पुस्तक परिचय क्रमांक-११० खंबाटकी ते खाकी




📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
११०||पुस्तक परिचय
          खंबाटकी ते खाकी
          लेखिका: सौ.शुभांगी उध्दव पवार
############################

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,
 वाई
पुस्तक परिचय क्रमांक-११०
पुस्तकाचे नांव--खंबाटकी ते खाकी
लेखिकेचे नांव--सौ.शुभांगी उध्दव पवार
प्रकाशक-चैत्र प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती १जून  २०२२
वाड़्मय प्रकार--आत्मचरित्र
पृष्ठे संख्या-९६
मूल्य/किंमत--१५०₹
______________________________________

आयुष्यात आलेल्या सुखदुःखाच्या घटनांची साठवण केवळ मनात न ठेवता, त्यांनी 'जसं आहे तसं'शब्दबध्द करण्याची किमया लेखिका व कवयित्री सौ.शुभांगी उध्दव पवार यांनी 'खंबाटकी ते खाकी'याआत्मकथेत साकारलेली आहे. 
सातारा जिल्हा पोलिस दलात महिला पोलीस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या लेखिका सध्या 'भरोसा सेल'मध्ये सेवेत आहेत.विशेष म्हणजे या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सौ.पवार व श्री.पवार यांच्या १ जून २०२२रोजी लग्नाच्या वर्धापनदिनादिवशीच हॉटेल लेक व्ह्यू गोडोली,सातारा येथे जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, माजी विभागीय आयुक्त श्याम देशपांडे, दै.सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळस्कर,पत्रकार श्रीकांत कात्रे,हरिष पाटणे,माजी कृषीसभापती मंगेश धुमाळ आदी मान्यवरांच्या शुभहस्ते दिमाखदार सोहळ्यात पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.यावेळी पोलिस,शिक्षण,पत्रकार , नातेवाईक आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज रसिक श्रोत्यांची उपस्थिती प्रेक्षणिय होती.
आमचे शिक्षकमित्रवर्य उध्दव पवार सरांनी २जून रोजी प्रकाशित झालेल्या आवृत्तीची एक प्रत श्री सचिन जाधव सरांच्या हस्ते मला पाठवून दिली.आदरणीय पवार सर आणि वहिनींचे मनापासून अभिनंदन!!! 

लेखिका सौ.शुभांगी पवार यांनी आतापर्यंत अनेक काव्यसंमेलनांमध्ये कविता सादरीकरण केले आहे. काव्य लेखनाची अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत.त्यांना साहित्य आणि पोलिस दलातील सेवेबद्दल अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र भूषण सेवा रत्न पुरस्कार, राजधानी कार्यगौरव पुरस्कार,जागतिक महिला दिनानिमित्त'उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार',कोवीड फायटर पुरस्कार आणि अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

कवितेतील भावना आणि संवेदना खऱ्या असतात.कवी मनातील भाव कागदावर उमटवित असतो.तीच शब्दबध्द रचनेतून कविता प्रसुत होते.आपला साहित्य क्षेत्रात सहज म्हणून काव्यरचनेतून झालेल्या प्रवासाचे पहिले फलित म्हणजे 'आई'मातृहदयी मातेच्या जीवनदर्शनाची रचना.तदनंतर अनुभव सिध्द 'खंबाटकी ते खाकी' या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन करुन आठवणी लिखित स्वरूपात इतरांना प्रेरणादायी वाटेल असं सहज, सुंदर शैलीत नेहमीच्या हितगुज करण्याच्या शब्दसाजात मांडलेली आहे.त्यात शब्दांचे चापल्य,कपोलकल्पना,अलंकारिक भाषेला छेद देऊन आत्म चित्तरकथा संक्षेपाने गुंफलेली आहे.
नजर वेधून घेईल असे मुखपृष्ठ बोलकं आहे. त्यामधून आत्मकथेची आशयघनता चित्रातून व्यक्त होते.गंगाधर म्हमाणे यांनी सुबकपणे मुखपृष्ठ रेखाटन केले आहे.तर मलपृष्ठावरील परिच्छेदातील वेळेच्या व्यवस्थापनाची   विचारमाला पुस्तक वाचण्यास उद्युक्त करते. 
सह्याद्री पर्वताची एक रांग रायरेश्वरापासून सुरु होते, त्या खंबाटकी घाटाच्या घाटमाथ्यावरील निसर्ग सौंदर्याने नटलेले चवणेश्वर गाव आणि पोलिस दलातील खाकी वर्दी याचा सुरेख संगम रानफुलांसारखा आत्मकथेत गुंफलेला आहे.
मनोगतात लेखिका म्हणतात की,'आपली कथा आणि व्यथा वाचून कुणाच्यातरी आयुष्यात थोडा जरी सकारात्मक बदल झाला,तरी लिहिण्याचे सार्थक होईल.'याचा आवर्जून उल्लेख करतात.आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या अनेक छोट्या छोट्या लढाया जिंकायला अचूक वेळेचा वेध साधावा लागतो संधीचं सोनं करण्याची ताकद आपल्या बाहुंमध्ये असते.तेच समजणं महत्त्वाचं असतं.पोलिस कर्मचाऱ्यांचे राकट हातही हळवेपणाने मनातील तरल भावनांना शब्दात बांधून कथा आणि काव्ये निर्माण करतात.हेच खरोखरी अभिनंदनीय आहे.
हे पुस्तक लेखिकेचे आजोबा कै.महादेव विष्णुपंत गुरव व आजी कै.इंदुमती महादेव गुरव यांना अर्पण केले आहे.
 कविता लिहिता लिहिता आत्मलेखनाला आत्मबळ देवून आत्मविश्वास निर्माण करणारे त्यांचे पति उध्दव पवार,लेखन काळात लिहिते हात ठेवण्यासाठी प्रेरणा देणारे सरांचे मित्र, सर्व कुटूंबिय आणि पुस्तकाला आवृत्तीच्या आकारात बध्द करणारे चैत्र प्रकाशनचे प्रकाशक मंदार पाटील आदींविषयी लेखिका कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानतात.
  प्रसिध्द लेखिका स्वप्नाली पेडणेकर यांचा आत्मकथेच्या प्रस्तावनेचा 'जगण्याला उर्मी देणारा प्रवास' हा लेख मराठी साहित्य परंपरा आणि स्त्रीवादी साहित्य यांचे वास्तव अधोरेखित करतात.त्या आवर्जून उल्लेख करतात की,'लेखिकेने प्रतिकूल परिस्थितीत वेळेचे बंधन न पाळता सेवेत मग्न असताना सुध्दा आपल्या मनातील हळव्या कोपऱ्यातून कथाकाव्य लेखनाचा छंद जोपासला आहे.हे पुस्तकाचे रसग्रहण करताना लक्षात येते. पोलिसाची नोकरी म्हणजे कर्तव्याला प्राध्यान्य ,अचानकपणे स्पीडब्रेकरसारखी उभी राहणारी घरातील आजारपणं, सेवेतील ताणतणाव आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यातूनही साहित्याची सेवा केली आहे. शाळकरी वयात वर्गशिक्षिकांना 'पोलिस'होण्याचे स्वप्न ध्येय आणि जिद्दीच्या जोरावर स्वकष्टातून घरच्यांच्या सहकार्याने पूर्ण केले.जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना स्ट्रगल कसा करावा लागतो.अश्रुंना बांध कसा घालावा लागतो.नवदृष्टीने कसे पुढे चालावे लागते.एवढे सामर्थ्य या आत्मकथेत निश्र्चितच आहे.
'खंबाटकी ते खाकी'या आत्मकथेचा प्रारंभ 
लहानपण दे गा देवा,नवा प्रवास (विवाह कथा), संसार,नवा अध्याय स्वप्नांची सिध्दता, पोलिस प्रशिक्षण,नोकरीतील पोस्टिंगचे विविध ठिकाणचे सुखदुःखाचे अनुभव आणि कुटूंबातील संकटं आदी घटनांची पाने उलगडत उलगडत घाटातील वळणाप्रमाणे पुस्तकाचा शब्दप्रवास  घडत राहतो.हर एक साठवणीतले घटना प्रसंग टिपकागदाप्रमाणे  टिपून वेचून काढलेले आहेत.घरातील सर्वांनी दिलेल्या मदतीतून,केलेल्या सहकार्यातून स्वप्नपुर्तीच्या  कार्यकर्तृत्वाचा आलेख उठावदार कसा होत गेला ते आपणाला या पुस्तकाचे रसग्रहण करताना जाणवते. शाळेतील, सासरमाहेरच्या कुटूंबातील, शेजाऱ्यांशी, सेवेतील सहकार्यांशी आलेलं घटना प्रसंग नाजूक, सुखद, वेदनादायी, मिश्किली आणि संस्कारक्षम दिसून येतात.
लेखिका शुभांगी पवार यांच्या लिहित्या हातांना सलाम! आणि यापुढेही साहित्याची सेवा घडो या सदिच्छा!!!
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक:३जून २०२२

 पुस्तक उपलब्धीसाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा ८८०५०००९६९

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड