पुस्तक परिचय क्रमांक:१३४ जागल्या
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१३४
पुस्तकाचे नांव- जागल्या
लेखकाचे नांव- दया पवार
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस , पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण: फेब्रुवारी,२०१७
पृष्ठे संख्या–१००
वाड़्मय प्रकार- कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१३४||पुस्तक परिचय
जागल्या
लेखक: दया पवार ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
दलितांच्या जीवनाची वेगळी ओळख अधोरेखित करणाऱ्या 'बलुतं ' या आत्मचरित्राचे चरित्रकार पद्मश्री, लेखक दया पवार यांचा हा कथासंग्रह….या पुस्तकास महाराष्ट्र शासनाने १९७९ साली पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.त्यांनी
साहित्य चळवळीचे कार्य करताना आलेल्या दु:खाच्या झळा, समाजातील उपेक्षितांच्या जगण्याचे प्रतिबिंब 'जागल्या' पुस्तकातून आपल्या मनूचक्षांवर रसग्रहण करताना उमटत जाते.त्यांनी यातील कथांमधून बडेजावीला फटकारले आहे.वास्तवदर्शी घटनेतून समाजात उमटलेले पडसाद त्यांनी टिपून त्यावर भाष्य रोखड शब्दात केले आहेत.
विविध प्रकारच्या अनुभवांचा साठा या कथासंग्रहातून वाचायला मिळतो.या अनुभवातील दु:खांची झळ वाचकांपर्यंत पोचूनही मांडणीत ऊरबडवा आक्रोश दिसत नाही.लेखकांनी वेळोवेळी केलेले स्तंभलेखक आहे.यामध्ये सामाजिक बांधिलकीचे सूत्र आहे.'जागल्या'चा तोंडावळा तसा गावरानी ढंगातला दिसतो. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा चिकित्सक दृष्टीकोन समजतो.त्यांनी त्या घटनेवर केलेले स्टेटमेंट या कथांमधून दिसतो. मुखवट्या मागील चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. साहित्यिक दया पवार यांच्या साहित्यकृतीचा आवाकाही नजरेत भरणारा आहे.
जागल्या म्हणजे समाज निद्रिस्त अवस्थेत असताना जागं राहून घडलेल्या पाहिलेल्या घटनांवर रोखठोकपणे विचार व्यक्त करणं.लेखकाच्या लहानपणापासून हा जागल्या त्यांच्या मनात दडून बसलेला असतो. मनात येईल ते सरळ बोलावे.कुणाच्याही दबावाखाली वावरु नये.अशी माणसे त्यांनी खेड्यात पाहिलेली.पुढे माणूस जसा मध्यम वर्गात येतो.तसे त्यांच्या सर्वच वृत्ती कासवाच्या अवयवासारख्या आकुंचित होतात.जागल्याचा विनोद उपहासाने समाज मनावर खरमरीत अंजन घालणारा आहे.बोचरा आहे.आपले समाजमन किती बंदिस्त आहे,याचीही प्रचिती यातील कथा वाचताना लक्षात येते.या कथासंग्रहात एकूण एकतीस कथा शब्दबध्द केल्या आहेत.
कथामालिकेतून वंचितांच्या अन्याय,अत्याचार ,उपेक्षित आणि दुरावा प्रकट होतो.सहावा पांडव या कथेत जांभुळ आख्यान या नाटकातून महाभारतातील व्यक्तिरेखा उलगडते. बलुत्यातल्या सटवावर आणि गुरुजींच्यावर भाष्य केले आहे.पायातील दगड या कथेतून स्वातंत्र्य सैनिकांवर व्यक्त होणारी कथा आहे.दलित चळवळीचा इतिहास सांगणारी गरिबी हटाव कथा आहे.जाती आणि धर्माच्या भिंती ओलांडून लग्न करणाऱ्या पोरांची कथा 'लगीन'.एका सोयऱ्याच्या लग्नाची कथा ग्रामीण ढंगात वास्तवदर्शी शब्दात व्यक्त केली आहे.
टि.व्ही.आणि त्यावरील प्रक्षेपित होणारे कार्यक्रम यावरचे भाष्य 'डबडं'कथेत प्रस्तुत केले आहे.शहरातील लेखक-कवी मंडळींपुढे झोपडपट्टीतील महिलांचे अनुभव 'साळाबाहेरची साळा'या कथेत मांडलेली आहे.तर देशभक्ती जागृत करून दाखविणारी कथा कळसाला गिलावा ही कथा आहे.जगात कुठेही गेले तरी जातीची उतरंड असतेच.तेच अधोरेखित करणारा सिनेमा 'मिसीसिपी मसाला'.कार्यव्यस्ततेत राहून आवडीने जीवन सुखासमाधानाने कसे जगावे हे सांगणारी कथा म्हणजे 'तुकाराम'.साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची दर्दभरी दास्तान 'जग बदल घालूनी घाव'या कथेतून उलगडून दाखविली आहे. समाजातील त्यांच्याच जवळच्या लोकांनी त्यांना कसं लुबाडलं. याचं विश्लेषण या कथेत आहे.खरच कलावंत इतिहास घडवितो.हे अधोरेखित करणारा हा लेख आहे. जुनून,फराळ,सायकलवाला,आंधळं दळतंय…,भीमराज,बुगडी माझी सांडली गं, खेळ, चिलखत निधी, रिकाम्या जागा, भारत सुंदरी या कथाही मनात विचारचक्र फिरवतात.
सुंदर शब्दात आणि सहज सुंदर शैलीत यातील कथांचे लेखन कलम बहाद्दूर दया पवार यांनी केले आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे वाई सातारा
छान पुस्तक परिचय करून दिला आहे.अभिनंदन!
ReplyDeleteधन्यवाद आदरणीय सर
ReplyDelete