पुस्तक परिचय क्रमांक -१०३ आई समजून घेताना





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१०३
पुस्तकाचे नांव-आई समजून घेताना
लेखकाचे नांव-उत्तम कांबळे
प्रकाशक-लोकवाड्.मय गृह, मुंबई
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-छत्तीसावी आवृत्ती/ फेब्रुवारीवर्ष २०२१
पृष्ठे संख्या--१६०
वाड़्मय प्रकार-आत्मकथन  
किंमत /स्वागत मूल्य--३००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
१०३||पुस्तक परिचय
           आई समजून घेताना
लेखक:उत्तम कांबळे
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃श्यामची आई नंतर आईला उच्च स्थानी ठेवणारं अनमोल पुस्तक…... माणसाच्या आयुष्याच्या इतिहासात 'आई'एक सर्व श्रेष्ठ मूल्य आहे.एक प्रचंड ऊर्जास्रोत आणि संस्थानच आहे.का उन्मळून पडू लागली नाती?का सैरभैर झाली? आजच्या चौकोनी कुटुंबात तिला स्थानच नाही का? कुटुंबात मनात आणि घरातही नाही.पण याला अपवाद आहेत पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे. लौकिक अर्थाने आज समाजात स्वकर्तृत्वाने मानसन्मान, प्रतिष्ठा मिळविली आहे.ते वृत्तसेवेतील अग्रगन्य 'सकाळ'पेपरचे संपादक आहेत.पण त्यांचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत.

साहित्यिक विचारवंत व पत्रकार उत्तम कांबळे.गरीबीचे चटके आणि हाल अपेष्टा सहन करीत प्रतिभावंत शब्दप्रभू झालेले साहित्यप्रभू आहेत. ते  दैनिक सकाळच्या  रविवारच्या रंगीत पुरवणीत 'फिरस्ती' सदर लिहित होते.त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्‍या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.

राज्य सरकार व अनेक सेवाभावी संस्थानी साहित्य निर्मिती आणि पत्रकारितेतील उत्तुंग कार्याबद्दल दैनिक सकाळचे मुख्यसंपादक उत्तम कांबळे आणि त्यांच्या साहित्य कृतीवर पुरस्कार व सन्मानाची मोहर उठविली आहे.पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत १९९३ मध्ये त्यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी २०१२ सालापर्यंत एकूण ५३ पुरस्कार मिळालेले आहेत.तसेच 'आई समजून घेताना' या पुस्तकासाठी यशवंतराव चव्हाण साहित्यिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय उत्तम वाङ्‌मय पुरस्कार, वाङ्‌मय सेवा प्रकाशन पुरस्कार, नाशिक, स्वामीकार पुरस्कार, पुणे आणि माने गुरुजी साहित्य पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

'आई समजून घेताना'या पुस्तकाचा गौरव करताना आदरणीय भाई वैद्य म्हणतात की,''मॅक्झिम गॉर्कीची आई,साने गुरुजींची आई आणि उत्तम कांबळे यांची आई यांनी इतिहास घडविला आहे.आई प्रकाशासारखी असते.खग व खगोलशास्त्र यांनी कितीही उड्डाणे मारली तरी आकाश त्या पलीकडेच आहे.त्यामुळे आई समजून घेणे असाध्य आहे.
लहानपणी मला श्यामच्या आईने आणि प्रौढपणी इलंदा आक्काने (आई) रडविले.इलंदा आई आता सर्वांचीच आई बनली आहे.मला तुला,चोर न बनवायचं नाही.तू खूप शिकून मोठा हो.असं म्हणून धोका पत्करणारी इलंदा आई गगनापेक्षाही महान वाटते.आईने उत्तम कांबळे यांना घडवून साहित्य आणि समाज घडविण्याचे कामच जणू त्यांच्यावर सोपविले आहे. " स्वाभिमानी,करारी व शब्दाला पक्की असणारी, रोखठोक आणि कठोरपणे व्यक्त होणारी,अनेकदा उपाशीपोटी राहणारी, काबाडकष्ट करणारी इलंदा आई सर्वश्रेष्ठच आहे."पुस्तक वाचत वाचत रडताना खूप आनंद वाटला." असे सांगणारे अनेक भेटले हे लेखक उत्तम कांबळे यांनी 'आक्काचं अकरावं पाऊल'या आवृत्तीच्या लेखात नमूद केले आहे.

साहित्यिक उत्तम कांबळे यांचे 'आई समजून घेताना' हे आत्मकथनपर पुस्तक गुलबर्गा विद्यापीठात एम.ए. च्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहे. या पुस्तकाचे ब्रेललिपीत रूपांतर झाले आहे,तसेच कानडी भाषेत व इंग्रजीतही अनुवाद झाले आहेत."बघता बघता माझी आई शाळा,हायस्कूल आणि विद्यापीठाच्या बुकात जाऊन बसली.मला लिहायला,वाचायला शिकवणाऱ्या आईला, मी का लिहायला- वाचायला शिकवलं नाही,याविषयीची खंत भळभळणाऱ्या जखमेप्रमाणे माझ्या काळजात वाहतेय.सारा समाज साक्षर व्हावा यासाठी मी प्रयत्न करत होतो पण माझ्या प्रयत्नांच्या रडारवर आई कशी काय दिसली नाही."ही उद्वेग भावनेतून लेखक पुस्तक लेखनानंतर  व्यक्त झाले आहेत.असे अनेक वेचक वेधक निवडक वेचे आपणाला घटना प्रसंग वाचताना लक्षात येतात.आणि मनाला स्पर्शून जातात तेंव्हा आपणच आपल्या आईशी घडलेल्या प्रसंगाचे आंदोलन मनात रुंजी घालत राहते. भावना प्रधान करणारे अनेक प्रसंग संयमी शब्दात व्यक्त केले आहेत. 
"आयुष्याची पन्नास पानं उलटत उलटत मागं जाणं तसं महाकठीण… जेवढी पाणं उलटावी तेवढ्या जुन्या जखमा नव्याने चिघळायला लागतात…. माय तुकडा वाढ म्हणून पुन्हा कुणाच्या तरी दारात उभं राहावं लागतं.. दु:खाचं पुनर्भरण सुरू होतं..मी उलटली पानं
आयुष्याची पण कधी एकदा २००६च्या जून मध्ये परततोय असं झालं होतं.आता मी परतलोय.रिता झालोय..
 आमच्याकरिता उजेडवाटा घडविण्यासाठीच आयुष्यभर राबलेली आक्का स्वतःसाठी मात्र वर्तमान घडवू शकली नाही. तिचा इतिहास झाला नाही.एक तर तो व्यवस्थेने नाकारलेलाच होता. वर्तमान तर तिनं लेकरांसाठी गहाण टाकला होता.स्वत:चं भविष्यही ती लेकरांच्या भविष्यातच बघत होती.आम्ही सारे भरत गेलो.. ओव्हरफ्लो होत गेलो...हे सारे माझे शब्द नि अक्षरं, या सगळ्या वाटा तिने केलेल्या लढाईतून जन्माला आलेल्या….' शिकू नको. चल माझ्याबरोबर रोजालाच....' असं एकदा जरी आणि चुकून जरी म्हटलं असतं तरी माझं काय झालं असतं याची कल्पनाच करवत नाही…..'आई समजून घेताना' या शीर्षकाचा विषयच असू शकत नाही.हे खरं आहे...पण तरीही 'आई' समजून घेण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे.माझी आई लोकांसमोर व्यक्त करण्याची सर्वप्रथम संधी देणाऱ्या आणि त्यांचे वर्तमान व इतिहास घडवणाऱ्या 'सकाळ' वृतसमूहाचे,मित्रपरिवार आणि कुटूंबियांचे त्यांनी आभार मानले आहेत…..
सामाजिक स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर लेखक उत्तम कांबळे यांनी रेखाटलेलं  आईचं चित्रं विचार करायला लावतं.एका कष्टाळू आईचा जिद्दीचा प्रवास समर्थपणे
आणि वास्तवदर्शी आत्मकथा उलगडून दाखविली आहे.
एका संवेदनशील वृत्तीच्या मुलाने आपल्या आयुष्याच्या मध्यावर मावळतीकडे जाणाऱ्या आईला समजून घेण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.आक्का म्हणजेच इलंदा मातेला जीवनात  केंद्रस्थानी मानून विपरीत घटना आणिप्रसंगाचे चित्रण अतिशय भावस्पर्शी, हृदयस्पर्शी आणि संयमी शैलीत केलेले आहे. पुस्तकाचे वाचन करताना पानोपानी याची प्रचिती येते.आणि आपली आय आपल्या डोळ्यासमोर उभी राहून, आपल्या आयुष्याच्या जीवनपटातील वेदनादायी घटनांचे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. तत्काळ नेत्रं पाझरायला लागतात ओघळ गालावरुन वाहत येतो. आपलं चुक की बरोबर या विचारांचे वादळ काहूर माजवित राहते.. आपण आईला विनाकारण बोल लावले. त्याची चूक ही ममत्वाची शिदोरी वाचताना लक्षात येते. आपला कृतघ्नपणा लक्षात येतो. असे हे पुस्तक क्रियांची प्रतिक्रिया देणारे अक्षरशिल्प आहे.

ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली आक्का 'आई समजून घेताना'या पुस्तकात सलग अशा कुठल्याही घटना नाहीत.जे छोटे-मोठे ४१ प्रसंग आठवले तसे ,त्या क्षणांचे आईचे जगण्याचे तत्वज्ञान आणि लेखक उत्तम कांबळे यांच्या मनाची होणारी घुसमट, त्यातून प्रकटणारे ताणतणाव लेखकांनी मोठ्या संयमशीलतेने टिपून त्यांचे आई व मुलाचे शब्दचित्र मांडले आहे. त्यामुळे आईवर दाखवणारे, चिडणारे ,रुसणारे आणि तितकेच भावस्पर्शी मनाने प्रेम करणारे हळवे लेखक दिसतात.

आक्काचं वेगळं विश्र्व होतं.ते एका आईचं आहे. नात्याचं...जबाबदारीचं, आणि तिचा मुलगा यांच्यात नेहमीच  टकराव संघर्ष होत राहिला.तिच्या जगात जाऊन तीचं मन समजून घेण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. आणि त्याचा ताण मना-तनावर सतत होत होता.ते मनात आले की दरवाजापर्यंत जातात आणि तिथूनच माघारी फिरतात.कारण तिच्या मनाचा तळ शोधण्याचा,तसेच  थांगपत्ता शोधण्याची हिंमत नसल्याने ते तिला अडाणी ठरवतात.पण ती अडाणी असलीतरी भल्याभल्यांना हारहखायला लावणारे शहाणपण आणि व्यवहारज्ञान  तिच्याकडे आहे.कुठे-कसं वागावं याचं पुरतं भान तिला आहे…
या पुस्तकाचा गौरव अनेकांनी शब्दबध्द केला आहे.अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया, अभिप्राय या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत.परिशिष्टात 'आई समजून घेताना'या ग्रंथाच्या मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया व अभिप्राय आहेत. ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी या ग्रंथावर समीक्षा लेखन स्पर्धेतील मान्यवरांचे संक्षिप्त लेख रसग्रहण करायला उपलब्ध आहेत.तर नियतकालिके , दैनिकांत प्रसिध्दी लाभलेल्या लेखांचे हेडिंग्जही  'आई समजून घेताना' पिता -पुत्राच्या जीवनातील घटनांचा आलेख उठावदार करतात. आनंदवनातून डॉक्टर भारती आमटे यांनी पाठविलेले पत्रही या ग्रंथाचे लौकिक वाढविते.

खूप वेळ शोधत असलेली वस्तू अचानकनितळ पाण्याच्या तळाशी असल्याचं दिसावं आणि ती सापडल्याच्या आनंदात हात पुढे करावा तर एकाच लाटेत सगळं पाणी गढूळ व्हावं आणि हात तसाच लटकत रहावा.'आई समजून घेताना 'हे पुस्तक वाचताना अनेक वैचारिक वेचे आपणाला प्रभावित करतात.चिंतन-मंथन करायला लावतात…विचारांचे वैभव आहे. प्रत्येकाच्या संग्रही संघर्ष आणि जिद्दीने मुलांवर वास्तवतेचे चटके सहन करत आयुष्य वेचून मुलांना कसे घडविले त्याची ही आत्मकथा आहे.मातेचे ममत्व जाणायला आणि वैचारिक शिदोरी संचित करायला हे पुस्तक संग्रही असावं असे आहे.पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या लेखचीस आणि वाढीस आदरपूर्वक सलाम आणि त्रिवार वंदन!!!!

परिचयक-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक-८जानेवारी २०२२

"*"*"*"*"""*"*"*"*"*"*""*"*"""*"*"*"*"*"*"*"*"

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड