पुस्तक परिचय क्रमांक:११२ गोष्ट हातातली होती.


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,

 वाई

पुस्तक परिचय क्रमांक-११२

पुस्तकाचे नांव--गोष्ट हातातली होती!

लेखकाचे नांव-- व.पु.काळे

प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण जानेवारी २०२०

वाड़्मय प्रकार--कथासंग्रह

पृष्ठे संख्या-१५४

मूल्य/किंमत--१५०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚

११२||पुस्तक परिचय

          गोष्ट हातातली होती!

          लेखक: व.पु.काळे

############################

आपले आयुष्यात स्नेहनात्यातून जीवनसाथी (पतिपत्नी)येते; संसाराला प्रारंभ होतो. संसारवेल बहरत असताना घडणाऱ्या घटनांचे आणि अवतीभोवतीच्या परिसराचे  सुक्ष्म निरीक्षणात्मक वर्णन कथाकार म्हणून सुप्रसिद्ध असणारे लेखक,कथाकथनकार व.पु.काळे यांनी'गोष्ट हातातली होती! या कथासंग्रहात केले आहे. प्रतिभावंत कथाकार व.पु.म्हणजे कथेतील पॅटर्नचा अवलिया कलाकार!!!

यातील कथाबीज सुंदर मनावर आणि विचारांवर आधारित आहेत.यातील कोटेशन्स तर लाजवाब आहेत.कुतूहल वाढवणाऱ्या शब्दसाजात आणि सहज, सुंदर प्रवाही शैलीत कथा फुलवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीस लाभलेले आहे.रसिक वाचकांना त्यांच्या कथांचे गारुड मनाला मंत्रमुग्ध करते. अनेकांच्या मनातील रंगपेटीतील रंगासारखी पत्नीपत्नीच्या नात्यातील वीण उलगडून दाखविण्याची किमया त्यांच्या  गाजलेल्या अनेक कथांतून वाचताना अनुभूती येते.इतकं निर्मळ आणि निर्भेळ आनंद रसिकांना मिळत राहतो.पुस्तकातील कथेचा आस्वाद घेताना कथा वाचण्याची उत्सुकता निर्माण होते.


गोष्ट हातातली होती!या कथासंग्रहात एकूण पंधरा कथा प्रसिध्द केलेल्या आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेचा परिसस्पर्श या पुस्तकाला झाल्याने रसिक वाचकांची नस ओळखून त्यांनी अतिशय यथार्थ शब्दांत मलपृष्ठावर यातील मतितार्थ दाखविणारी विचार मौक्तिके आपल्या मनाला पुस्तक खरेदी करण्याची लालसा निर्माण करतात.त्यामुळे हे पुस्तक याच संस्थेचे अध्वर्यू सर्वांची आणि सुहास यांना अर्पण करतात. त्यामुळे स्वातीताईंनी लिहिलेले पत्र स्वरुपातील मायना या पुस्तकाचे महत्त्व आणि ममत्व अधोरेखित करते.आपण गोष्टी वाचत गेलो आणि भूतकाळ अगदी सदृश्य होतो.घराचे घरपण जप्त माणसामाणसातील नातेसंबंध ह्यावर व.पुं.चे फार प्रेम.यामधूनच त्यांना कथेचे बीज घावतं.आगळीवेगळी भिंतींचे अश्रू दाखविणारी कथा 'संन्याशाचे बारसं'.मुलाच्या नामकरण विधी पासून ते मुलं मोठं होऊन पालक होईपर्यंत त्याच्या आयुष्यातील जीवनानुभव सदैव घराच्या चारभिंती ऐकत असतात.त्याभितींचा एकमेकांशी हितगुज या कथेतून रसिकांना संबोधित केले आहे.

या कथासंग्रहात एकसोएक आनंद आणि वाचनाची पर्वणी देण्याऱ्या खुमासदार पॅटर्नच्या कथा आहेत.संन्याशाचं बारसं,अतिवास्तववादी कथा,सस्पेण,गोष्ट हातातली होती!, बॅग,हायर  लेव्हल,मामा,अशी बायको असा बॉस!, ओळख,ती आणि तीची सवत,हेवा, सावधान, स्पीडब्रेकर,अंदर की बात आणि चोर या कथांचा समावेश यामध्ये केला आहे.

"नियती एक महान आत्मा या पृथ्वीवर पाठवते.आयुष्य नावाची बहुमोल चीज माणसांना बहाल करते.या सगळ्यांचा आस्वाद घेण्याऐवजी माणसंच माणसांशी वैरी कशी होतात,ते आपण पहात आलो.नियती महान आत्मा पृथ्वीवर पाठवते आणि परत नेताना एक क्षुद्र जीव परत नेते,असा आतबट्ट्याचा खेळ नियती किती वर्ष खेळणार आहे?" हे आपणाला 'संन्याशाचं बारसं' या कथेतून उलगडत जाते.

अतिवास्तवादी कथेत माणसांच्या विसराळू स्वभावाचे मार्मिक दर्शन घडते.त्यातून होणारी त्रेधातिरपीट आणि शोधाशोधातून होणाऱ्या

गोंधळाचे शब्दचित्र वाचताना हास्याची लकेर चेहऱ्यावर उमटते.

'सस्पेण'या कथेतील कुतूहलता आणि उत्कंठा उत्तराधापर्यत टिकवून ठेवली आहे.माणसाच्या आयुष्यातील खाचखळग्यांचे वर्णन या कथेत केलेलं आहे.कार्यालयातील अफरातफरीच्या वहिमामुळे चौकशीचा ससेमिरा शिपाई आणि लेखनिक यांच्या मागे लागतो.त्यातून निरपेक्ष सुटण्यासाठी साहेब दंडवते क्लार्कला सक्तीची रजा काढण्याची शक्कल सांगतो.तर शिपाई सस्पेण म्हणजे निलंबित होते पसंत करतो.मग घडणारं खुमासदार कथानकाचे लेखन वाचताना सस्पेन्स उलगडत जातो.खुप सुंदर कथानक...

मुलगी पाहताना,लग्नाची बोलणी करताना आणि ठरवताना काय काय करावे लागते. मुलामुलींना ग्रहीत धरुनच कशी लग्नं जमवितात याचं वर्णन म्हणजे 'गोष्ट हातातली होती!'ही शीर्षक कथा होय.हुंडा अमान्य असणारी मुलगी मुलाला खरमरीत भाषेत सुनावते.त्यामुळं लग्न जुळत नाही.मग तैच मुलगा एकही पै नघेता तिच्याच मैत्रिणीशी विवाहबद्ध होतो.हे योगायोगाने गाठ पडल्यावर तिला समजते.दोघींची बोलणी होतात.वरवर दोघीही समाधान व्यक्त करतात पण अंतरंगातील खरी सल या कथेतून मांडलेली आहे.

'हायर लेव्हल' या कथेत धावपळीच्या युगातही छोट्या घटनेचे अवडंबर माजवून नंतर सुरळितपणा येण्यासाठी वरच्या पातळीवरुन कसं मॅनेज केले जाते.याचं शब्दचित्रण मांडलेले आहे.ही आजच्या घडीलाही बसणारी चपखल कथा आहे.वरिष्ठ माणसं आपल्या फायद्यासाठी नियमांची कशी अंमलबजावणी करतात.तर कधी त्यातील पळवाटा शोधून शिरजोरी करतात याचं वर्णन या कथेत केलेले आहे.


पितापुत्रांनी एकाच रंगाची आणि पॅटर्नची बॅग घेतल्यावर मुलगा बापाला कसा चेकमेट करतो.त्यातून बापाची अशा भंबेरी उडते याची लीलया कथा 'बॅग'होय.अक्षरश: वाचताना आपणालाही कथा आपल्या समोरच घडत आणि उलगडतेय असा भास होतो.इतकी ताकदीने कथा सादर केली आहे.

एखाद्याचा मामा करण्यात आपण पटाईत असतो.आपणाला त्याची भंबेरी उडवायला असुरी आनंद मिळतो.त्याची चेष्टा मस्करी केल्याने.जगजिंकल्यासारखे वाटते.याच पठडीतील कथा मामा या शीर्षाची आहे. मुंबईतील एका आॅफिसात बॉसचा भाचा सहज

कामानिमित्त आलेला असतो.त्याचे काम झाल्यावर मामाच्या तिथंच नोकरी पत्करतो.

मग हजर झालेल्या नवीन कर्मचाऱ्याची चेष्टा मस्करी व करामती करण्यात आनंद मानणारे इतर कर्मचारी त्याची कशी गंमत करतात. तरीदेखील तो कुणावरही न रागावता काम करीत राहतो याचं वर्णन अतिशय यथार्थ आणि वेचक शब्दफुलोऱ्यात केले आहे.एक पार्टी आयोजित करुन तो खरा उलगडा केल्यावर त्याला मामा बनवाऱ्यांचाच मामा कसा होतो..यांचे अफलातून चित्रण केले आहे. ओढग्रस्त जीवनात प्रत्येकजण पिचलेला आहे. प्रत्येकाला  विनामूल्य काहीना काही करमणूक हवी असते.याचा प्रत्यय मला आला.म्हणून मला मामा करण्याचा प्रयत्न केलात.त्यामुळे तुम्हाला आनंद मिळाला….


'अशी बायको असा बॉस' ही छानशी वेगळ्या धाटणीची कथा आहे.दोघं भाऊ एकमेकांच्या संसाराला हातभार लावतील अशी उदाहरणे क्वचितच आढळतात.एक भाऊ व भावजय दुसऱ्या भावाला नोकरी न करता त्यांच्यासाठी पैशापाण्याची आपणहुन सोय करतो.त्याला कशाचीही कमतरता भासून देत नाही.तर इकडे त्याच्या पत्नीला आपल्या नवऱ्याने नोकरी करावी यासाठी ती काय दिव्य करते.अगदी नोकरीचा अर्ज स्वत: पोस्टपेटीत टाकते.अशा घटनांचे कथन अगदी छान रंगविले आहे.

तश्याच कथा ओळख,ती आणि तीची सवत ,हेवा, सावधान, स्पीडब्रेकर ,अंदर की बात आणि चोर…

स्पीडब्रेकर कथा पतिपत्नीच्या स्वभावाचे पैलू उलगडून दाखविणारी कथा आहे.पतिने आवडीने आणलेल्या वस्तू बायकोला आवडतीच असं नाही.तसेच संशयी वृत्तीने वादळ कसं घोंगावत येतं.आणि मग खटके उडत राहिले तरी संसार अभंग कसा राहतो. याचं वर्णन केले आहे.

आपणाला भेट मिळालेली वस्तू प्राणप्रिय असते.आपण ती काळीजकप्प्यात जतन करून ठेवत असतो.तशीच हुबेहूब वस्तू दुसऱ्याकडे असेल असे आपणाला वाटतंच नाही.याच बीजेची कथा 'चोर'आहे.स्वता:चे पेन गर्दीत रेल्वेत चढत असताना पडलेलं असतं. एका डब्यात एक माणूस पुस्तके पसरुन वाचत असतो.वाचताना पेन्सिलने पुस्तकावर खुणा करीत असतो.कथेतील नायिका लेखिका आहे.तिची कादंबरी गाजलेली असल्याने एका शाळेत तिचा सत्कार समारंभ आयोजित केलेला असतो.तिथं निघालेली असतं.आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी जी.हेमंत असतात.योगायागाने दोघेही एकाच डब्यात असतात पण अनोळखी असतात.कवी महाशय वाचताना खालील पुस्तक उचलताना तिचं गर्दीत पडलेलं पेन तिला दिसतं.मग ती मागून घेऊन स्वत:कडे ठेवते.हे पाहिल्यावर ते तिला म्हणतात,'तुम्ही पेन लिहायला सांगितले.पण तुम्ही न लिहिता ते तुमच्याकडे ठेवले आहे.'यावर दोघांचा वादविवाद सुरू होतो.काहीवेळाने स्टेशन येते.गाडीचा वेग मंदावतो.दुरुनच तिला संयोजक व मुले दिसतात.मग गाडी थांबल्यावर ती खाली उतरते.एक मुलगी मला हार घालते.तर दुसरी हार घेऊन पुढे जाते.त्यावेळी चमकून लेखिका मागे बघते.तर तो गृहस्थ तिथेच उभा असतो. वडिलांचे स्नेही म्हणजेच संयोजक त्यांच्याशी हस्तांदोलन करून मला म्हणतात.हेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी जी.हेमंत. त्याचक्षणी माझी मान खाली गेली.एका मंजुळ आवाजाने मी वर बघितले तर 'बाई स्वाक्षरी द्या ना' एक मुलगी विनंती करीत होती.वही हातात घेऊन स्वाक्षरी देण्यासाठी पहिले अक्षर लिहिताच माझ्यावर बेशुद्ध होण्याची वेळ आली.कारण त्या पेनातून निळ्याऐवजी काळी शाई आली होती…….

अशा सुरस कथांतून मानवी स्वभावाचे पैलू उलगडून चेहऱ्यामागील चेहरे हुबेहूबपणे रेखाटनाचे अलौकिक कार्य प्रतिभावंत साहित्यिक कथाकार शब्दांचे जादुगार व.पु. काळे यांच्या लेखणीतून पाझरत रहाते.अस्सं लेखन करणाऱ्या हातास आणि लेखणीस मनस्वी दंडवत!!!!! अप्रतिम कथासंग्रह रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आहे…


परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई


लेखन दिनांक-२२ मे २०२२





Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड