धन्यवाद दैनिक सकाळ:पाटीपूजन लेख
दैनिक सकाळ वृत्तसेवा सातारा आवृत्तीत साप्ताहिक शब्दांकुर पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख.
आदरणीय अप्पा आपले आणि दैनिक सकाळ वृत्तसेवा तसेच शब्दांकुर साप्ताहिक पुरवणी संपादन समन्वयक प्रशांत घाडगे, आणि रचनाकार मदन इंदलकर आपणास कृतज्ञतापूर्वक धन्यवाद🌹🤝🙏🏻
🍁आदरणीय अप्पा आपले आणि दैनिक सकाळ वृत्तसेवा समूहाचे हार्दिक आभार.लिहित्या हातांचा गौरव करणारं आपलं कार्य.आपण जनमानसात लोकप्रिय असलेल्या दैनिक सकाळ वर्तमानपत्रात माझ्या लेखास प्रसिध्दी दिल्याबद्दल धन्यवाद!🌹🙏🏻
'पाटी पूजन'
उन्हाळ्याचं आवातनं द्यायला वसंत ऋतूचे आगमन झालेलं असतं.वृक्षांची पानगळ होऊन नवीन पालवी फुटलेली असते.नव्या टवटवीत फर्णसंभारात कडुलिंबाची झाडे मनोवेधक दिसतात. तर देवचाफा नखशिखांत बहरलेला असतो.तर बहाव्याला पिवळीशार झुंबरं लगडायला सुरुवात झालेली असते.अन् काटेसावरीचा गुलाबी शेंदरी तांबडा अन् पिवळया रंगांचा फुलांचा बहार जाऊन हिरव्या केळीसारखी फळे लगडलेली असतात.मोगऱ्याच्या फुलांचा सुवास दरवळत असतो.चैत्र प्रतिपदेपासून शालिवाहन शके सुरू होते.समस्त हिन्दू बांधवांचे नववर्ष गुढीपाडवा या सणाने सुरू होते.नववर्षाचा शुभारंभ आणि शाळा विद्यालयांचे अनोखे नाते आहे.विद्येची देवता सरस्वती देवीचे पूजन,पाटीपूजनाने गुढीपाडवा आणि दसऱ्याला केलं जायचं.
पुर्वी परंपरागत गुढीपाडव्याच्या सणाला खेडेगावातील शाळेत 'पाटीपूजनाचा' कार्यक्रम आयोजित केलेला असायचा. पहिलीच्या वर्गात याच दिवशी मुलांची नोंद व्हायची आणि त्याला पोरग्या ऐवजी विद्यार्थी बिरुदावली चिकटायची.अ आ इ ई अक्षरांनी मुलांच्या आयुष्यात ज्ञानसाधनेचा श्रीगणेशा सुरु व्हायचा.
आदल्या रात्री लिहायच्या पाटीवर कोळसा उगाळून नंतर पाण्याने स्वच्छ केली जायची.मग त्याच्यावर पेन्सिलने सरस्वतीचे प्रतिक,चंद्र,सुर्य आदी चित्रे, आईवडील किंवा मोठ्या बहिण भावांंकडून रेखाटले जायचे.पाडव्याला घरची गुढी उभारल्यानंतर मुले चाफ्याची फुले,पाटी, दक्षिणा, तांदुळ, गुळ-खोबरे घेऊन शाळेकडे पळत सुटायची.
शाळेत आल्यावर गुरुजींनी फळ्यावर विद्येची देवता सरस्वतीचे प्रतिक रेखाटलेले असायचे.सगळ्या मुलामुलींच्या व्हरांड्यात ओळी केलेल्या असायच्या. आणि मग गुरुजी जसे सांगतील त्याप्रमाणे पाटीची पूजा मुले करायची.पाटीची पूजा करताना सरस्वतीची प्रार्थना आणि श्लोक म्हटले जायचे. गुळखोबरे किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. आई किंवा वडिलांनी दिलेले पैसे दक्षिणा म्हणून पाटीवर ठेवायचे.असा पाटीपूजनाचा छोटेखानी समारंभ शाळेत साजरा व्हायचा.
त्या पाटीचे ममत्व आजही पाडवा आणि दसऱ्याला काळीजकप्पातून हमखास डोकावते.बालपणीचे शालेय जीवनातील पाटीचे हिंदोळे मनी हेलकावत राहतात. पाटीवर पेन्सिलने मुळाक्षरे, चित्रं आणि संख्या गिरविताना ते चुकले म्हणून पुसताना पाटीवर थुंकी टाकून पुसणे किंवा हातांनी साफ करताना गुरुजींचा ओरडा नाहीतर पाठीवरचा रपाटाधपाटा आजही आठवतो.चिंधी(पाटी पुसण्याचा कापडाचा तुकडा) किंवा स्पंजने पाटी स्वच्छ करायला कितीदादा सांगितले तरी पटकन थुंकी टाकायची आणि झटकन हात फिरवून लगेच लिहायला सुरुवात व्हायची.पण चिंधीने पाटी स्वच्छ करायचं साफ विसरलं जायचं.
पाटीवर गिरवत गिरवत लहानाचे मोठे होत गेलो.तदनंतर इयत्तेची एकेक पायरी पुढे गेल्यावर दौतटाक,शाईपेन, बॉलपेन आणि वहीतल्या कागदाने पाटीची जागा घेतली. पण लगेच पुसून पुन्हा नव्याने लेखन उमटविण्याची खरी कला पाटीवरच होती. मराठी शाळेत तर पाचवीपर्यंत श्रुतलेखन, अभ्यास (गृहपाठ), अनुलेखन, चित्रकला, गणितं सोडविणे, रांगोळी, बैठे खेळ आदी कृतीशील लेखी अध्ययन पाटीवरच व्हायचं.सुवाच्य मोत्यासारखे टपोरे आणि वळणदार दुरेघीतील अक्षरलेखन उठावदार दिसायचं.
पाटी ही खापराच्या (दगडाची), पत्र्याची किंवा कार्डबोर्डची असायची.काही पाट्यांच्या निम्म्या भागात तारेत ओवलेले मणी असायचे, त्यामुळे ती आकर्षक दिसायची.ते रंगीबेरंगी मणी गणती करायला उपयोगी पडायचे.काही पाट्यांना एका बाजूला दुरेघी आखलेली असायची. तेंव्हाही पाटीचा ब्रॅण्ड होता 'राजा स्लेट'
'शाळा सुटली,पाटी फुटली,आई मला भूक लागली,भूक लागली..'असं गाणंही शाळा सुटायच्या वेळी गुणगुणत काहीजण घराकडे पळत सुटायचे.पाटीची जागा आता मॅजिक स्लेट ते टॅब अशी झाली आहे. याच्यावर तर केवळ रेखाटन न करता; कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल तर पाहिजे ते आपण वाचू लिहू ऐकू शकतो.हे तर कमालीचे कुतूहल वाढवते.काहीवेळा पाटीवर केलेला गृहपाठ पुसला जायचा. त्यामुळे शाळेत अभ्यास दाखविताना पुसल्याने ओरडा पडायचा नाहीतर छडीचा प्रसाद मिळायचा.आयुष्याच्या पहिल्या वळणावर साक्षर करणारी ही पाटी. तिच्यावर आपण गुरुजी आणि बाईंनी सांगितलेले गिरवत राहत होतो.
मनाच्या पाटीवर अनेक सुखदुःखाचे आणि चांगल्या वाईट प्रसंगातील नेमके त्यातले वाईट प्रसंगच सतत मनातल्या पाटीवर घोळत राहतात.ते पुसले जात नाहीत तर मनात गिचमिड करून राहतात. ते घालवायला कुणापाशी तरी मन मोकळं करावं लागतं.
जेष्ठ साहित्यिक बाबा कदम यांनी तर 'शाळा सुटली पाटी फुटली' या नावाने कादंबरी लिहिली आहे. पुणेरी पाट्या तर जगभर प्रसिद्धआहेत.मुलींच्या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जीवन शिक्षण मासिकाच्या मुखपृष्ठावर ''पाटी डोक्यावर नको, हातात द्या.'' या प्रबोधनात्मक विचाराचे समर्पक चित्र रेखाटलेले होते. पाटी साक्षरतेची,पाटी ओझ्याची, पाटी शाळेची.पाटी दुकानांची,पाटी सुविचारांची, पाटी प्रवासातील दर्शिका, पाटी सिनेमाची,पाटी एसटीची (पुणे-नाशिक) जगरहाटीत अशा अनेक पाट्या कळतनकळत आपण वाचत जातो.पण स्मृतिपटलावर कोरलेली शाळकरी वयातील ''खापराची पाटी'' कायमच स्मरणात राहते.'शाळा सुटली पाटी फुटली',आई मला भूक लागली 'या ओळी गावातल्या शाळेजवळून शाळा सुटायच्या वेळी मुलांचा गलका बघितल्यावर ओठांवर रुंजी घालतात…
श्री.रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
[07/04, 8:12 am] pratibha lokhande:
ReplyDeleteस्मरणगंध कायम दरवळत राहणार...अप्रतिम लेख बंधू👌👌इतरांचे उसनवारी घेऊन लिहिणाऱ्यांच्या पंगतीतले आपण नव्हेच.आपणास जन्मतःच लाभलेली ही देणगी आहे.आपला प्रत्येक शब्द वाचकांच्या मनात उतरतो.खूप खूप अभिनंदन.आपण समूहाचे सहसंयोजक आहात याचा सार्थ अभिमान आहे.💐💐💐💐
[07/04, 12:01 pm]
Anjali ghodase: प्रत्येक साक्षर होणाऱ्या माणसाचे आयुष्यात पाटी आणि पाटीपूजन हे येतच असतात . आजच्या मुलांना पाटी पूजनाचे महत्त्व माहीतच नाही . पण एक शिक्षक या नात्याने आपण अजूनही या पाटी पूजनाचे महत्त्व आपल्या मुलांना आपण देऊ शकतो . आदरणीय लटिंगे दादा यांनी पाटीपूजनाचा इतिहास मांडून भविष्यही या लेखातून मांडलेला आहे . खरोखर त्यांच्या लेखणीला तोडच नाही . मनात उतरलेलं ते त्यांच्या पाटीवर गिरवत गेले आणि मोत्यांनी ते आपल्यासमोर उमटत गेलं . अतिशय सुंदर असा हा पाटीपूजनाचा अलौकिक लेख आम्हा सर्व वाचकांना एक वेगळीच मेजवानी देऊन गेला. आपले खूप खूप धन्यवाद तुमच्या पाटीचा स्मरणगंध कायम आमच्या स्मरणात राहील .🙏🏻😊✒️💫
धन्यवाद
ReplyDelete