पुस्तक परिचय क्रमांक:११८ नांगरणी






📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚

११८||पुस्तक परिचय

          नांगरणी

लेखक: आनंद यादव 

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-११८

पुस्तकाचे नांव--नांगरणी 

लेखकाचे नांव- आनंद यादव

प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण जुलै, २०२१

पृष्ठे संख्या--३४४

वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र, दुसरा खंड

किंमत /स्वागत मूल्य--३७०₹

"""""""""""""""""""""""""""""""

             नांगरणी

कणखर सकसता आणण्यासाठी भूमीनं स्वत:वर धारदार अवजारांची आडवे उभे घाव घालून घेणे आणि सूर्यभट्टीत अंतर्बाह्य होरपळणे म्हणजे नांगरणी.

उत्तम पिकांच्या समृद्धीसाठी शेतमळ्यांवर हिरवीगार साय साकळावी; अंगाखांद्यावरच्या गाईगुरांना, माणसा काणसांना, किड्यामुंग्यांना, चिमण्या-पाखरांच्या इवल्या चोचींना मूठमूठ-चिमूटचिमूट चाराचणा मिळावा; म्हणून भूमीतल्या मातीनेस्वता:ची सोशिकपणे केलेली उरस्फोड म्हणजे नांगरणी.

इच्छा-आकांक्षांची पूर्तता करणारा पाऊस कृपावंत होऊन पडावा म्हणून तहानलेल्या पृथ्वीनं लाभलेली चोच म्हणजे नांगरणी.

"नांगरणी म्हणजे हिरव्या चैतन्याला जन्म देऊ पाहणाऱ्या सर्जनोत्सुक भूमीची घुसमटणारी निर्मितीपूर्व करुणावस्था."

उच्चशिक्षणाच्या ध्येयासाठी घरातून पळून जाणारा अवलिया एखादाच असतो. शिक्षण घेण्यासाठी कांहीही करायला एका पायावर तयार होतो; अन् वसतिगृहात राहून,थोरामोठ्यांच्या धनाच्या मदतीने आणि स्वकष्टातून एम.ए.होऊन साहित्यिक होतो.ते बहुजन समाजातील 'कागल ' कोल्हापूरचे सिध्दहस्त साहित्ययात्री आनंद यादव …..

        ज्यांच्या कविता महाराष्ट्राचे लाडकं प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांच्या मुखातून प्राचार्य भावे,सुनीताबाई आणि कवीला श्रवण करण्याचे परमभाग्य लाभले.आपल्याच कवितांचे श्रावक कवी आनंद यादव झाले. "साहित्यातील माझे पहिले नामभिधान 'हिरवं जग आनंद यादव,' करुन कविता फेअर करायला पाच रुपये बक्षीस  दिले.तेथेच प्रथम माझ्या साहित्याला परिसस्पर्श झाला. लेखणीला आत्मविश्वास मिळाला." असा आवर्जून उल्लेख करतात.

खेड्यातील समाजमनाचा वेध घेणारे आणि अस्सल गावरान मातीचा अनुभव आपल्या लेखनातून मांडणारे प्रतिभासंपन्न ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉ.आनंद यादव यांचे द्वितीय आत्मचरित्र'नांगरणी'....

घरातल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्चशिक्षण घेऊन आपल्या कुटूंबाला सुखाचा घास मिळवण्यासाठी घेतलेला ध्यास मोठ्या जिद्दीने उमेदीने साकार करण्यासाठी त्यांना कोणकोणत्या हालअपेष्टा,अवहेलना सहन कराव्या लागल्या.अग्निदिव्यातून परीक्षा कश्या द्याव्या लागल्या. त्याची दर्दभरी दास्तान 'नांगरणी'या आत्मचरित्रात मळ्यातील हिरव्या गार पीकांसारखी,बांधावरल्या वृक्षलतातृणां सारखी,खेड्यातलं घरपण जपणाऱ्या भावंडांंसाररखी,गावच्या तीर्थासारखी आणि आईदादाच्या कष्टमय प्रपंच्याची कहाणी रेखाटली आहे. 

प्रत्येकाची जीवनाकडे मार्गक्रमण करणारी अशी एक वाट असते.काहींची सरळ,धोपट, अनवट,मळलेली,काहीची वळणावळणांची तर काहींची अनवट,अडीअडचणींची लेखकाचीही एक वाट काट्याकुट्यांनी भरलेली.दगडधोंडे आडवे येणारी,दु:खाच्या खाचखळग्यांनी भरलेली तरीही पुढे जायला प्रवृत्त करणारी.उमेद न करणारी, तरीही पुढे जायचंच या कल्पनेने झपाटलेला जीव काटेरी मार्गाची वाट त्या झपाटलेपणामुळं सहज पार करतो. आणि इच्छा आकांक्षांची पूर्ती;हवं ते मिळवल्याचं मनभरून राहिलेल्या समाधानानं, तृप्तीनं मागं वळून बघतानाचा क्षण, आयुष्याच्या वळत्या वाटेवरचं उमलण्याच्या कल्पनेनं झपाटणं फुलारणं,बहरणं, आठवणींचे दवबिंदू पानावरून ओघळले तरी पानांच्या अंगोपांगी असलेलं ओलेपण जपणार्‍या स्मृतीची सहज उलगड जाणारी मालिका म्हणजे नांगरणी

  'नांगरणी'या आत्मचरित्रात त्यांनी कॉलेजच्या बी.ए.व एम.ए.चे शिक्षण घेताना काय काय हालअपेष्टा सहन केल्या याचं शब्दचित्र रेखाटले आहे.शिक्षित व्यक्तिंशी शिक्षणासाठी भेटी अशा घेतल्या,त्या विदारक परिस्थितीचे व साहित्य क्षेत्रात काव्य,श्रृतिका लेखन,कथा यातील अक्षराकृतींची स्पंदने कधी शब्दांकित केली.व्यक्तीत्वाचं रोपटं बहरावं फुलावं म्हणून परिस्थितीच्या मातीची मशागत करताना, संकटाची तणं उपटून फेकताना आलेले कडू गोड अनुभव, सहज सुलभ शैलीत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केलेला आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्यात आशयघनता आहे. विचारधारा आहे.वाचताना आपण मंत्रमुग्ध होतो आणि आपल्या मनाची मशागतच होत राहते.     

प्रतिभावंत व्यक्तिंच्या जादुई लेखणीत रसिक वाचकांना खेळवून ठेवण्याचं सामर्थ्य कसं आसतं.याची प्रचिती पानोपानी दिसते. सकस आणि दर्जेदार सृजनशील साहित्याचे दर्शन होते. झोंबीपेक्षा नांगरणीतला लेखकाचा दृष्टीकोन अधिक व्यापक आहे. प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात उभा असलेला लेखक हा नांगरणीचा गाभा आहे. सहजसुलभतेने उलगडत जाणारी उत्कट आत्मकथा 'नांगरणी'!!!

दैनिक वृत्तपत्रांनीही दिलेल्या अभिप्रायास या आत्मचरित्रात प्रसिध्दी देण्यात आली आहे.व्यक्तीमत्त्वाचे रोपटं बहरावं म्हणून परिस्थितीच्या मातीशी मशागत करताना, संकटाचं तण उपटून फेकताना आलेले कडू-गोड आठवण सहज सुंदर भावस्पर्शी शब्दात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.दूधगंगा,पंचगंगा आणि मुठा या महाराष्ट्र-मातांस आणि त्यांना अखंड जीवन देणाऱ्या पश्चिम सागरास त्यांनी हे पुस्तक अर्पण केले आहे.

ज्याच्या त्याच्या पाठीमागे काम लागलेलं. कितीही कष्ट केले तरी सुखासमाधानाने खास मिळत नव्हता. पोटाचा खड्डा तरीही भरत नव्हता. त्यांच्या ताटातल्या अपुऱ्या भाकरीतला कोरकोरभर तुकडा उचलून मी माझ्या पोटात ढकलला होता नि शिकलो होतो.आता त्यांच्या तोंडात माझ्या नोकरीतनं एक एक घास तरी पडायला पाहिजेच होता.या विवेचनावरून या आत्मकथेचा उलगडा आपणाला होत जातो.

लेखक शिक्षणाच्या ओढीने गावची माती घेऊन कुणालाही न सांगता बाहेर सटकले. रत्नागिरी,कोल्हापूर व पुण्यात भटकले.तीन शहरांच्या तिरंगी पाण्यात माती मळू शकले. कशीबशी मूर्ती घडवून मोकळे झाले.यावर ते म्हणतात की, 'माझ्या मांजरपाटाला रंगीत ध्वजाची कळा आली. हे मला न कळलेलं सोन्यासारखं नशीब वसंता नावाच्या मित्राने मला बरोब्बर दाखवून दिलं होतं.'सन १९५५ ते १९६१ या काळातील एस.एस. सी.ते एम.ए. पर्यंतचे शिक्षण आणि नोकरीच्या कार्यकाळातील जीवन,शिक्षण, साहित्य लेखन आणि नोकरी याची आत्मकथा पस्तीस भागांमध्ये विभाजित केली आहे.सात आठ वर्षांच्या कालखंडाचे हे लघुआत्मचित्र मनभावनपणे मांडलय. 

'नांगरणी'तील आंदोलने आपल्या कुटुंबातील आपल्याला माणसासारखे जगता यावे म्हणून खालच्या सामाजिक स्तरातूनवरच्या सामाजिक स्तरात जाऊ पाहणाऱ्या संवेदनशील तरुण मनाची आहेत.

भूदान चळवळीत निकम साहेबांनी त्यांना विचारले,''तुम्हाला प्राध्यापकच का व्हायचंय?'' असं विचारल्यावर ते म्हणाले की,"प्राध्यापक होण्यात माझा दुहेरी फायदा हाय.एक तर या नोकरीत रोज दोन-चार तास शिकवले की माणूस मोकळा होतो.ह्या मोकळ्या टायमात मला वाचन करता येईल. लेखनबी करायला उसंत मिळेल.वाचायची मला खूप आवड हाय. थोरामोठ्यांची पुस्तके वाचावीत असं वाटतयं."

रत्नागिरी येथील सर्वोदय मंडळाच्या विद्यार्थी छात्रालयात त्यांची मोफत राहण्याची व भोजनाची सोय झाली.गुरुजींनी दिलेलं सात रुपये आणि स्वत:कडील तेरा असे एकंदर वीस रुपये फी भरून गोगटे कॉलेजमध्ये नांव घालून तिथं नेमानं जाऊ लागले.सर्वोदय छात्रालयात सुत कातणे, प्रार्थना, स्वच्छता आणि स्वयंपाक बनविणे.अशी कामे दररोज नियमितपणे करावी लागत.प्राचार्य पु.भा.भावे व चिटणीस सरांनी गाजलेल्या नामांकित कवींच्या कविता वाचायची प्रेरणा दिली.कविता म्हणजे भावनांचा आविष्कार.

रत्नागिरी येथे प्राचार्यांच्या घरी एके दिवशी पु.ल. देशपांडे (भाईंचं) त्यांच्यासमोर कविता वाचन.त्यांच्या साहित्यिक जन्माच बारसं'हिरवं जग आनंद यादव' अशी त्यांच्या कवितेच्या वहीवर प्रथम अधोरेखित केले.त्या कवितांवर प्रतिक्रिया देताना भाई म्हणाले होते की'तुम्हाला

तुमच्या शेतात बहिणाबाईप्रमाणं गुप्तधन सापडलंय; ते सांभाळून शेतावर प्रेम करा. बहिणाबाईची गाणी वाचा,श्री.म.माटे, व्यंकटेश माडगूळकरांच्या कथा वाचा. र.वा.दिघे वाचा.तुम्हाला तुमची माणसं भेटल्यासारखं वाटेल.'

असा सल्ला आनंद यादव यांना दिला होता.तदनंतर प्राचार्यांनीही माझ्या कवितांचा सन्मान केला.पु.लं.देशपांडेंनी लेखकांना पाठवलेले पत्र   इतरांना दाखवण्याचा मोह त्यांना झाला. व्यंकटेश माडगूळकरांनी भाईंच्या पत्रात आकाशवाणी पुणे केंद्रासाठी गावकरी फड या कार्यक्रमासाठी श्रुतिका (लघुनाटिका)लिहायला विनंती केली होती.यावर ते म्हणतात की,'ज्या गोष्टी मी स्वप्नातही अपेक्षिलेल्या नव्हत्या त्या वेगानं चालून येत होत्या.श्रुतिका ध्वनिक्षेपित होण्याचा तो दिवस कधी येईल असं होऊन गेलं.'

आईचं आठवणीचं पत्र यायचं ते वाचायला भिती वाटायची.परीक्षेनंतर भूदान चळवळीच्या कोकणातील पदयात्रेला कार्यकर्त्यासोबत गेलो. तेथील भूदान चळवळीची इत्यंभूत माहिती आठव्या विभागात समाविष्ट केली आहे.

रेडिओवरून गावकरी फडात त्यांची श्रुतिका ऐकून त्यांना अत्यानंद झाला. अनाउन्सरनं श्रुतिकेचे नांव सांगून'लेखक आनंद यादव'असं जाहीर केले.तेच माझं लेखक म्हणून पहिलं फारसं,असा आवर्जून उल्लेख करतात.

छात्रालयातील मित्रपरिवार,रेक्टर ,गुरुजींचा स्वभाव, कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींचे किस्से, प्राध्यापकांबरोबर साहित्यिक चर्चा  आणि दैनंदिन कामांचे वर्णन वेचक वेधक शब्दात गुंफलेले आहे.

शिक्षणासाठी कोल्हापूरात गाठीभेटी, भाईंच्या पत्राची चातकाप्रमाणे वाट बघणं. मळ्यात कष्टाची कामं करत नोकरीसाठी वणवण भटकणं.भाईंच्या पत्राने शिक्षणतज्ज्ञ जे.पी.नाईकांनी कोल्हापूर येथील 'कोरगावकर धर्मादाय संस्थेकडून प्रिन्सशिवाजी बोर्डिंगमध्ये रहाण्याची व भोजनाची निम्या पैशात सोय. गोखले कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन फ्रीशीपसाठी अर्ज करणे तसेच होस्टेलवरील तुकाराम, पोवार, शेटे इत्यादी मित्रांचे स्वभावपैलू आदी बाबींचे वर्णन सुंदर शब्दादित केले आहे.

जेष्ठ कथालेखक व्यंकटेश माडगूळकर आणि कविवर्य बा.भ.बोरकर यांची पुणे येथील आकाशवाणी केंद्रात भेट. पहिल्यांदा कविता वाचनाची रेकॉर्डिंग करताना झालेली तारांबळ, त्यावेळी पुरुषोत्तम जोशींनी वाढवलेल्या आत्मविश्वासाचे वर्णन तर अप्रतिम लाजवाब रेखाटले आहे.महाराष्ट्रातील सीमावाद,संयुक्त महाराष्ट्र चळवळ, राजकारण व निवडणुका यांचाही ऊहापोह केला आहे. 

आईदादांचा नोकरीसाठी धबाडगा सतत मागं.ते म्हणतात की,"आपल्या आत्म्याचे आनंदमय पाखरु परमेश्वराने आकाशात उडवावं नि काळाच्या क्रूर शिकाऱ्यानं ते हवेतच बंदूक रोखून फोडावं.त्याची रंगीत पिसे निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर परमेश्वराने पाहावीत नि आनंद घ्यावा.जणू रस्सीखेचीचा खेळ.आयुष्याची दोरी ताणली जातेय पण दोरी तुटतही नाही आणि कोणी जिंकतही नाही. "त्यांची भावना, विचार, कल्पना असलेल्या अनावरपणे लिहिलेल्या ओळी….


  ''निष्ठाहिनतेचा जंगी,पाठी बांधणार भाला

डोळे झाकून अंधाराच्या,हाती करणार ढाला"

''माझा हीच खून केला,आत्महत्या म्हणू नका

पोचवून आलो मढे,नको उगीच बोभाटा

शरीराच्या पोतडीत,राम-देव झाला धोंडा

जुन्या सुंदर वस्त्रांचा आत कोंबला भुसा-कोंडा''

कॉलेजच्या अभ्यासाबरोबरच श्रुतिका लेखन सुरुच होतं.गावच्या मळ्यात आणि घरी जगू जोशीचे अनाहुतपणे आल्यावर घडलेल्या प्रसंगांचे वर्णन अतिशय हदयस्पर्शी शब्दसाजात खास ग्राम्य ढंगात केलं आहे.

दररोज शिकवणी घेणे व वाचनालयाची पुस्तके आठवड्यातून एकदा घरोघरी जाऊन वाटणे या दोन नोकऱ्या करत. सुनीताताईंनी पाठवलेल्या मनिआॅर्डरवर बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. याचवेळी लेखक फ्लु येऊन करटं झाल्याने आजारी पडले.सरकारी दवाखान्यात औषधोपचार केला.लंगडत लंगडत फिरणं चालणं सुरू झालं.सुनीताबाईंनी पत्रासोबत  बाबुराव जोशी यांच्या बरोबर बिस्किटे व आक्रोड पाठविले होते.त्यांनी पाठवलेल्या पैशातून नेमाने दुध  घेण्याचे वाचल्यावर लेखकांना रडू कोसळले त्यावेळी,

"त्या अश्रुंचा अर्थ कधीच कळला नाही." याचाही उल्लेख भावनिकता दर्शविणारा आहे.

 एकविसाव्या भागातील भावंडांच्या कामाचे वर्णन वाचताना आपल्या समोरच कमवून खाणारं कास्तकऱ्याचं कुटूंब दिसतं.त्याप्रसंगी केलेलं वर्णन खरोखरीच त्यांची सूक्ष्म निरीक्षण क्षमता दिसून येते.बहीण हिराचा बळावलेला आजार बरा करण्यासाठी मायलेकांनी काढलेल्या खस्ता.दवाखान्यात इतरांशी हिराचं वागणं बोलणं.मुंबईला पु.ल.देशपांडे आणि सुनीताताई यांच्या कडे जाण्याचा प्रसंग. तिथल्या साहित्यावर झालेल्या चर्चा, नाटकाचे प्रयोग बघणं.बॅरिस्टर नाथ पै यांच्याशी संवाद.बहिणीच्या लग्नासाठी आईची भूमिकेचे चित्रण,सिध्दनेर्ली गावच्या टॉवेलची कथा आणि बहिणीला बघायला आलेल्या मुलाची  देहयष्टी आणि त्याच्या  घराचे वर्णन टिपून वेचून वास्तवपणे रेखाटले आहे.

ते म्हणतात की,"भावनाप्रधान झालोकी कल्पेनेच्या वारुवर आठवणींतल्या संवेदना नि भावना आरुढ होतात आणि वाट्टेल तशा क्रिडा-विभ्रम करु लागतात."किती वैचारिक मंथन करायला लावणारा विचार आपल्या मनात काहूर माजवितो.

बी.ए. पास झाल्यावर एम.ए.साठी कॉलेजने फेलोशीप दिली.सरकारी राजाराम महाराज कॉलेजला प्रथम वर्ष एम.ए.साठी प्रवेश घेतला.साहित्यिक वि.स.खांडेकरांची भेट झाली.त्यांनी कविता वाचून दाखवण्याची इच्छा व्यक्त करणे .तदनंतर त्यांनी लेखनिक होण्याची विनंती केली. तसेच केशवसुत,गडकरी आणि तांबे यांची कविता अभ्यासा. अभिव्यक्त कडे अधिक लक्ष देण्याची सूचना लेखक आनंद यादव यांना केली.कवितांना सरकारी पारितोषिक मिळण्यासाठी वसंतराव पिटके यांनी लेखकांना मनाचं बोट दाखवले.तदनंतर त्यांच्या 'हिरवं जग' या कवितासंग्रहास महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक मिळाले.आकाशवाणी कार्यालय ,पुणे येथील 'गावकरी फड'याविभागात स्क्रिप्टरायटर म्हणून नोकरी स्विकारली.ते रेडिओस्टार झाले.आईचा जात्यावर दळण दळणाचा प्रसंग तर ह्रदयस्पर्शी शब्दात मांडलाय.

ल्योक चालला परगावाऽ

बाई पोशाख अंगी नवाऽ

देवाफुडच्या अंगाऱ्याचाऽ

सोन्या लेकीनो,टिळा लावाऽ

ल्योक चालला परगावाऽ

त्येचा पोशाख अंगी नवाऽ

बैल बुजून मारंल ईऽ

धनी,तुम्हीच झालं लावाऽऽऽऽ..

...सोनं चाललं परगावाऽ

हिर्वा पोशाख अंगी नवाऽ

धनी,त्येच्या कपाळी होऽ

माझ्या मातीचा टिळा लावाऽऽ..

'कागल गाव माझी दुसरी माय.रत्नागिरीनं मला वर्षभर सांभाळलं.कोल्हापूरानं आणखी माणसात आणलं.ऐन घडीचे दिवस कोल्हापूरातले…. कोल्हापूर म्हणजे विकास पावणाऱ्या माझ्या ऐन तारुण्यातील उत्कट सुखाची ऊबदार वाकळ,पंचगंगेच्या काठच्या माझ्या व्यक्तिमत्त्वाची गाळपेर जमीन.या कलापुराला मी कसा विसरु?'....

पुण्यातील नोकरी व  शिक्षण, साहित्यिक गप्पा व्यंकटेश माडगूळकर,शंकर पाटील आणि द.मा. मिरासदार यांच्याशी साहित्यिक गप्पा.तिथं व्यक्तिमत्त्वाला ऐटदार चौकट मिळाली.आकाशवाणी कार्यालयातील कामकाजाची आणि सहकाऱ्यांच्या स्वभावाचे वर्णन बारकाईने केले आहे.त्यावेळी तात्कालिक पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट झाल्याचा उल्लेख

नमूद केला आहे.'गावठीपणा पुसट होऊन पोकळ शिष्टाचाराचा नागरीपणा अंगात भिनला होता.सुधाकर पाटील या मित्राच्या आक्काने आणि त्या घरानं नकळत कायाकल्पासारखा आत्मविश्वास दिला.' याचाही उल्लेख आणि मित्राच्या बहिणीच्या घरातील माहोल शब्दात  चितारला आहे. 'हिरवं जग'या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कोल्हापूरचे प्रकाशन चंद्रकांत शेटे यांनी केले.दरम्यानच्या काळात अभ्यासाबरोबर कविता व श्रुतिका लेखन सुरुच होते.

व्यंकटेश माडगूळकर परदेशात गेल्यानंतर लेखकाला सहकारी त्रास देऊ लागले.त्यांचे मन आकाशवाणी केंद्रात रमेना.साहित्यिक प्रवाह खुंटतोय, खंडित होतोय.तसेच मानहानी सहन होईना. अपेक्षेप्रमाणे पगारात वाढही होईना म्हणून  पुढील तीन महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट  साईन करतानाच नोकरीचा राजीनामा दिला. नंतर पुण्यात राहूनच एम.ए. फायनल परीक्षा दिली. तदनंतर तडक कागलला घरी आले.

मळ्यातील कामाचा डोलारा सावरत सावरत शिक्षक व प्राध्यापकाच्या नोकरी साठी अर्ज करतानाचे प्रसंग,रयत शिक्षण संस्थेत सातारा येथे बॅरिस्टर पी.जी.पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीचे वर्णन,तसेच वडगाव येथील हायस्कूलमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्वरीत नेमणुकीचे लेटर याचेही रसग्रहण करताना कधी एकदा नोकरी लागून आईदादाचे पांग फेडतोय ती आर्तता व घालमेल दिसून येते.


मनात पडणारा पाऊस मनातच जिरवण्यासाठी मी मळ्यातली कामं झपाझपा करत होतो.नांगराबरोबर शरीर हेलपाटून काढत होतो.त्याला दमवत होतो,सोन्या-बाळ्या बरोबरीचा तिसरा बैल झालो होतो.सकाळी धरलेला नांगर दुपारी बाराला सोडून, जेवण केलं.टपाल बघायला म्हणून गावात आलो.घरात दुसरं कुणी नव्हतं.पोस्टात चौकशी करायला गेलो नी एक पत्र हातात पडलं.'तुमची नेमणूक वीस जून एकोणीसशे एकसष्ठपासून पंढरपूर येथील'आर्टस, सायन्स आणि कॉमर्स'मध्ये मराठी आणि संस्कृतचा प्राध्यापक म्हणून केली आहे.'

निष्प्राण आयुष्याला एकाएकी चैतन्य निर्माण झाले.या पत्राने जळक्या आयुष्याला सोन्याची झळझळीत कळा येईल.नवं माणूसपणाचे पर्व सुरू झाले... भर दुपारीच मळ्याकडे जाऊन सर्वांना नोकरी लागली म्हणून पेढे वाटले.

सगळ्या उपकारकर्त्यांना साष्टांग दंडवत परिणाम! आईदादांचा आशिर्वाद घेऊन एकोणीस जूनलापंढरपूरला जायला निघालो.

'अगं आई ह्यातल्या एका डुकराचाच आता सोंड फुटून ऐरावत झालाय.मी लांब चाललोय ते काय माझ्या सुखासाठी? घरादाराला चारापाणी आणायला मी बाहेर पडतोय. आतापतोर शेतीची कामंधामं गावातच होती.

आता ती लांबपतोर पसरल्यात,असं सहज. ''बरकत येऊ दे'म्हणून तिच्या पाया पडलो. दादाला नमस्कार करायला वळलो तर,दादाने एक नारळ,उद व कापूर दिला,आणि म्हणाला,"नोकरीला जायच्या आधी इठुबाच्या देवळात जा.देवाला उदकापूर घाल,नारोळ वाढीव.पाया पड.नोकरीत बरकत माग, घरादाराची अलाबला टळू दे.मळ्यादळ्याची कज्जुखेकटी मिटू द्यात,म्हणून मागणं माग नि मगच नोकरीच्या जागी पाय ठेव."

हातातल्या पिशवीत वडिलार्जित परंपरेने दिलेल्या जीवनश्रध्दा, भावंडांनी दिलेली दारिद्रयाची आभाळ फाडणारी जाणीव नि तुडुंब करुणा. युगंयुगं घरात पुजलेला कुणबावा प्रत्येकाच्या रक्तारक्तात मिसळलेला.अशा शेतकऱ्याच्या टिकाऊ मातीनं माझा पिंड घडलेला.तरी त्याच्या अंगावर ज्ञानाची श्वेत वस्त्रं नियतीनं चढवली नि एम.ए.ची पदवी उपरण्यासारखी गळ्यात घातली. लेखन शक्तीचा रंगीबेरंगी पुष्पगुच्छ हाती दिला.सनातन अडाण्याच्या घरातील असा पहिला तरुण प्राध्यापक नव्या कारकीर्दीच्या पंढरीला निष्ठेने निघाला.प्रवासात माझी मान अवघडत चालली होती...प्रवास शेकडो मैलाचा दूरचा, अनोख्या प्रदेशाचा वाटत होता.

आता हे ओझं कुठं नि कसं उतरायचं, यांचा यक्षप्रश्न पडला होता…..

प्रतिभासंपन्न प्राध्यापक  ग्रामीण लेखक व कवी आनंद यादव यांचे'नांगरणी' हे द्विज आत्मचरित्र अत्यंत भावस्पर्शी हृदयस्पर्शी शब्दात गुंफलेलं असून माती,नाती,निती आणि शिक्षणातील हाल अपेष्टा याचं वास्तव दर्शन या आत्मकथेत आहे.ते वाचताना मनाला स्पर्शून जाते.ध्येय जिद्दीने ठरवलेलं स्वप्न उत्तुंग भरारीने मिळते…

लेखणीस त्रिवार वंदन अन् साष्टांग नमस्कार!!

 मला भावलेली उत्त्युत्तम साहित्यकृती…. ओघवती भाषा,उत्तम वर्णन शैली, अनेक लहान मोठ्या व्यक्ती आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये.'जीवनातील विविध अनुभवांच्या धारदार अवजारांनी एका ओसाड आडरानावरच्या जमिनीचे नापीकपण घालविलं आणि ती सर्जनोत्सुक केली.समृध्दी आणि संपन्नता सन्मुख घडविली.'--दैनिक लोकमत ५आॅगस्ट १९९०…

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई


 ****************************************












Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड