पुस्तक परिचय क्रमांक-१०८ गोंदण
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,
वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१०८
पुस्तकाचे नांव--गोंदण
लेखिकेचे नांव--शांता ज.शेळके
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण:आॅगस्ट, २०२०चौथी आवृत्ती
वाड़्मय प्रकार--कवितासंग्रह
पृष्ठे संख्या-१०४
मूल्य/किंमत--१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
१०८||पुस्तक परिचय
गोंदण
लेखिका: शान्ता ज.शेळके
💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆
''रेशमाच्या रेघांनी लाल काळया धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नका लावू माझ्या साडीला….''
या लावणीचे बोल ज्यांच्या लेखणीतून उमटले त्या ख्यातनाम गीतकार, लेखिका, कवयित्री आणि अनुवादक शांताबाई शेळके यांचा 'गोंदण'हा काव्यसंग्रह १९७५साली प्रसिद्ध झालेला आहे.
*हे पुस्तक वाचन साखळी समूहाच्या पुस्तक परिचय या उपक्रमात उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल बक्षिस मिळालेले आहे.त्याबद्दृल संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे आणि उपाध्यक्ष व प्रायोजक कवी मनोजभाई अग्रवाल यांचे मनस्वी आभार!!
प्रतिभावान साहित्यिक शांताबाई शेळके यांनी साहित्यातील विविध प्रकारात विहार केला.पण खरी आवड म्हणजे कविता!त्यांनी मनातील भावना हळुवारपणे भावगीते, भक्तीगीते, कोळी गीते, सिनेमा गीते आणि प्रासंगिक गीते आदी विविध रुपातून त्यांची कविता भेटते.
शांताबाई शेळके हे नाव सर्वदूर परिचित प्रतिभावान साहित्यिका.'रुईया'आणि 'सिध्दार्थ' या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करत असताना त्यांनी साहित्य सृष्टीच्या प्रांगणात प्रवेश केला. दर्जेदार साहित्याचे विपुल लेखन केले.विशेषत: मुलांसाठी त्यांनी अनेक बालकविता व बालकथा लिहिल्या.तसेच अनेक ध्वनिमुद्रिका, नाटके व चित्रपटांसाठी गीतलेखन केले. तसेच हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांमधील साहित्य त्यांनी ओघवत्या,प्रवाही आणि भावपूर्ण शैलीत मराठीत अनुवादित केले.त्यांनी अनेक वर्षे नाट्य व चित्रपट यांच्या सेन्साॅर बोर्डवरही काम केले आहे. शासकीय पारितोषिक समितीवर अनेकदा परीक्षक म्हणूनही काम केले आहे.
त्या १९९६ सारी आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.त्यांचा मराठी चित्रपटातील गीतलेखनासाठी 'गदिमा पुरस्काराने'गौरव केला आहे.तर मंगेशकर कुटुंबियांतर्फे दिला जाणारा'वाग्विलासिनी पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.तसेच साहित्य सेवेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे विद्यापीठाचा 'जीवनसाधना गौरव पुरस्कार', 'फाय फाउन्डेशन पुरस्कार'ही बहाल केलेला आहे.
गोंदण हा त्यांचा तिसरा काव्यसंग्रह.त्यांनी या काव्यात माणसामाणसांतले तुटलेले संबंध, परस्परांशी जवळीक साधण्यात त्यांना येणारे अपयश हा शान्ताबाईंच्या चिरंतन कुतूहलाचा विषय आहे. नजरेत भरलेले एखादे दृश्य, मनात रेंगाळणारे संदर्भ, निसर्गाची विशिष्ट रुपकळा,अबोध मनातली खोल गूढ चाळवा -चाळव इत्यादी घटकांवर रचना केलेल्या आहेत.शान्ताबाईंच्या मनात काव्य आकार घेऊ लागायचे त्याचा प्रत्यय यावा असा हा 'गोंदण' काव्यसंग्रह आहे.मात्र "शब्दांनीच परस्परांना भिडू बघतो आपण,लढू बघतो आपण" म्हणणार्यांना शान्ताबाईंना त्याची जाणीव आहे की, " शब्द म्हणजे केवळ बेटे पाण्याने वेढलेली, एकमेकांपासून तुटलेली.शब्दांना शब्द भेटतीलच असे नाही-शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही". ठराविक वृत्तांबरोबरच त्यातून बाहेरही पडलेले शान्ताबाईंचे काव्य येथे वाचायला मिळते.शार्दूलविक्रीवृत्तात लिहिलेली, पण आशयातील नावीन्य प्रकट करणारी अनेक सुनीते हेही ह्या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहेत. त्यातील समस्त महिलांचे सौंदर्य खुलविण्यासाठी पैठणीची काव्यसुमने अतिशय भावस्पर्शी हृदयस्पर्शी शब्दात गुंफलेली आहे.
आपली नाती गोती आणि वस्त्रालंकार यांचे अतूट बंधन आहे.जसं नातं जपतो तसचं आवडते अलंकारही जपून ठेवतो.आणि हा ठेवा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत असतो.तेच मनातील भावनांची गूज या कवितेतून दिसून येते.
**पैठणी**
फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले शाली,
त्यातच आहे घडी करुन जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी |
धूप-कापूर-उदबत्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणी नया जपले एक तन...एक मन...
खस-हिन्यांत माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली|
कधीतरी ही पैठणी मी धरते ऊरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात; कालपटाचा जुळतो
धागा
पैठणीच्या चौकड्यानो, आजीला माझे कुशल सांगा|
हे काव्य सादरीकरण अनेकदा टेलिव्हिजन मालिकेतील लाईव्ह नृत्य व गीत सांगितिक कार्यक्रमात ऐकायला मिळालेले आहे.
अशी अनेक शब्दांची काव्यशिल्पे आपल्या मनावर मोहर उमटवतात. रचना विचार करायला लावतात. अशी सुंदर शब्दसाजात काव्यगुंफन केलेली आहे.
'गोंदण'या काव्यसंग्रहात एकंदर १०३ कविता काव्यरसिकांना रसग्रहण करायला आहेत.यातील चारोळी ते दीर्घ काव्य अशी काव्यांची मैफिल आहे.'मालन' ही कविता दीर्घ काव्य रचना सासर आणि माहेर या दोन घराण्याचा ऋणानुबंध व्यक्त करणारी आहे. तिच्या मनातील गावाच्या वैभवाची नक्षीदार दृश्य रचनेतून प्रकट होतात…
एखादा शब्द,एखादा सूर
एखादी उत्कट तान
एखादा रंग,एखादा ढग
एखादे हिरवे पान…
ही रचना वृक्ष व गाणं या रुपकातून शब्दांची किमया सांगत राहते.
चक्र कवितेतील हे कडवं स्वागत व सुगंधित करणाऱ्या गुलाब फुलांचे सौंदर्य खऱ्या अर्थाने सजविते बहारदार करते.
किती उमलले गुलाब आणिक किती पाकळ्या गळल्या
दूर कोठल्या आभाळातून किती घनमाला वळल्या
कितीदा भिजली आणिक रुजली मुकी अनामिक माती
क्षण अंकुरती,फुलती,सुकती,युगे पलटुनी जाती..
अशा अनेक रचना काव्यमैफिलीचे माहोल तयार करतात.
'निरर्थाच्या क्षणी' या कवितेतील ओळी किती आशयघनता व्यक्त करतात.प्रतिके व रुपकांची पखरण अतिशय समर्पक आणि समृद्ध शब्दातून व्यक्त केले आहे..
वारे थकून विसावलेले आभाळाच्या वक्षावर
घरटे धरते वत्सल छाया शेवटच्या पक्षावर
सुगंधाचे सारे पीळ सैल होऊन सुटलेले
प्रत्येक फुलांचे स्वतंत्र विश्व आपल्यातच मिटलेले…..
अशीच 'आरसा'ही रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे.आशयाची शब्दकळा वैविध्यपूर्ण आणि उच्चकोटीची आहे.निसर्ग नियमाने कालचक्र सदैव भ्रमण करीत असते.त्याचा होणारा परिणाम सुंदरशा शब्दात रचलेला आहे.
अस्तित्वावरूनी ऋतू कितीतरी जातात हे वाहुनी
देहाचीही चर्चा जुनी गळुनिया येते नवी पालवी
या साऱ्या बदलांतुनी तरी कसा गाभा उरे तोच तो?
प्राणांतून झरे अनावर कशी ही धून?ही पायरी ?
येते लेवून रंग बाळपणीचे आभाळ भोळे खुळे
सांजेला क्षितिजावरी उमटती अंगाईगीते पुन्हा
जेव्हा वात दिव्यामध्ये उजळते,वाऱ्यासवे नाचते
होते कंपित उर आणि भरती डोळ्यांतुनी आसवे….
निसर्ग सृष्टीतील हिरवाई म्हणजे झाडे-वेली, तरु-लता सगळे मानवाला परोपकारी आणि उपयोगी पडणारी आहेत.दातृत्व या वृक्षमाऊली कडून शिकावं.इतकं भरभरून वृक्ष आपल्या ओंजळीत वारेमाप दान टाकतात.
झाडाचं आणि आपलं नातं उलगडून दाखवले आहे.'ते एक झाड आहे', या सुंदर रचनेतून.
हे एक झाड आहे:याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरुन जाते.
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे जाणीवओले भास.
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बाळगाणी याच्या कटिखांदी
मातीचे झाड:झाडांची मी:माझी पुन्हा माती
याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल
कधीतरी एकटे दिवशी मीच झाड होईन,
पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन.
अतिशय उत्तम साहित्यकृती असलेल्या 'गोंदण' या कविता संग्रहातून उत्तमोत्तम रचनांची मेजवानी रसग्रहण करायला मिळाली. अतिशय प्रतिभावान ,आशयगर्भ आणि सकस कविता आहेत.कवयित्री शांताबाई शेळके यांच्या लेखणीस आणि काव्यास त्रिवार वंदन!!!!
परिचयक-श्री रविंद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक:१०एप्रिल २०२२
Comments
Post a Comment