पुस्तक परिचय क्रमांक-१०९परीघ




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,

 वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१०९

पुस्तकाचे नांव--परीघ

लेखिकेचे नांव--प्रा.मीनल येवले

प्रकाशक-जीसी पब्लिशर्स, नागपूर

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती १५अॉगस्ट २०१३

वाड़्मय प्रकार--कवितासंग्रह

पृष्ठे संख्या-१३१

मूल्य/किंमत--१००₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚

१०९||पुस्तक परिचय

          परीघ

          लेखिका: प्रा.मीनल येवले

############################

लालित्यपूर्ण शैलीत नक्षत्रांची लेखणी करून शब्दांचा चांदणचुरा मुक्तहस्ते उधळत, मनभावनांचा खजिना म्हणजे "परीघ" कवितासंग्रह होय.तो सिध्दहस्त लेखिका, कवयित्री आणि वाचन साखळी समूहाच्या सदस्या प्राध्यापिका मीनल येवले यांनी निसर्ग आणि समाजाला दिशा, प्रेरणा आणि आनंद देणाऱ्या शब्दांना कवितेचे कोंदण लाभले आहे.

परीघ हा काव्य संग्रह मला वाचन साखळी समूहावर उत्कृष्ट पुस्तक परिचय लिहिल्याबद्दल संयोजिका प्रतिभाताई लोखंडे आणि प्रायोजक श्रीमान विठ्ठल भुसारे साहेब उपशिक्षणाधिकारी जि.प.परभणी यांनी बक्षिस स्वरुपात अनमोल भेट मिळाले आहे.त्यामुळे वाचनसाखळीच्या कायम स्नेहात आणि ऋणात असल्याने या पुस्तकाचा परिचय करून देणं माझ्यासाठी संचितच आहे.

'परीघ' काव्यसंग्रहाचा परिचय प्रतिभावान कवी आदरणीय फ.मु.शिंदे यांनी मलपृष्ठावर  लौकिकार्थाने अप्रतिम शब्दात प्रस्तुत केलेला आहे."जगाचं अडो न आवडो, जिवाचं अडत असतं,"असा जीव त्याच्या  आयुष्यात आणि आयुष्याला  व्यापून टाकतं असतो. जगणं अव्याहत सुरू असतं,पण थांबण्याआधी प्रकट होण्याची,व्यक्त होण्याची सारखी तगमग असते.खरं म्हणजे लेखनाचा व्यक्त होणं हाच मूल स्त्रोत होय,'' असे ते नमूद करतात.क्षण साक्षात करण्याचा ध्यास म्हणजे  नव्या धुमाऱ्यांची आकांक्षा!!याच दिशेने कवयित्री मीनलताई मार्गक्रमण करीत कवितेच्या प्रांतात 'परीघ' कवितासंग्रहातून ८३काव्याचे क्षितिज 

काव्यरसिकांना शब्दकलेत सादर केले आहे.


डॉक्टर वि.स.जोग यांची प्रस्तावना लाभलेली असून, 'प्रकाशाचा धर्मास घेणारी कविता'या शिर्षात कौतुक करत ते म्हणतात की,'मराठी साहित्यावर स्वत:ची नाममुद्रा उमटवली. कवितेच्या प्रांगणात ओळख निर्माण केली. अशा टवटवीत प्रतिभेच्या कवयित्री पैकी एक म्हणजे मीनल येवले! 'निसर्गाशी मैत्री करत समाजभक्ती जोपासत विविधांगी शब्दांना काव्य रचनेत गुंफलेले आहे.सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीचा वसा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना गुरुस्थानी- मातृस्थानी  मानून आपल्या लेखणीतून प्रबोधनात्मक संदेश कवितेतून दिसून येतात.

ते प्रस्तावनेत म्हणतात की,'कविता म्हणजे मनात दाटली आग, समाजाच्या ऋणासाठी लेखणीला जाग! यातील 'शब्द' या कवितेतून ते व्यक्त होतात की, शब्द गवसति विचारातुनि,सागरमंथन जैसे अमृत!


'परीघ' पौगंडावस्थेत एका भावनिक वादळात हळवी कविता भेटली.अभिरुची वाढत गेली.इवलसं अस्तित्व सांभाळत मग ती सतत भेटू लागली.काव्यस्पर्धेतून सादरीकरण करत करत प्रकाशात आली.कौतुकाच्या थापेने लिहिण्याची उमेद वाढली.अन् कॉलेजातील काव्य मैफिल ते दैनिक वर्तमानपत्राच्या पुरवणीत 'ती'बाळसं धरु लागली.आणि लिहिण्याला उभारी मिळाली.

कवयित्री मीनलताई म्हणतात की,'मोहोर पासून परीघ पर्यंतच्या काव्य प्रांगणातील जगणं बरंच समृद्ध झालं.कवितेनं प्रेमळ, प्रांजल,समंजस,हळवं मन समजलं.' आणि निरामय नात्यातून नवनिर्मितीला सकारात्मक ऊर्जेचे प्रोत्साहन मिळालं.याचा ते अंतर्मनाच्या परीघातून निर्वाळा देतात.ज्ञातअज्ञातस्नेहाशीष, स्नेहांकित सहकार्याच्या हातांना कृतज्ञतापूर्वक उल्लेख करुन;ज्या दैनिक वर्तमानपत्रांनी प्रथम कवितेला प्रसिध्दी दिली त्यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी परीघ काव्य- संग्रहात कवितांची निवड केली.त्या सहकारी प्राध्यापकांचाही उल्लेख नमूद केला आहे.शब्दांची ओंजळीतले 'परीघ' काव्यसंग्रह रसिक वाचकांना समर्पित करतात..

या काव्यसंग्रहात निसर्ग,रंगछटा,पाऊस, ऋतू, दिनक्रम आणि समाजातील वैशिष्ट्येपुर्ण शब्दांची काव्यचित्रे रेखाटतात.''कविता म्हणजे शब्दब्रह्माचा नाद, आसमंताच्या पोकळीतून घालते कुणी साद…..'' अशी सुरेख शब्दात कवितेची ओळख करून दिली आहे.


वसंत ऋतूचे आगमन झाले की  सृष्टीला फुलाफळांचा बहार येतो.ते वृक्ष नजर वेधून घेतात.रमणीय दृश्य सगळीकडे दिसते.अशा नैसर्गिक दृश्याचे वर्णन 'आला वसंत' या काव्यात केले आहे.


तुझी नि माझी अबोध स्वप्ने

हलके हलके उलगडण्याला

रितेपणाला झटकून फुलवित

पुन्हा एकदा वसंत आला…

पळस,पांगरा,आम्रवृक्ष अन्

कडुलिंबही मोहरलेला

झुलती त्यांना बघून वेली

चंचल अवखळ वसंत आला…

पावसाने निसर्गायन कसे रमणीय नेत्रसुखद दिसते. हिरव्यागार गालिच्यावर शुभ्र धबधबे ओसांडत वाहत असतात.अन् पाऊसाची रिमझिम बरसात पडत असताना कवी मनास भावलेली वर्षा 'पावसाचे गाणे'या रचनेत टिपूक टिपूक थेंबासारखी लक्ष वेधून घेणारी रचना किती सुंदर वर्णन करतेय….


हिरव्या वेली बहरुनी येती 

वृक्षाला मग बिलगून घेती

प्रेरणा तयांना मिळते कोठून

मनचंबित झाले गं….


ज्येष्ठ आषाढी ओथंबलेला

श्रावण भाद्रपदी सरावलेला

सणाव्रतांना आला घेऊनी

सृष्टीत चैतन्य उधळे गं…..


लीला त्याची अनंत अद्भुत

मी मज हरवून बसले गं

तनमन ओलेचिंब होऊनी

पाऊसच कवीता झाले गं….


मुंगी उडाली आकाशी पद्माकर गोवईकर यांच्या अभिवाचनाची आठव 'इवलीशी मुंगी'या कवितेचे रसग्रहण करताना येते.संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या बंधू आणि भगिनींची यथार्थ दर्शन या रचनेतून उलगडून दाखविले आहे.

जीवापाड तीज जपले बंधूंनी

उपेक्षा झेलुनी कर्मठांची

मूल्यवान तिची अभंग रचना

बोध केला जना सन्मार्गाचा


अशा अनेक कविता आशयगर्भित आणि वैचारिक मंथन करायला लावणाऱ्या आहेत.

'बालकवीस' ही रचना बालकवींच्या निसर्ग सौंदर्याचे अंतरंग उलगडणारी आहे.


*अरुणोदयाचे रंगरुप तर कायमचेच

कोरुन गेलास मन:पटलावर

श्रावणसरी सरसर ओसरत राहिल्या

शब्दाशब्दातून

मनात,घरात सर्वत्र थांबला नाहीस एवढ्यावरच

तू रमलास कळ्या-फुलांच्या विश्वात

तू जगलास मुला-पाखरांच्या शिश्वात


स्त्रीधनाचे अलंकारिक सौंदर्य 'दीपस्तंभ' या काव्यातून पाझरत राहते.जगण्याचा सूर चैतन्यदायी प्रेरक वाटते.तर महिलांच्या कारल्याचा सन्मान 'बाया'तून दृष्टिस पडतो. आठवणींचा खजिना काळीजकप्प्यात साठलेला असतो.एखाद्या क्षणी अचानक ध्यानीमनी नसतानाही आठव मनात रुंजी घालते अन् आपण मनाने त्या ठिकाणी फेरफटका मारत आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत त्या क्षणांचा आस्वाद घेतो.मनातल्या मनात हितगुज करतो.'स्मृतींची उलटता पाने'या काव्यात आठवणींची गुंफण मांडली आहे.


शीर्षक काव्य'परीघ'ही बहारदार आहे.

*निसटत चालली वाट नि डळमळणारं भविष्य

बुरख्याआडून सुखाच्या ठसठसू लागलं आयुष्य!

हवा वाटे थोडासा मुक्त मोकळा अवकाश

उसवलेलं हरवलेलं टाकण्यासाठी नि:श्र्वास !

परीश्रमाचे झाड तिची समृध्दीची फुलं

आत आत तगमगायला जीवाला काय झालं?

मुक्त मोकळे आकाश दिशांची उघडलेली दारे

कोपराच कुठे परीघाला आत सामावले सारे!

मातेची महती अधोरेखित करणारे कविवर्य

फ.मु.शिंदे या़च्या साहित्याविषयी 'कविवर्य फ.मूं.स….'ही कविताही समर्पक शब्दात व्यक्त झालीय.

सारस्वताला तुझी शब्दलेणी

देऊन गेली बरचसं काही

हलवून गेली सहृदय मनाला

कवितेतली अमर 'आई'

प्रेमाची उपमाही विविध नैसर्गिक रुपात सादर केली आहे.प्रेम म्हणजे….


प्रेम म्हणजे मनाचं

बिंबासारखं उसळणं

जगाचं भान विसरून

 प्रतिबिंबात मिसळणं…

प्रेम म्हणजे धरेचं

पावसासाठी व्याकूळणं

पतंगाचं दिव्यासाठी 

क्षणाक्षणाला विव्हळणं…


काव्यरसिकांना रसग्रहणीय असा 'परीघ'हा 

काव्यसंग्रह आहे.कवयित्री प्राध्यापिका मीनल येवले यांनी अतिशय सुंदर शब्दकलेत कविता साकारलेल्या आहेत.निसर्गाचा आणि माणसातील गुणावगुण, भावना,पाऊसाची रुपे, सायंकाळ, थोरांचे साहित्य व कार्ये,स्वाभावगुण आदी विविधांगी रुपांवर रचना साकारल्या आहेत.त्यातून आर्तता, संवेदना, आनंद, क्लेश आदी भावना व्यक्त होतात. आपल्या लेखणीस मनपुर्वक वंदन!!! आपली लेखणी सदा बहरत राहो!संग्रही ठेवावा असा काव्यसंग्रह आहे..

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक:२६ एप्रिल २०२२


















 


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड