनतीची अनेक कामे करावी लागली. कष्टमय जीवन जगत असताना त्यांनी प्राणप्रिय जादुई लेखणीला पुर्णविराम न देता मिळालेल्या वेळेत अनेक कथा, कादंबरी, ललित लेख, प्रासंगिक लेख, विविध दैनिक वर्तमानपत्रांच्या पुरवण्यात सदर व समीक्षा लेखन केले आहे. यातील अनेक व्यक्तिंकथांना प्रसिध्दी मिळाली आहे. अनेक तळागाळातील माणसांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये त्यांनी कथांमधून गुंफलेले आहे.


निपाणी परिसरात जीवनचरितार्थासाठी भटकंती करणारी माणसं मामांच्या गिरणीत येत असत.लेखकाची पिठाची गिरणी आहे.

तिथं अवतीभोवतीची  माणसं,बाया दळप दळण्यासाठी येत असत.त्यावेळी मामांच्या सोबत झालेल्या गप्पांतून त्या माणसांच्या स्वभावाची,त्याच्या व्यवसायाची उकल त्यांना होत होती.अशा माणसांचे सूक्ष्मपणे निरीक्षण करून त्यांनी शब्दचित्रे बारकाईने रेखाटली आहेत.वाचताना तो दृश्यस्थळांचा माहोल  डोळ्यासमोर तराळतो.इतकं सामर्थ्य लेखणीत आहे.देहयष्टी,पुणे-बॅंगलोर हायवेचे वर्णन,विडी कामगारांची जगरहाटी,वर्गमित्रांच्या बालपण ते वृध्दावस्थांचा काळ, आजी,बायको,वडील, नातलग,गॅरेज,ट्रक आणि वडापगाडी यांना मध्यस्ती घेऊन तळागाळातील सामान्य लोकांच्या कथांचे बीजांकुरण त्यांनी केले आहे.


या कथासंग्रहात ४५ कथाबीज आहेत. 'आयुष्यात सुखद हिवाळे-पावसाळे कमी आणि वैशाख वणवेच जास्त येतात.त्याची दाहकता जाणवत राहते.त्यामुळे आपुलकीचं रोपटं फार काळ हिरवंगार राहत नाही.दोनचार वळीव सडकून पडल्यावर फोंड्या माळरानावर हिरवं सपान पडतं आणि समदीकडं हिरवेगार दिसतं'असं बहारदार वास्तव लेखन त्यांचे आहे.


'धंदा' कथेतील मिलटरीतून रिटायर झालेला संगाप्पा फाटका असून त्याच्या २५ रिक्षा वडापवर होत्या.त्याची ही कथा आहे. वडिलांच्या दोस्ताची गोपाळराव नावाची कथा त्याकाळातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देते. 'कारवाॅं गुजर गया' ही बेलपत्तारी समाजातील जगण्याचं अर्थकारण उलगडून दाखविणारी कथा आहे.दात कोरणं,कानकोरणं,चिमटं आणि लगामकड्या बाजारात विकणारी चल्लव्वाची. आई या कथेचं प्रतिनिधित्व करते.यातील पावसाचं वर्णन तर अप्रतिम आहे.फसवेगिरी करणाऱ्या भोंदूबाबा ची भंकस कथा. जंगलाच्या सानिध्यात असणाऱ्या पाड्यावरील लोकं जंगलातील झाडपाला,मुळ्या काढल्या यांचं अवशीद म्हणून निपाणीच्या बाजारात विकायला येणारा कोकण्या धनगराची 'वऽशीऽद'कथा तर डोळ्यातील गडं काढणाऱ्या शंकरची कथा.पार कलावंतीण,लाईटचा बल्ब चोर नामज्या,अस्वलाचा खेळ. दाखविणाऱ्या दरवेशाची कथा, गुरांच्या बाजारात खरेदी केलेली जनावरं खरेदीदाराच्या घरी हाकलत पोहचविणारा तुका.त्याची दर्दभरी कहाणी बिरडं.आदी कथांचं वर्णन अफलातून आहे.


लेखक व कादंबरीकार महादेव मोरे यांच्या सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनामुळे पुस्तक वाचून पुर्णविराम झाला तरी तरी या माणसांचे चेहरे वाचकांच्या मनात रेंगाळत राहतील.अन् यातीलच काही चेहरे आपल्या नजरेस पडल्यावर याच चेहऱ्यामागील चेहऱ्यांची  पुस्तकातील चेहऱ्यांची आठव येईल.ग्रामीण बाजाचं दमदार व प्रवाही लेखन शब्दचित्रात 

व्यक्त केले आहे.त्यांच्या सिध्दहस्त लेखणीस सादर प्रणाम!!!

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक- ५ मे २०२२






Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड