पुस्तक परिचय क्रमांक:१३१ एक भाकर तीन चुली
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१३१
पुस्तकाचे नांव-एक भाकर तीन चुली
लेखक- देवा झिंजाड
प्रकाशक- न्यू ईरा पब्लिकेशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-डिसेंबर २०२३ प्रथम आवृत्ती
पृष्ठे संख्या–४२४
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--४५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१३१||पुस्तक परिचय
एक भाकर तीन चुली
लेखक: देवा झिंजाड
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
गावखेड्यातील शेतकरी आणि शेतमजूर स्त्रियांच्या जीवन संघर्षाची अन् आलेल्या संकटांना हिम्मतीने सामोरं जात आपल्या कुटुंबाची जोपासना करणाऱ्या स्त्रीची कहाणी. या कादंबरीचे मुख्य बीज खेड्यातील स्त्रीने आपल्या आयुष्याची होरपळ परवड कुचंबणा होत असताना सुद्धा आपल्या मुलाला काबाडकष्ट करून शिकवलं.हे मुख्य कथाबीज आहे.
बऱ्याच दिवसांनी एक अस्सल मराठमोळं साहित्य .मातृत्वाचे जीणं जगताना झालेली आयुष्याची होरपळ आणि परवड वास्तव शब्दात लेखक देवा झिंजाड यांनी व्यक्त केलीय वेदनादायी कथा’एक भाकर तीन चुली’.
मातृत्वाचे महामंगल स्तोत्र ‘श्यामची आई’ साने गुरुजींची,’ आई समजून घेताना’ पत्रकार उत्तम कांबळे यांची मातृत्वाची गौरवगाथा,शेतीशी नाळ जपणाऱ्या साहित्यिक आनंद यादव यांच्या गरिबीचे श्रीमंत शब्दचित्र उभारणारी शेतकरी ते साहित्यिक आनंद यादव यांचा जीवन प्रवास 'झोंबी',‘ 'नांगरणी’ आत्मचरित्र गावखेड्यातील संघर्ष जगणं आणि शिकणं व्यक्त करतात.तसंच खेडेगावातील कष्टकरी स्त्रियांच्या जीवन संघर्षाची गाथा लेखक देवा झिंजाड यांनी ‘एक भाकरी तीन चूली’या ग्रंथात व्यक्त केली आहे. तसेच काळीज पिळवटून टाकणाऱ्या दु:खभोगाची ही गोष्ट वास्तवपणे प्रत्यक्ष घडलेल्या ठिकाणी पायपीट करून समजून उमजून घेऊन व्यक्त केली आहे.
अनुभवाच्या अनुषंगाने ग्रामीण कष्टकरी शोषित आणि गांजलेल्या स्त्रीचं जगण्या- भोगण्याचा आत्मशोध या संघर्ष गाथेत संवेदनशील मनाने तीन पिढ्यांचा आयुष्य पट ‘एक भाकरी तीन चूली’मध्ये मांडला आहे. चिंता,भय,अभाव, वैफल्य आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीचं दळण दळताना ओव्या अन् शेतात कष्ट उपासताना म्हटल्या जाणाऱ्या भलऱ्या जगण्याची उमेद देऊन मनगटात बळ भरतात.
रसिक वाचकांना भुरळ घालणारे अप्रतिम पुस्तक आहे.या पुस्तकाला आदरणीय साहित्यिक डॉक्टर आ.ह. साळुंखे यांनी प्रस्तावनेची मोहर उठवून या कादंबरीच्या वाचनाची ऊंची उठावदार केली आहे.लेखक देवा झिंजाड आपल्या मनोगतात या कादंबरीच्या लेखनाचा इतिहास मांडत रसिक वाचकांना शब्दांच्या सामर्थ्याने कादंबरी वाचनाची उत्सुकता वाढवतात.बहुजन समाजातील महिलांच्या शोषणाची, संघर्षाची, त्यागाची आणि संवेदनाची कथा त्यांनी अगदी पोटतिडकीने मांडली आहे.
जीवनाचा संघर्ष बघतच मोठा होत गेलो. त्यातूनच प्रेरणा मिळाल्याचे लेखक मनोगतात अधोरेखित करतात.स्त्रीच्या भूमिकेला समजून उमजून घ्यायला फार लांब न जाता, मातेच्या रुपातच विविध भूमिकेतील चेहऱ्यांचे दर्शन होत गेले. कवितेतून व्यक्त होत होत कथांचे लेखन करु लागलो. याचा ते आवर्जून उल्लेख करतात.
या कादंबरीची आवृत्ती प्रकाशित होईपर्यंत प्रत्यक्ष मदतगारीने हातभार लावणाऱ्या, साथ देणाऱ्या सर्वच स्नेहार्द व्यक्तींचा कृतज्ञतापूर्वक नामोल्लेख केला आहे. शेतीच्या कामातून होणारी परवड, कुचंबणा,कोंडमारा, उपासमारी, सोशिकता, बालंट,आरोप,अन्याय,चारित्र्य हनन आदींचे चटके सोसत जगली. सासरमाहेरचा ऋणानुबंध, भावकीचा तिरस्कार आणि कालपरत्वे होणाऱ्या अग्निपरीक्षेला सामोरे जातं आईचं जगणं घडलं होतं.आयुष्यभर काबाडकष्ट केलं. तीचं जगणंच त्यांच्या लेखणीला प्रेरक ठरलं आहे.तीच कथा वास्तव आणि भावस्पर्शी शब्दसाजात मांडली आहे.
या कादंबरीतील एकूण एकतीस प्रकरणं कादंबरी उलगडून दाखवितात.त्यांची शिर्षकेही आशयघन असून खास ग्रामीण बाज कायम राखत गुंफलेली आहे.मातेच्या जीवन संघर्षाची कथा वाचताना अक्षरशः मेंदूला झिणझिण्या येतात आणि डोळ्यातून आसवं टिपकतात.मनात बैचेनी आणि अस्वस्थता निर्माण होते.इतकं काळजाला भिडणारं लिखाण आहे.
पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांच्यावर अन्याय, संशय,आरोप, आळ घेत त्यांची परवडच केली आहे. कादंबरीची नायिका पारुने समाजातीलअतिशय वाईट प्रवृत्तीं विरुध्द दिलेली अतिशय कडवी झुंज अतिशय गांभीर्याने मांडली आहे. शेतीशी असलेलं अजोड नातं नावापुरतेच आहे.कारण हरेक खेडेगावातील स्त्रियांना स्वातंत्र्यपुर्व काळात शेती नाहीतर शेतमजुरी करायला लागायची.मायेची माणसं भावकीच्या इभ्रतीपायी आसरा न देता आपल्याच आयुष्याची अनवाट चोखाळत-ठेचकाळात पुढं चालायचं. मनावर निखारे ठेवून निर्भयपणे जगायचं.पारुच्या जन्माची चित्तर कथा. तिचा जन्मच शेतातल्या खळ्यात होतो.अन् मुलीला घरी घेऊन गेल्यावर रंग्या सासरा वंशाला दिवा झाला न्हाय म्हणून तिला सपरातच घेत नाही. त्यामुळं तुळसा अन् तान्ह्या बाळाला बाप येईपर्यंत गोठ्यातच रहावं लागलं.लहान लेकराची परवड जन्मापासूनच सुरु झाली.
वयाच्या दहाव्या वर्षीचं तिच्या कपाळी सौभाग्य लेणं लिवलं.ते तिच्या आज्याने मुलाला न विचारता नातीचं लग्न ठरविलं. कपाळापेक्षा मोठ्ठं कुंकू घेऊन आयुष्यभर मन मारायचं होतं.मागं न हटता फक्त लढायचं.आईने पारुला दिलेला लोखंडी विळा कंबरेला खोचून स्वत:च्या जिवाला जपायचं होतं.
भिजलेल्या पदरानं झिजणाऱ्या चुंबळीला सांभाळीत संसाराचं रहाटगाडगं पदर न आलेली पोरं पदर सावरत ओढत होती.सासू नणंद अलकी आणि गांज्यात तर्रर्र असलेला दगडू तिचा छळ करीत. अपशब्द वापरीत. मारझोड करीत.एका महिन्यातच निरारस पारुला वैधव्य आले. तिचा संसार कडवट कडूलिंबाच्या पाल्यासारखा झाला.तिचा नवरा सततच्या गांजा फुकण्यामुळे मेला.अन् सासू आणि नणंद तिला पांढऱ्या पायाची कैदासिनी म्हणू लागली. वाढत्या वयात कपाळावर बुक्का लावून लढावं लागणार होतं. उसवलेल्या आयुष्याला ठिगळं लावत माहेरी बसावं लागणार होतं.सगळ्या भावनांना दाबून पुतळ्या सारखं निश्चल रहावं लागणार होतं. दुसऱ्याच दिवशी सासूने तिला घराबाहेर काढले होते.कारण हिचा पायगुण चांगला नव्हता.असं तिला त्या दोघी हिणवत होत्या.
गावकी आणि भावकीला दिलेली जबरदस्त थोबाडात म्हणजे ‘एक भाकर तीन चुली‘ ही कादंबरी आहे.लेखकाने पोटतिडकीने व्यक्तता केली आहे.यात स्त्रियांच्या परवड, कुचंबणा आणि अवहेलची भोगलेले ज्वलंत समस्या जगासमोर दर्दभऱ्या भावस्पर्शी शब्दात रेखाटली आहे.
रंग्या आज्जा पारुला पावलागणिक उठता बसता शिव्याशाप द्यायचा. बहिणीच्या लग्नाचा मुख्य अडसरात तिला गणलं जाऊ लागलं.आज्याने वडगावच्या
जगताप घराण्यातील शहाजीशी तिचा दुसरा घरोबा जोडला.त्याचही भरपेट व्याज घेतलं.या घरी तिच्यावर मात्र शहाजी असे पर्यंत आनंदीआनंद होता.सासू सासरा दीर जाऊ आदींच्या पोटात शिरून तिनं आपलेसे केले होते.पण तिचा पाताळयंत्री चुलतदीर नरपति त्यांच्या वाईटावर टपलेले होते.तिला अपशकुनी म्हणायचे.तिचा पाण उतारा करायचे. पुन्हा तिच्या घराचिही पडझड सुरू झाली. वयाच्या तिसाव्या वर्षी वैधव्य आलं.ऐन तारुण्यात एकाकी पडली.चार लेकरं, गुरेढोरे,बैलं, शेती ह्याची जबाबदारी तिच्यावर पडली. बापाविना असणाऱ्या पोरांना रक्ताच्या नात्याने घात केला होता.जमीनीच्या इस्टेटीपायी आईला मुलांपासून पोरकं केलं होतं.तिची लुबाडणूक आणि फसवणूक केली होती. तिचं आयुष्य बरबाद करत होते.मुलांच्या सुखासाठी तिनं जड अंतःकरणाने मनावर दगड ठेवून माहेराला निघाली.
इथही आज्जा पारुला वैरीणी सारखा वागवत होता.तिच्या मनाची द्विधा अवस्था झाली होती.मनाचा हिय्या करून ती भल्या पहाटेच घराबाहेर पडली.इतरांना त्रास न देता आपलं आपण हिमतीने लढा देत रहायचं आणि जगायचं.
पाटाच्या कामावर स्वयंपाकाचं काम मिळाल्यावर येवले मावशी देवासारखी भेटते.तिच्याच घरी ती राहते.दोघी बहिणीबहिणी सारख्या राहतात.मुकादमाने आगळीक केल्यावर त्याचा प्रतिकार मोडून काढते.त्याला जन्माची अद्दल घडविते. त्यामुळं तिला काम सोडावं लागतं.
मावशीच्या घरी मुकादमाचा नोकर रामा , ती कामावर का येत नाही याची चौकशी करायला आणि तिचा पगार घेऊन आलेला असतो.घरी आल्यावर गप्पा मारताना सहजच लग्नाचा विषय निघतो.लग्न करण्याचा इरादा दोघांनाही स्वतंत्रपणे समजावून देते.तदनंतर दोघांचा होकार आल्यावरच येवले मावशी पुढाकार घेऊन दोघांचं लग्न लावून देते.आणि आनंदाची हिरवळ तिसऱ्यांदा पारुच्या आयुष्यात येते.मग शेतमजुरीचं काम पाचवीलाच पुजलेली असतं.झाडाला पालवी फुटते. आता याच मातीतल्या चुलीवर कष्टाची भाकरी भाजून पोट भरायचं.रडायचं नाही तर लढायचे.अन् अंधारातच बबूचा म्हणजेच लेखक देवा झिंजाड यांचा जन्म झाला.
अनिष्ट रुढी परंपरेवर आघात करणारी स्त्री.चारित्र्यहनन करणाऱ्याला सणसणीत कानशिलात लगावणारी मातेचे रुप बघितलं की मातृत्वापुढे माथाच टेकविला पाहिजे.इतकं भयावह भयानक असताना आपल्या पोरानं शिकावं यासाठी हाडाची काडं करणारी मायमाऊली..
व्यसनापायी पारुबाईला तिच्या आज्याने बालपणातच बापाला न विचारता व्यसन करणाऱ्या थोराड माणसाशी व्याजाच्या लालसेपोटी लग्न ठरविलं होतं.अन् त्यापायी तिच्या माहेरच्या घराची वाट लागली.तर हातातोंडाशी आलेला स्वत:चा पोरगा नरपती नावाच्या चुलत दिराने कान फुंकल्यामुळे आणि व्यसनाच्या आमिषायापायी आईच्या विरोधात उभा ठाकला होता.तसाच आपला बबुही वाया जाऊ नये म्हणून भावकीतल्या घातकी ठका आणि कोंडिबा ह्यांच्यापासून तुटाक रहायला सांगत होती.कारण तिच्या पूर्वायुष्याबद्दल मुलाचं कान भरतील. म्हणून आईचा पहाटेच जात्यावर दळण दळताना गळा फुलायचा अन् मनातलं सगळं जात्याच्या कानात सांगायची.मग आईचा गळा गहिवरून गायचा.
गरिबी हीच जगण्याची प्रेरणा देत होती. कारण अपमान, फसवणूक आणि अन्याय विसरायला गरीबीच लावत होती.गावच्या क्रिकेटच्या सामन्यात पिच तयार करणे आणि खेळाडूंना थंडगार पाणी पुरविण्यासाठी मला किती कष्ट करावे लागले असतील याचा पुसटसा विचारही न करता मला ठरवून दिलेलं पैसे न देता कमी दिले.कारण मी गरीब होतो.प्रतिकूल परिस्थिती च्या पिचवर कष्टाची चोपणी मारुन आयुष्याचा सामना जिंकण्याची उमेद गरिबीनेच दिली.
गरीबाच्या पिचला हिमतीने नीटनेटकं करणारी माझी आईच खरी पिच क्युरेटर होती.असा आवर्जून मातेच्या थोरवीचा उल्लेख लेखक देवा झिंजाड करतात.मातोश्री साध्या साध्या कृतीतून ती आयुष्याला चिरकाल टिकणारे मोठमोठे संस्कार करीत होती.
संकटांच्या माळेतून लढताना जीवाचा घातपात न करता हरेक संकटांशी पारुबाईंनी सामना केला आहे.पुरुषप्रधान संस्कृतीला दोनदा आव्हान देण्याचं धाडस त्यांनी केलं होतं. त्यावेळी एखाद्या तरूणीचा नवरा लवकर मृत्यू पावला तर तिनं दुसरं लग्न न करता माहेरी जाऊन गपगुमान पोट भरावं लागतं होतं.अशा काळात तिनं तिसरं लग्न केलं होते. घाणेरडे आरोप सहन करत कुणालाही प्रतिकार न करता जगत होती.रात्रंदिवस पडेल ती कामं करत शेतमालकांची मन जिंकत होती. कारण ती वाघीण होती.तर अडीनडीच्या वेळप्रसंगी इतरांच्या मदतीलाही धावत होती.पण एखाद्याने लाळघोटेपणा केलाच तर कमरेच्या विळ्याच्या धाकानं रुद्रावतार धारण करून प्रतिकारही करत होती.मुलाच्या सुखासाठी स्वता:ला दु:खाच्या खाईत लोटणारी माझी माय होती.
माझ्या शिकण्यासाठी ती जीवाचं रान करीत होती. लेखकाने दिलेली उदाहरणे आणि घटना प्रसंग वाचताना अंगावर अनेकदा शहारे येतात.डोळ्यातून अश्रू ओघळतात. मन सुन्न झाले.जसेच्या तसे प्रसंग आपणा समोर घडतायत, इतकं मनस्पर्शी व्यक्तता कादंबरीत केली आहे.
छोट्या छोट्या प्रसंगांतून आई त्यांना जीवनाचे तत्त्वज्ञान पटवून देत असते. जातियतेबद्दल आईचं पुरोगामित्व अनेक प्रसंगांतून दिसून येते.लेखक शिक्षण घेताना छोट्या छोट्या कामातून आईला मदत करत असतात.शिक्षणासाठी पैसे उभाकरण्यासाठी हरेक काम आपलेपणाने करतात.
लेखक सातवी पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी पैसे कसे उभे करावेत ? यासाठी लेखक काय काय दिव्य करतात.हे वाचताना आपलाही भुतकाळ ऊभा राहतो. आपोआप त्या काळातील आर्थिक परिस्थितीची जाणीव निर्माण होऊन उणीवा नजरेसमोर झोका घेतात. आठवीला शिक्षणासाठी कोसो दूर जावं लागतं.त्याच्या आदल्या दिवसाचं आणि प्रत्यक्ष दिवसाचं वर्णन वाचताना मनातील भावना अनावर होते.आई आणि मुलांचं हृदयाचं नातं त्या प्रसंगातून उलगडून दाखविले आहे.आपली परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे अनेकदा आईने लेखकास पटवून दिले आहे.
या कादंबरीतील काळजाला घावं घालणारं आणि आर्त वेदनेची सल निर्माण करणारं, विचाराला निःशब्द करणारं लेखकाचे स्वगत-”माझ्या मायेच्या आयुष्याची भाकरी एका चुलीवर की भाजलीच नाही.ती पहिल्या काठवठीत थापली. चुलीवरल्या तव्यात भाजायला टाकली पण कोमेजून गेली. दुसऱ्या ठिकाणच्या चुलीवर पुन्हा तव्यावर टाकली.तिथं ती थोडीशी भाजली,पण निखाऱ्यावर भाजायच्या आधीच चुलीत आणि निखाऱ्यावर नियतीनं भडाभडा पाणी ओतलं.तदनंतर ती पुन्हा तिसऱ्या ठिकाणच्या चुलीवर भाजायला घेतली,पण दुर्दैवाने तिथंही ती करपून गेली.तिच्या आयुष्याच्या भाकरीचा वनवास शेवटपर्यंत संपलाच नाही. तिच्या वाट्याला नेहमी एक भाकर तीन चुली आल्या.”
“पोटात शिरून रहा….लई शिक,मोठा हो…”आईचे शब्द कानात घुमत होते.
बऱ्याच दिवसांनी खेडेगावातील एका संघर्ष करणाऱ्या स्त्रीची कहाणी वाचायला मिळाली…अप्रतिम गांभीर्याने वास्तववादी शब्दचित्र आई आणि लेखकाचे कादंबरीत चितारले आहे.आपल्या लेखणीस त्रिवार वंदन आणि सलाम!!!
रसिक वाचकांनी आवर्जून वाचावी अशी अप्रतिम कादंबरी “एक भाकर तीन चुली”.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
मनाला भावणारे शब्दांकन👌🙏
ReplyDeleteधन्यवाद .आभारी आहे.
ReplyDelete