पुस्तक परिचय क्रमांक:१३२ धना
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१३२
पुस्तकाचे नांव-धना
लेखकाचे नांव- पै.गणेश मानुगडे
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस , पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जुलै २०१८,पुनर्मुद्रण: डिसेंबर २०१८
पृष्ठे संख्या–१३२
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--१८०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१३२||पुस्तक परिचय
धना
लेखक: पै.गणेश मानुगडे ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
देशभक्ती,कृस्ती आणि प्रेम यांच्या वलयात सापडलेल्या पहिलवान धनाच्या संघर्षाची उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक कथा आहे.
सोशल मीडियाच्या आभासी पटलावर पैलवान गणेश मानुगडे 'मल्लविद्या' नावाने फेसबुकवर लाल मातीतल्या अस्सल जिगरबाज मल्लविद्येतील अभुतपूर्व थरारक पर्वाची महती प्रकाशित करतात.त्यांचे जगभरातील वाचक फॉलोअर्स सत्तर लाखांपेक्षा जास्त आहेत.
त्यांच्या या उपक्रमाला दाद ७०पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरविलेली आहे.सन्मानित केले आहे.मल्लविद्येवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
अत्तर,मित्र, चरित्र आणि चित्र यांना कोणत्याही ओळखीची आवश्यकता नसते.कारण या चारही गोष्टी आपली 'इमेज' स्वतः आपल्या अंतरंगाने इतरांना करून देत असतात.
चित्तथरारक 'धना'कादंबरीचे रसग्रहण करताना अक्षरशः आपण कुतूहलाने तिच्या प्रेमातच पडतो.पहीलवान असलेला धना आणि तालेवार सर्जेरावाची कन्या राजलक्ष्मी यांच्या प्रेमाची ही कहाणी आहे. नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य समद्या गावाला दाखवतो.त्यात तो जायबंदी होतो.वाघाच्या मृत्यूची इनक्वायरी करायला वनाधिकारी सूर्याजी येतो.धना आणि राजलक्ष्मीचे प्रेम पाहून तो बिल्ला पहिलवाशी कुस्ती लढाईला राव वस्ताद, तालेवार आणि सर्जेराव यांच्या आग्रहाखातर तो तयार होतो.अचानकपणे इस्पितळातून धनाला यशवंत राज्यांचे सैन्य गायब करून जंगलातील किल्ल्यात घेऊन जातात.तिथं राजे धनाला त्याच्या पिताजींचे कर्तृत्व सांगतात. तदनंतर थरारक घटना प्रसंग घडत असतात.
निसर्गरम्य गाव,बांधीव तालीम,तालमीतील कुस्तीच्या सरावाची कसरत…कुस्त्यांचे मैदान…हलगी घुमकं यांचे मर्दानी स्वर, कुस्ती शौकिनांची दाद, टाळ्या, शिट्ट्या आणि आरोळ्या.धनाची-राजलक्ष्मीची भेट, पाणीदार डोळे.नाजूक स्मितहास्य… धनाचा मैदानावर झालेला अपमानास्पद पराभव.नरभक्षी वाघाची जीवघेणी डरकाळी…तो रक्ताचा फवारा..त्यावेळी सूर्याजीची छावणी… बिल्ला विरुद्ध सूर्याजीचे लढणे. खासबागेतील कुस्तीची लढतीत सूर्याजी विरुद्ध बिल्ला म्हणून धनाचे लढणे.अचानक स्फोट होऊन हत्तीचे बिथरणे.गोळीबार होऊन मैदानात सगळे सैरावैरा पळतात.राजे या घटनेमुळे फौजेचे जंगलातून दोन वर्षांसाठी आंध्रप्रदेश आणि राजस्थानमध्ये परागंदा होण्याचे ठरविले जाते.तदनंतर जंगलातील राजे आणि शेलारमामा यांच्या फौजेविरुद्ध वनरक्षकांची लढाई,गावातील लोकांचाही लढाईत सहभाग अन् शेवटी धना आणि राजलक्ष्मीची भेट आणि दुर्दैवी अंत.अश्या साहसी घटनांमधून या कथेचे रहस्य उलगडत जाते.
अतिशय भावस्पर्शी आणि समर्पक शब्दात या कादंबरीचे लेखन पहिलवान गणेश मानुगडे यांनी केले आहे.वीस प्रकरणात ही कथा गुंफलेली आहे.तांबडी माती,मुकी जखम,झुंज दोन वाघांची,सूर्याजी, सातारा ते कोल्हापूर, आशेचा किरण, सह्याद्री,राजे यशवंतराव, नि:शब्द हुंकार, देशभक्तांचा मळा, खासबाग, मल्लविद्येचे सु-दर्शन, साठमारीत,निर्जीव उसासे,शेलारमामा,सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, अरण्यातील धुमाकूळ, भूतकाळातील पाने,धनाचे ठाणे या शीर्षकाखाली संघर्षमय आणि रहस्यमय कादंबरीचे कथानक उलगडते.अतिशय वाचनीय अशी कादंबरी आहे.
सहज सुंदर शैलीत या कादंबरीचे लेखन पहिलवान गणेश मानुगडे यांनी केले आहे.
आस्वादक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment