हुरडा पार्टी






               गावाकडची हुरडा पार्टी 

माघ आणि फाल्गुन महिन्यात शेतकऱ्यांची शेतातील कामांची लगीनघाई असते.शाळूच्या रानावर पाखरांचं थवं दिवसभर पोटऱ्यातील कणसातलं चिकाळू कोवळं दाणं खायला घिरट्या घालत असत्यात. राखण करायला शेतात माळा (मचाण) घातलेला असतो.तिथं ऊभं राहून गोफणीने ढिकळं नाहीतर दगड भिरकावत अन् तोंडानं आरडतवरडत राखण चाललेली असते.काहीजण उन्हातान्हात राखण करायला लागू नये म्हणून पाखरांना भिववण्यासाठी बुजगावणी उभारतात तर काहीजण जुन्या निकामी ऑडिओ कॅसेटमधील प्लॅस्टिक रीळ चोहीकडे लावत तर काहीजण प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी पिशव्या नाही तर पत्र्याचे डबे बांधावरल्या झाडाला टांगत.वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रिळं आणि पिशव्या नाचकाम करताना त्यांचा वेगळाच फडफडता आवाज ऐकायला यायचा.त्या आवाजाने पाखरं शाळूच्या पिकाकडे फिरकत नसत.तर कुणाच्या ऊसाला तोड आलेली असते.तर कुणाच्यात हळद काढणी,शिजवणी आणि वाळविणीच्या कामाची धांदल उडालेली असते.

काहींचा ऊस गुऱ्हाळाला न्यायचा असतो.काहींचं गव्हाला पाणी पाजायचं काम असतं.

तर काही ठिकाणी शिवारात हरभराऱ्याचं घाटं भरायला सुरुवात झालेली असते.त्या वावरापसनं जाताना एखादा डहाळा उपटून लुसलुशीत हिरवेगार हरभरे खाताना मस्तच वाटतं. एकेक घाटा दोन बोटांनी सोलून खायचा नाहीतर घाटा दातांनी सोलून खायचा. हरभरा खाताना डहाळ्याच्या घाट्याची आंब हाताला आणि ओठाला लागून चुणचणतं म्हणून मग विहीरवरील पोटपाटाच्या पाण्यात तो ओला करून मग खाण्यात मजा वाटते. असला रानमेवा चाखायला मिळणं म्हणजे शेत नसणाऱ्याला खाण्याची मोठी पर्वणीच लाभते.

  महाशिवरात्रीच्या दिवशी भल्या पहाटे मित्रांच्या संगतीने सोनेश्वरला कृष्णामाईच्या डोहात डुंबायला जायचं.यथेच्छ पोहून झाल्यावर ओल्यावस्त्रांनिशी महादेवाचं दर्शन घ्यायचं.आंब्याचा मोहर पिंडीला अर्पण करायचा.तदनंतर कापडं बदलून चालत चालत घराच्या वाटेला लागायचं. शिवारात सगळीकडे हिरवेपिवळे पिकांचे पट्टे दृष्टीस पडायचे.मग कुणाचा हरभरा भरलाय, कुणाच्या ऊसाला तोड आलीय, कुणाचा ऊस गुऱ्हाळघरावर गाळायला गेलाय, नाहीतर कुणाच्या वावरात गाजरं भरल्यात,तर कुणाच्या रानातली कणसं हुरड्यात आल्यात यावर चालताना बोलणं व्हायचं. मग ज्याच्या रानात शाळूची कणसं हुरड्यात आली असतील त्याला गळ घालून आमचा हुरडा पार्टी कशी करायची याचा बेत आखायचं प्लॅनिंग सुरू व्हायचं.त्यासाठी रविवारचा दिवस ठरायचा.कुणी कुणी काय जिन्नस आणायचं ते ही ठरवलेलं असायचं.

एखाद्या रविवारी दुपारची कलती उन्हं अंगावर घेत आमची पाचसहा जणांची टोळधाड रफेट करत  माचावरील भाऊ पाटलांच्या वावरात पोहचली. चालताना वाटेत दिसलेली वाळलेल्या शेणाची खांड गोळा करून घेतली होती. हुरड्याबरोबर चाखायला तिखट चटणी, दही,शेंगदाण्याची चटणी,मिरचीचा खर्डा, शेंगदाणे,लिंबं,गुळाचे खडे, खोबऱ्याची नाहीतर लसणाची चटणी असं जिन्नस आईला गळ घालून प्रत्येकाने यापैकी घरात असलेली आणलेली असायची. माहितगार दोघंतिघं विळा घेऊन हुरड्यात आलेली कणसं लागलीच खुडून आणत. काहीजण तिथंच हिकडंतिकडं फिरुन आणखी खांडं जमवायचीत.तर थोडीशी जागा चोखळून खड्डा बनवायचा.त्यात  जमवलेली खांडं रचून आगोटी पेटवायची. आणि थोडीशी खांड पेटती झाली की त्यात खुडलेली कोवळी व रसदार कणसं भाजायला ठेवायची.मग सगळ्यांनी सोबत खायला काय काय सरजाम आणलय?तो कागदावर, ताटलीत नाहीतर भांड्यात उघडून ठेवायचा.मग काही वेळाने खरपूस कणसं भाजली की एका पोत्यावर ठेवून हातांनी घुसळायची (चोळायची) नाहीतर हातात घेऊन रगडायची नाहीतर चोळायची.पडलेले दाणे एका ताटलीत जमा करायचे.एक दोघांनी ते हातात घेऊन त्यावर फुंकर मारुन त्याच्याबरोबरची राख आणि बोंडं बाजूला करायची.आणि मग कोवळा लुसलुशीत गरमागरम हुरडा ताटलीत काढून ठेवायचा.आणि मग मूठमूठभर घेऊन चवीने खायचा. आवडीप्रमाणे पाहिजे त्या चविष्ट जिन्नस बरोबर मनसोक्तपणे हादडायचा. आमचं भाजणं, चोळणं आणि बोकाणं भरणं सुरू असायचं.कोवळा गोडसर हुरडा आणि साथीला तिखट चटणी,आंबट दही आणि गोड गुळ अशी आंबटगोडतिखट चव चाखली जायची. हुरडा मनमुरादपणे खातच राहायचो. या फक्कड बेताबरोबर गप्पाही रंगायच्या. भाजलेल्या सगळ्या हुरड्याचा फडशा पाडायचा.मग कुणाला तरी हुकी यायची. जवळपास हरभरा,मक्याची कणसं कुणाच्या वावरात आहेत का?हे धुंडाळायला जायाचित.तवर आमचं हिकडं हुरड्याचा तोबरा भरणं चालूच असायचे.काही वेळाने मघाशी गेलेले मैतर वाळलेल्या हरभऱ्याचे डहाळे आणि हिरवी मक्याची कणसे घेऊन आलेले होते.मग आगोटीतल्या शेणकुटाच्या निखाऱ्यात कणसांचा पाला सोलून काढून कणसं भाजायला ठेवली. थोडं चगाळ व पालापाचोळा गोळा करून आग पेटविली.आणि पेटत्या जाळावर  हरभऱ्याचे डहाळे होरपळले.हुरडा खाऊन झाल्यावर मग आम्ही भाजलेल्या कणसांना तिखट लावून त्यावर लिंबू पिळून जसे पांचगणी महाबळेश्वरला  पर्यटक भाजलेली कणसं हातात धरून खातात तसं खायला लागलो. गरमागरम लुसलुशीत मकई खाण्याची मजाच भारी.

तवर होरपळलेल्या हरभऱ्याचा 'हावळा' तयार झाला होता.त्याच्या सभोवती फेर धरून बसलो.एका काठीने राखमिश्रीत माती आणि घाटे पसरुन घेतले.आणि त्यातील भाजलेले घाटे हरभरे वेचून वेचून तोंडात टाकायला लागलो.एकदम खरपुस भाजलेले वाळके हरभरे फुटाण्या सारखे लागत होते.तर काळे झालेले घाटे सोलून त्यातील पिवळे हिरवे हरभरे चवदार लागते होते.हुरडा खाता खाता हावळा आणि मकईही खायला मिळाल्याने विस्तवावर भाजलेला चटकदार रानमेवा खायला मिळाल्याने क्षुधा शांत झाली. तृप्तीचा ढेकर देऊन,पोट भरल्याची जाणीव झाली. निसर्गातला हा अस्सल रानमेवा…याची सर कोणत्याच फास्ट फूडला नाही.खाण्यातली फक्कड जिभेवर रेंगाळत राहणारी चव… निसर्गाने दिलेलं स्वस्त,पोषक आणि मुबलक खाणं.

कालौघात पिझ्झा बर्गरच्या आणि हॉटेलिंगच्या जमान्यातही कोवळ्या लुसलुशीत खमंग पौष्टिक हुरड्या पार्ट्यांनाही चांगले दिवस आले आहेत. मैत्री ट्रीप, घरगुती बेत आखला जात आहे.सोलापूर पुणे आणि अहमदनगर भागात तर यासाठी सुगीच्या या हंगामात अनेक ठिकाणी 'कृषी पर्यटन' सुरू असते.अगदी वर्तमानपत्र,फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटस्अपवरुन मेजवानीच्या जाहिरातींची खवय्यांसाठी   रेलचेल असते.हल्ली बरेच शेतकरीसुध्दा सिझनला हुरडा पार्ट्यांचे आयोजन करतात.रुटीन लाईफ पासून विरंगुळा म्हणून कामाचा क्षीण घालवायला, एकत्र जमतात. खमंग ताजा कोवळा हुरडा खाण्याची लज्जत न्यारीच असते.हल्ली शहरात हा हुरडा विकतही मिळतो.तर काही बचतगट ज्वारीचा हुरडा तयार करून तो वाळवून  त्यांचे पौष्टिक पदार्थही हमखास बनवितात. परंतु बालपणी दोस्तांच्या संगतीने घडलेल्या हुरडा पार्टीच्या मेजवानीची चव सरसच ठरते.



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड