पुस्तक परिचय क्रमांक-१०७ मी एक स्वप्न पाहिलं




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१०७
पुस्तकाचे नांव--मी एक स्वप्न पाहिलं!
लेखकाचे नांव--डॉक्टर राजेंद्र भारुड (IAS)
प्रकाशक-दीपस्तंभ प्रकाशन, जळगाव
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सातवी आवृत्ती १ जानेवारी २०२१
वाड़्मय प्रकार--आत्मकथा
पृष्ठे संख्या-१६४
मूल्य/किंमत--१७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
१०७||पुस्तक परिचय
          मी एक स्वप्न पाहिलं!
          लेखक: डॉक्टर राजेंद्र भारुड (IAS)
💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆

#भिल्ल समाजातील आयएएस झालेल्या तरुणाचा प्रेरणादायी जीवनप्रवास…. पितृछत्र नसतानाही आई आणि मावशीच्या कष्टमय संघर्षातून आणि स्वप्रयत्नातून मिळविलेले नागरी प्रशासकीय लोकसेवेतील सर्वोच्च सन्मानशाली पद.त्याचे आत्मचरित्रपर पुस्तक 'मी एक स्वप्न पाहिलं!' #

"मना बी पोऱ्या एक दिन डाक्टर-कलेक्टर व्हई !!!" अशी  शब्दवाणी करणाऱ्या मायमाऊली कमलाबाईआईचे शब्द ,घरात शिक्षणाचा गंधही नसणाऱ्या मुलानं जिद्दीने उत्तुंग यश संपादन केले. समर्पित शिक्षकांच्या प्रेरणेने स्वप्नांच्या आकाशाला गवसणी घातली. गुणवत्तेच्या जोरावर इयत्ता चौथीत केंद्रात प्रथम आले आहे. जवाहर नवोदय स्पर्धापरीक्षेत त्यांना  स्पृहणीय यश मिळाल्याने अक्कलकुव्याचा नवोदयविद्यालयात प्रवेश घेतला.तिथं सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतले. जळगाव येथील नवीन सिईटी क्लासमध्ये  क्रॅश कोर्स पूर्ण केला.आणि सीईटीला १९४ गुण मिळवून एस.टी.संवर्गात राज्यात प्रथम तर जनरलमधून पाचवे स्थान पटकावले.तदनंतर शासकीय कोट्यातून मुंबईतील प्रसिद्ध शेठ जी.एस.मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस.पदवी मिळवून डॉक्टर झाले.तदनंतर भारतातील सर्वोच्च नागरी लोकसेवा परीक्षेत सुयश मिळवून  आईचे शब्द स्वप्रयत्नाने खरे करून दाखवले.त्या डॉक्टर राजेंद्र भारुड (आय.ए.एस.)यांची स्वलिखित यशोगाथा आत्मकथनपर शब्दचित्रे "मी एक स्वप्न पाहिलं!!!" 
स्वप्नांच्या आकांक्षांना गवसणी घालून यशाचे शिखर ध्येय आणि हिमतीच्या जोरावर पादाक्रांत करीत; मायमाऊली मातेने उच्चारलेली शब्दवाणी जिद्दीने पुर्ण करणारे डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या जिद्दीची ध्येयाची आत्मविश्वासाची आणि संघर्षमय, कष्टमय जीवनाची गाथा होय.
 सामोडे गावच्या इंदिरानगरातील झोपडी ते आयएएस पदापर्यंतच्या यशगाथेचा जीवनपट डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी 'मी एक स्वप्न पाहिलं!' या आत्मग्रंथात उलगडून दाखविलेला आहे..
शिक्षणाचा गंधही नसलेल्या भिलाटी समाजातील एक तरुण खडतर प्रसंगाशी व अडथळ्यांशी निर्भयपणे मार्गक्रमण करीत, आपले सोनेरी स्वप्न अभ्यासाने पुर्णत्वाला नेतो. जिद्द,ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेतील सर्वोच्चपद मिळवितो.याचे सर्व श्रेय डॉक्टर आपल्या मायमाऊली आई,कष्टमय जीवन जगणारी बायजा मावशी आणि प्राथमिक शिक्षण ते स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणापर्यंत पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करुन दिशा दाखविणारे आणि सहकार्य करणारे मदत करणारे समस्त दीपस्तंभ असणारे शिक्षकांनप्रती हा प्रेरणादायी ग्रंथ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मी एक स्वप्न पाहिलं!हा प्रेरणादायी ग्रंथ वाचनसाखळी समूहाचा 'वाचनयात्री' पुरस्कार बहाल करताना मिळालेली अनमोल भेट आहे. त्यामुळे हे पुस्तक माझ्या वाचनालयाची शान वाढविणारे आहे.संयोजिका प्रतिभाताई लोखंडे आणि  प्रायोजक कार्याध्यक्ष गणेश तांबे सरांच्या निवडीतून मिळालेली आवडती अन्य अनमोल भेट.त्यामुळे या पुस्तकाचा परिचय वाचन साखळी करून देणं माझं कर्तव्यच आहे.

या अनुभवसिद्ध वास्तव शब्दचित्र'मी एक स्वप्न पाहिलं!या पुस्तकात अनेक मान्यवरांनी या पुस्तकाचे कौतुक करुन शुभेच्छांची मोहर उठविली आहे.अभिनंदनपर संदेश प्रारंभी वाचताना या यशगाथेचा जीवनप्रवास समजतो. 
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, आदिवासी विकास आयुक्त संभाजीराव सरकुंडे,बिहारचे आय.पी.एस. अधिकारी शिवदीप लांडे आणि आदिवासींची मानवतेच्या भावनेतून विकास करणारे लोक बिरादरीचे प्रकल्पाचे विकास पुरुष डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदा आमटे यांच्या शुभेच्छा आहेत.
"विपरीत परिस्थितीला वाकविणारा, झुकविणारा किंबहुना परिस्थितीला चारी मुंड्या चीत करीत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा राजेंद्र हा लढवय्यांसाठी प्रेरणास्रोत आहे." इतकी बोलकी प्रतिक्रिया या पुस्तकाची महती अधोरेखित करते.
दीपस्तंभचे प्रकाशक यजुर्वेंद महाजन यांनी मनोगतात डॉक्टरांच्या कुटूंबातील त्यांची मातोश्री,मावशी यांच्या खंबीरतेचे आणि हृदयाने  श्रीमंत असणाऱ्या माऊलींचे गुणगान गातात.त्यांच्या प्रथम भेटीतच डॉक्टर सरांचे मित्र बनले होते.कारण कुशाग्र बुद्धीच्या जोडीला नम्रपणा आणि सुसंस्कृतपणाचा मिलाफ दिसून आला होता. प्रतिकुलतेत इतके भव्यदिव्य स्वप्न बघून ते स्वत:ला घडवत पुर्ण करणे हे अद्भुत वाटते. असं सर आवर्जून उल्लेखतात.
ग्रामीण भागातील एक मुलगा देशातील नागरी प्रशासकीय सेवेत पहिल्यांदाच यु.पी.एस.सी. परीक्षेत ७०९व्या रॅकने उत्तीर्ण होऊन 'आयआरएस' पदी विराजमान होतो.तर दुसऱ्या प्रयत्नात ५२७वी रॅकने उत्तीर्ण होऊन भारतातील सर्वोच्च नागरी प्रशासकीय सेवेत 'आय.ए.एस.'पद स्वकष्टाने मिळविले.सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेमळ सुचने नुसार त्यांनी पुस्तक लेखनाचा आग्रह डॉक्टर राजेंद्र भारुड यांना केला. 
या जीवनप्रवास लेखन करण्याचा  मुख्यतः उद्देश ,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी व्हावा. मुलांच्यात आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण व्हावी. गरिबी,प्रतिकुलता आणि शिक्षण यांचा बाऊ न करता जिद्दीने मनातील स्वप्न पुर्ण करु शकतो. अशी कष्टमय दास्तान मुलांना वाचायला मिळावी. त्यातून लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली यासाठी या सक्सेस स्टोरीची आत्मकथा व्यक्त झाली आहे.
हे पुस्तक तयार करताना ज्यांनी ज्यांनी लेखणीला आत्मबळ व प्रेरणा दिली.पुस्तकाचे शिवधनुष्य पेलण्याचे महनीय कार्य करणाऱ्या  सहकार्यशील हातांना कृतज्ञतापूर्वक आभार मानतात.तसेच या पुस्तकावर संस्करण करणाऱ्या प्रती ही स्नेहार्दपुर्वक धन्यवाद व्यक्त करतात.
मी एक स्वप्न पाहिलं! या अनुभवसिद्ध विद्यार्थी दशेतील ज्ञानाचा-शिक्षणाचा जीवनप्रवास १८ लेखांच्या माईलस्टोन मध्ये उलगडून दाखविली आहे.शीर्षक लेखांमध्येच आशयांची मांडणी अतिशय रंजकपणे सहज सुंदर प्रवाही भावस्पर्शी हृदयस्पर्शी शब्दात गुंफलेली आहे. रसग्रहण करताना अनेक सुखदुःखत घटनांमुळे मनात वेदना-संवेदनांची वलय निर्माण होतात. काळजाला हात घालतात अन् सामाजिक परिस्थितीवर चिंतन करायला भाग पाडतात. इतकं वास्तववादी निरपेक्ष व निरखलपणे इत्यंभुत वर्णन केले आहे.घटना- प्रसंगांचे यथासांग वर्णन वाचताना काळजाला भिडते.इतकी ओजस्वी भाषाशैलीत अनुभवकथन लेखणीतून पाझरलेले आहेत.
निकालाचा रोमांचकारी अनुभव, माझ्या जन्माआधीची कहाणी,माझा जन्म अन् माय- मावशीचे कष्ट, आणि माझा पाय वाचला!, शाळा: एक प्रकाशवाट,माझं गाव माझी वस्ती,मना बी पोऱ्या एक दिन डाक्टर-कलेक्टर व्हई!माझे शिक्षक-माझे दीपस्तंभ, माझ्या आयुष्याचा नवोदय,'सातपुडा हाऊस'च्या आठवणी,मु.पो.नवोदय विद्यालय राजस्थान, 'सीईटी'मधील उत्तुंग यश,आकर्षणाचे वास्तव व मानसिकता, 'एमबीबीएस' जी.एस.मेडिकल कॉलेज,कॉलेजची सहल,मी एक स्वप्न पाहिलं!, युपीएसीची तयारी आणि मी आय.ए. एस.झालो! या शीर्षकाखाली जीवन प्रवासातील मानांकित माईलस्टोन लेख मालिका आहे.वर्णन वाचताना आपली उत्कंठा आणि कुतूहलही वाढत जाते.इतकी सुंदर आणि ओघवत्या शैलीत डॉक्टर व्यक्त झाले आहेत.
परीक्षेतील मुलाखतीचे वर्णनही मंत्रमुग्ध करणारे आहे.ते म्हणतात की,'स्वप्न बघायला आणि ते पुर्ण करण्यासाठी तयारी करायला वयाची मर्यादा नसते.प्रयत्न प्रामाणिक असतील तर लहान वयातही मोठं स्वप्न बघायला हरकत नसावी.' तसेच 'बेस्ट स्टुडंट अॅवार्ड'साठीच्या मुलाखतीत,"भविष्यात तुला काय व्हायचय?"या प्रश्नाचे उत्तर विनम्रतेने त्यांनी दिले."मला गरीब आणि तळागाळातील लोकांसाठी जी काही चांगली कामे करता येतील तेवढी करायची आहेत.त्यासाठी मी युपीएससी परीक्षा देऊन आय. ए. एस. अधिकारी होऊ इच्छितो.कारण त्यावेळी माझ्याकडे अधिकारही असतील.त्यामुळे भौतिक सुविधांचा विकास व विस्तार करु शकेन."अशी भारावून जाणारे विचार आपणाला वैचारिक अनुभव देतात…
अतिशय प्रेरणादायी आत्मचित्र आदरणीय लेखक डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी रेखाटले आहे.त्यांच्या विद्यार्थी ते सनदी अधिकारी या शैक्षणिक आणि स्पर्धापरीक्षेच्या यशगाथेस सलाम आणि लेखणीस दंडवत….अप्रतिम प्रेरणादायी आत्मचित्रात्मक शब्दबध्द केलेला 'मी एक स्वप्न पाहिलं!'संघर्षग्रंथ आहे.

परिचयक-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक.८एप्रिल २०२२

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड