पुस्तक परिचय क्रमांक:१३३ रफ स्केचेस



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१३३

पुस्तकाचे नांव-रफ स्केचेस 

लेखकाचे नांव- सुभाष अवचट 

प्रकाशक-समकालीन प्रकाशन , पुणे 

प्रकाशन वर्ष व आवृत्ती- डिसेंबर २०२२  

पृष्ठे संख्या–२००

वाड़्मय प्रकार- कथाचित्र

किंमत /स्वागत मूल्य--४००₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१३३||पुस्तक परिचय

         रफ स्केचेस 

लेखक: सुभाष अवचट ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

अनेक लेखक-कवींच्या पुस्तकांचे कव्हर, जाहिराती आणि पोर्ट्रेट तयार करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार  सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही 'रफ स्केचेस' ही साहित्य कृति.आपल्याला त्यांच्या आजवरच्या जीवनप्रवास सोबत ब्रश,हात आणि मन यांच्या त्रिवेणी आविष्कारातून कागदावर चितारलेली चित्रे.या चित्रांचा अंतर्बाह्य प्रवास उलगडून दाखवितात. चित्रकलेची सेवा करणाऱ्या थोर जागतिक प्रसिद्ध पावलेल्या कलाकारांची ओळख अधोरेखित करतात.त्यांना आयुष्यात भेटलेली दिग्गज माणसं,त्यांच्याशी झोडलेल्या गप्पांच्या मैफली, त्यांचं वेगळेपण आणि प्राणप्रिय चित्रांची प्रोसेस, त्यामागील मनातील विचार चित्रा प्रमाणेच शब्दसाजात रंगविले आहे.त्यांचे लिखाण उत्स्फूर्त आणि लखाखतं आहे.त्यांचे विचारविश्व आणि त्यामागची प्रोसेस समजून घेण्याची संधी आपणाला मिळत नाही.

चित्रकार लेखक सुभाष अवचट यांचे वाई येथील १०७ व्या वसंत व्याख्यानमालेत 'प्रतिभा आणि प्रतिमा ' या विषयाची मुलाखत डॉ.शंतनू अभ्यंकर यांनी घेतली होती.त्यावेळी या पुस्तकातील अनेक किस्से आणि त्यांना भेटलेल्या अनेक व्यक्तीमत्त्वाबाबतची नव्याने माहिती मिळाली.१५मे२०२३ यादिवशी हे पुस्तक खरेदी करून त्यांची स्वाक्षरी घेण्याची आणि त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. अप्रतिम मुलाखत झाली.चित्रांचे अनेक पैलूंवर त्यांनी हसतखेळत चर्चा केली.

'रफ स्केचेस 'हे पुस्तक त्यांनी जेष्ठ बंधू लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांस अर्पण केले आहे.३९ कथांमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्त्वाची जडण घडण होताना घडलेले प्रसंग आणि चित्रकला या विषयी शब्दचित्र रेखाटले आहे. 

        चित्रांतून व्यक्त न होणाऱ्या अनेक कल्पना,गोष्टी त्यांनी लॉकडाऊनच्या काळात लिहिलेल्या आहेत.हे ते मनोगतात नमूद करतात.ते म्हणतात की,'आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं, देश-परदेशातील प्रवास, बालपणीच्या साठवणीतल्या आठवणी,देशोदेशीचे चित्रकार,त्यांची चित्रं,त्यामागचा त्यांचा विचार,त्यांचे मानसशास्त्र असा कितीतरी माहितीचा खजिना यामधून उलगडून दाखविला आहे.'रंग आणि शब्दांच्या भाषेतून फुललेली साहित्यकृती म्हणजे "रफ स्केचेस".माणसांवर लिहिलेलं माणसांना वाचायला आवडते.म्हणून त्यांनी साहित्यिक ग.दि. माडगूळकर पासून पु.लं.देशपांडेंपर्यंत तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ते शांताबाई शेळके यांच्या पर्यंत आणि शशी कपूर ते ओशोंपर्यंत त्यांच्यातील व्यक्तिमत्त्वाची ओळख प्रस्तुत केली आहे.ती रसग्रहण करताना आपणही भारावून जातो.त्यांच्या मनातील विचार, भावना त्यांनी या पुस्तकात व्यक्त केल्या आहेत.    त्रिभुवन,डाक बंगल्यातलं भूत,शुभ्र ताठ रेघ,गहन-गूढ जी.ए.,रोडस्टर सुर्वे, चटका, शास्त्रीजींची वाई, पाण्यावरील सही, तळं,शांताबाई,मुक्काम साहित्य सहवास, अब्बाजान, धाकटेपण संपलं,अरण्य, देऊळ,सिक्रेटस,हवेहवेसे भास, बेनजी़र, काजव्यांचं घर,मोंमार्त् आणि मिसळ क्लब,वीतभर अंतर,हुंदका,'जहांगीर'च्या पायऱ्या,माझ्यात मी,सेल्फ-पोर्ट्रेट्स, प्रोसेस, कल्हई,अलिप्त, विसर्जन,बंद फाइल मधील चित्रं,अश्वत्थामा, अस्वस्थ, भय,वेदनेशी दोस्ती, चेहरे,स्वप्नं, फॅन्टसीज,किमया, निर्वाण….आदी शीर्षक लेख 

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची भरारी अधोरेखित करतात.

ते लेख वाचताना बालपणीच्या गमतीजमती आणि कमर्शियल आर्टिस्ट काळातील स्टुडिओतील गप्पांची मैफल आपल्या मनात घर करते राहतात. अतिशय समर्पक आणि यथार्थ शब्दातून चितारलेले चित्रच आपल्या समोर उभे राहते.सहज सुंदर प्रवाहितपणे लेखन केले आहे.

कलेच्या त्रिभुवनाचा एक छोटा दरवाजा त्रिभुवनने उघडून दिला.ते ब्रह्मांड आयुष्य भर पुरणारं आहे.भूताखेताच्या भीतीदायक कथा डाक 'बंगल्यातलं भूत' यात समावेश केला आहे.'तात्या'व्यंकटेश माडगूळकर यांच्या सोबत फिरणं, एकदा तात्या,मारुती चितमपल्ली आणि सुभाष अवचट मेळघाटातील जंगलात भ्रमंती करतात. तेथील रेस्टहाऊस मधील गंमत अतिशय विनोदी इंटरेस्टिंग शैलीत रेखाटली आहे.तर प्रतिभावान साहित्यिक पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या स्नेहमय मैत्रीची घट्ट भेट 'शुभ्र ताठ रेघ' या लेखात गु़ंफलीय.आकाशाएवढ्या ऊंचीची अनेक माणसं माझ्या स्टुडिओत आणि घरी वावरली.लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या बरोबर झालेल्या गप्पांचा तपशील 'गहन-गूढ जी.ए.'या लेखात मांडलाय.तर रोबस्ट सुर्वे या लेखात कविवर्य नारायण सुर्वे यांनी जंगली महाराज रोडवरील बुटाच्या दुकानाच्या पायरीवर रात्री दीड वाजता'माझे विद्यापीठ'ही कविता ऐकविली.

ते म्हणतात की,'नारायणरावांनी किती तरी भोगलं होतं,ते त्यांच्या शरीरावर होतं-चेहऱ्यावर होतं.मागे वळवलेल्या केसांतून हे सारं दिसायचं.' आयुष्यभर ते कठीण परिस्थितीत जगले.सारं जगणं कामगार वस्तीत.त्या आठवणींचे अनेक वळ त्यांच्या शरीरावर उमटलेले होते. त्यांच्या अनेक लोकप्रिय पुस्तकांचे कव्हर मुखपृष्ठ सुभाष अवचट यांनी केले आहे.मी रफ स्केचेस काढतो तसे होते नारायणराव सुर्वे.अमेय प्रकाशनचे पिंपळापुरे आणि खानोलकर मामा यांची कहाणी'चटका'या कथेत सादर केली आहे. वाईचे तर्कतीर्थ पद्मभूषण लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सामाजिक आणि मराठी भाषेच्या कार्याची माहिती 'शास्त्रीजींची वाई' या लेखात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची माहिती अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिकित्सकपणे मांडली आहे.वाई येथील विविध निसर्ग  सौंदर्याचे ,वाड्याचे,कृष्णा नदीचे वर्णन अप्रतिम केले आहे. शास्त्रीजीच्या जीवनातील पैलुंचे वर्णन वास्तव केले आहे.पाण्यावरची सही ही कथा एका कवडीचुंबक माणसाची आहे.शांताबाई शेळके यांच्या बरोबरच्या गप्पा वाचताना उत्तर आयुष्यातील माहिती समजते.

मुंबई येथील साहित्य सहवासातील माहिती वाचताना चित्रकाराच्या स्टुडीओची खास ओळख होते.अनेक कलाकारांचे किस्से समजून घेता येतात.स्मिता पाटील, विनोद खन्ना, अरविंद गोखले, शांताबाई शेळके, सत्यदेव दुबे आदी.अब्बाजान कथेत आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांच्या चित्रकार्याची ओळख करून दिली आहे.'धाकटेपण संपलं' या कथेत ओतुरच्या लागल्याचं आणि कुटूंबातील सर्वांचे किस्से समजतात.बालपणीच्या आठवणी छानच शब्दात टिपलेल्या आहेत.थोरल्या भावाचे आकस्मिक निधनामुळे झालेली पोकळी भावस्पर्शी शब्दात व्यक्त केली आहे. पावसाळ्यातील निसर्गाचे वर्णन रंगांच्या छटेप्रमाणे रेखांकित करून शब्दात मांडलेय.परदेशातील चित्रकारांचे स्केचिंग आणि चित्रांची भाषा सुंदर शब्दात मांडली आहे.

' वीतभर अंतर'मध्ये अभिनव कला महाविद्यालयात असताना शिक्षणातील घटना प्रसंग बोलके केलेत.तर जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्र प्रदर्शित करणं आणि पेंटिंग्ज विक्री आणि नवख्या चित्रकाराला मिळणारा आनंद छानच शब्दात टिपलाय. आठवणींना उजाळा देणं म्हणजे जुन्या भाड्यांना कल्हई लावण्यासारखं आहे.

झाडाचं पिकलं पिवळं पान फांदीवरून निसटतं.हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखं जमिनीवर अलगत टेकतं आणि विसर्जित होतं.त्याप्रमाणे जीवनातील अनेक घटना 'कालाय तस्मै नमः' प्रमाणे विसर्जित होतात.

करोना काळातील मिळालेल्या वेळेचा उपयोग त्यांनी वॉटर कलरने चित्र रेखाटन करण्यासाठी केला.एकटेपणा असहाय होत असताना त्यांनी त्याही दिवसांचे सुवर्ण क्षणात रुपांतर केले. आणि लाॅकडाऊनची बंद फाईल चित्रांनी भरली. अस्वस्थ अश्वत्थामा हेही लेख विचारांना चालना देऊन मंथन करायला लावणारे आहेत.भय आणि वेदनेला पाठीशी न घालता तिच्यावर आरूढ होऊन येणाऱ्या परिस्थितीशी सामना करणं कसं असतं याचा परिपाक या लेखात मांडलेला आहे.

 सर्व कलांची जननी चित्रकलेला म्हटलं आहे.कलेतला आनंद इतका साधा आणि निष्पाप असतो. तो बघायला, टिपायला दृष्टीची गरज असते.जगातील शेकडो कलाकार सर्जनशील आणि सृजनशील शक्तीने आगळीवेगळी नवनिर्मिती करत असतात. ज्याच्याकडे दृष्टी आहे तो प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते त्याच्यापलीकडचं जग ते बघत असतात.त्यातून तयार झालेली कृती चित्र,वस्तू, शिल्प, लेख,काव्य, संगीत आदी कॅनव्हासला आपण कुतूहलाने किमया संबोधतो.

जगातील महान कलाकारांनी चित्रकार, संगीतकार, लेखक ,कवी आणि शिल्पकार यांनी मनाचा शोध कॅनव्हासवर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.ती कृती करताना त्यांना चैतन्याचा झरा सापडत गेला.या महान कलाकारांनी वस्तू आणि वास्तू रुपात जगाला मौलिक पुरावा ठेवलेला आहे.चित्रकार पिकासो,अन्वर हुसेन ,व्हिसेंट विल्येम व्हॅन गॉग,ब्र्युगल फ्लेमिश चित्रकार,डच पेंटर रेम्ब्राॅं,लिओ नार्दो द विंची आदी महान चित्रकारांचे चरित्र 'रफ स्केचेस'मधून वाचकांच्या मनावर ठसा उमटवते.

अप्रतिम शब्दसाजात या कुंचला आणि लेखणीच्या धारणेतून आयुष्याच्या वाटेवर भेटलेल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होते. त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंची माहिती समजते.अतिशय अप्रतिम शब्दांकन, आठवणींच्या शब्दचित्रात रेखाटले आहे.आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे…

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड