पुस्तक परिचय क्रमांक:१२२मास्तरचं पोरं





📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
१२२||पुस्तक परिचय
          मास्तरचं पोर
लेखक: शिरीष पडवळ
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१२२
पुस्तकाचे नांव--मास्तरचं पोर
लेखक- शिरीष पडवळ
प्रकाशक- यशोदीप पब्लिकेशन्स,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती  डिसेंबर २०२१
पृष्ठे संख्या--७२
वाड़्मय प्रकार-आत्मचित्र
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
"""""""""""""""""""""""""""""""
''माणूस आयुष्यभर शिकत असतो.'' हा प्रेरक विचार साध्य करणारे व्यासंगी अवलिया कलाकार म्हणजे शिरीष पडवळ सर होत.कारण वयाच्या सत्तावनव्या वर्षात त्यांनी एम.ए.ला प्रवेश घेतलाय. बी.एस्सी., डी.फॉर्म उत्तीर्ण होऊन फॉर्मासिस्टची सरकारी नोकरी करत करत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेचा पाया असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पुणे परिसरात नावलौकिक मिळवला आहे. उत्तम पर्यटक, गडदुर्ग भ्रमंतीकार, छायाचित्रकार,ट्रेकर , संग्रहक, शिवणकलेत पारंगत,आर्ट क्राफ्टर, पक्षी निरीक्षक आणि स्नेहार्द मित्र होय.कारण फेसबुक मिडीयावर पोस्ट शेअरींगमुळे चेहऱ्यांची ओळख वाढत वाढत समविचारी दोस्तांच्या मैत्रीचा परीघ कसा संवर्धित झाला.याचे उत्तम उदाहरण म्हणजे पडवळ सर होत.कारण १६ आॅगस्टला हा मित्र भ्रमंती करत असताना अचानक वाईत दत्त म्हणून हजर.एकमेकांशी प्रत्यक्ष भेट घरीच झाली.एकमेकांना स्वलिखीत साहित्य भेट देऊन मित्रत्वाचं नातं दृढ केलं.अनेक विषयावर उपलब्ध वेळेत चर्चा केली.
मी तर त्याच दिवशी'मास्तरचं पोर' हे सरांचे आत्मचरित्रात्मक साहित्य एकाच बैठकीत वाचून हातावेगळं केलं.कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त जीवनपटाचा आशय समर्पक शब्दात उलगडून दाखविला आहे.आयुष्यातील सुखदुःखाच्या जडणघडणीत मायेची फुंकर घालणारे माता पिता, मामा, आजी,शाळकरी,सवंगडी आणि शिक्षक वर्ग यांनी अनेकदा दिलेली ज्ञानाची शिदोरी,संस्कारांचे संस्करण याची महती सुंदरशा लेखामध्ये गुंफलेली आहे.त्या आशयात शब्दबंबाळ नाही,फाफटपसारा नाही.कल्पना विलास नाही तर दिलखुलासपणे नेमकेपणाने प्रसंगांचे संक्षेपाने अचूक वर्णन शब्दचित्रात व्यक्त केले आहे.
मुखपृष्ठातून बैलगाडा शर्यतीचा रोमांचक थरार बोलका केला आहे. महाराष्ट्र, बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत आलेले असून,शर्यती म्हणजे समस्त शेतकऱ्यांचा अत्यंत आवडीचा खेळ ,जसं कुस्ती म्हटलं की अंगात चैतन्य सळसळतं,तसं भिर्र भिर्र ऐकलं की बैलगाडा शर्यतीकडे पाऊलं आपसूकच वळतात. त्यातील शर्यतीच्या पुढे घोडी पळवण्याचा नाद तर जिगरबाज खेळाचं प्रदर्शन शौकिनांना अवाक् करायला भाग पाडतं.सगळे उत्साहाने आरोळ्या देत टाळ्या वाजवत असतात.
या आत्मचरित्रात लेखक शिरीष पडवळ सरांनी नेमक्या शब्दात जीवनपटातील सोनेरी क्षणांना शब्दबध्द केले आहे. "अभ्यासाचं तंत्र व यशाचा मंत्र ज्यांनी आम्हाला दिला,जिज्ञासेचं बीज मनात पेललं,त्याचा अंकुर जोपासून त्याचा वटवृक्ष केला,त्या सर्व शिक्षकांना…."हे चरित्र अर्पण केले आहे.आयुष्यात शिक्षकांना गुरुचे स्थान देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मनोगतात हे चरित्र प्रकाशित करण्यासाठी राबलेल्या सहकाऱ्यांचा नामोल्लेख केला आहे.वाट शोधत प्रवास करत असताना, कलागुणांना प्रोत्साहन देऊन अभिव्यक्त होण्याची संधी गुरुंनी दिली याचा उल्लेख मनोगतात केलाय.हरिभक्त परायण किसनमहाराज चौधरी यांनी प्रस्तावनेत जीवनाच्या स्थित्यंतरावर भेटलेल्या व्यक्तिमधील प्रतिभासंपन्न विचारांची शिदोरी मिळत गेली.ती जगण्याला दीपस्तंभासारखी मार्गदर्शक झाली.संस्कार करत केली.जे भुतकाळ विसर नाहीत पण वर्तमानात जगतात. त्यांचे पाय जमीनीवर असतात.सुंदर  शब्दांकनात पुस्तकातील जीवनपट उलगडून दाखविला आहे.काळीजकप्प्यातील आठवणींचे क्षण परिस स्पर्शाच्या मयूरपंखा सारखे नजरेसमोर उभे ठाकतात.वाचताना आपल्याच बालपणातील सुखदुःखाचे क्षण  मनात रुंजी घालतात.
वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर शिष्यवृत्तीचे वर्गही घेतात.मुलांच्या सम जावून त्यांना कृतीयुक्त अध्ययन  अनुभव देतात.त्यामुळे कित्येक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.यामुळेच त्यांचा 'स्कॉलरशीपचे सर'म्हणून पुणे परिसरात नावलौकिक आहे.    

परिचयक:श्री रविंद्रकुमार गणपत लटिंगे वाई, सातारा

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड