पुस्तक परिचय क्रमांक:११५ उजेड अंधाराचं आभाळ




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-११५

पुस्तकाचे नांव-उजेड-अंधाराचं आभाळ (फिरस्ती)

लेखकाचे नांव-उत्तम कांबळे

प्रकाशक- सकाळ प्रकाशन

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-दुसरी आवृत्ती/ डिसेंबर २०१७

पृष्ठे संख्या--११२

वाड़्मय प्रकार-ललित 

किंमत /स्वागत मूल्य--१४०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

११५||पुस्तक परिचय

           उजेड-अंधाराचं आभाळ

लेखक:उत्तम कांबळे

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


''आभाळ अनेक आकारांचं असतं… मोकळं आभाळ,पावसाच्या ढगांनी भरलेलं आभाळ, वांझोटे ढग गोळा करणारं आभाळ, कोणत्याही क्षणी डोक्यावर कोसळणारं आभाळ वगैरे वगैरे.डोक्यावर सतत तोल सावरत राहिलेल्या आभाळाला किती किती नावं दिली आहेत….

 फिरस्ती करताना मलाही वेगवेगळी आभाळं बघता आली व माणसांच्या जगातलं आभाळ.. ते कधी वेदनेने भरलेलं तर कधी मस्तीत आलेल्या मोराला नाचण्यासाठी जागा देणारं…

ते कधी कोडानं भरलेलं तर कधी सौंदर्य स्पर्धेत जाऊन आल्यासारखं...कधी फक्त उजेडानं  भरलेलं तर कधी आपल्या शरीरावर फक्त अंधार आणि अंधारच पांघरलेलं... वेगवेगळ्या प्रकारचं आभाळ घेऊन जगत आहेत माणसं. अंधार म्हणजे दुसरं-तिसरं काहीच नसतं तर उजेडाचा असतो अभाव आणि उजेड काहीच वेगळा नसतो तर अंधाराचा अभाव असतो.''

असं अप्रतिम वर्णन उत्तुंग कार्यकर्तृत्व असलेले  सकाळचे संपादक व लेखक आदरणीय उत्तम कांबळे यांनी'उजेड अंधाराचं आभाळ' या ललित लेखसंग्रहात प्रकाशित केले आहे.'

आजपर्यंत केलेल्या भटकंती मधून आलेले सुखदुःखाचे अनुभव रेखाटन त्यांनी दैनिक सकाळच्या 'फिरस्ती' सदरात केलेली होती.वास्तव आणि परखडपणे व्यक्त होणं हीच त्यांची लेखनाची खासियत आहे.ते मनोगतात आवर्जून म्हणतात की, 'फिरस्ती'या संदर्भामुळे मी खऱ्या अर्थाने माणूस पाहू शकलो;वाचू शकलो आणि त्याच्यावर लिहू शकलो.' त्यांना भेटलेल्या माणसांची शब्दचित्रे अतिशय सुंदर शब्दकलेत वर्णिलेली आहेत.हा आभाळग्रंथ माणसांच्या दैनंदिन लढायांनी भरलेला आहे.जीवन जगायला लागणाऱ्या भाकरीपासून ते आत्मसन्मान मिळविण्यासाठीच्या या लढाया पानोपानी आहेत. कोणी पोटचा गोळा शिकणं,कुणी मानवी मूल्ये पायदळी तुडवून शिकणं,तर कुणी विवेक विकतं तर कुणी काय काय.! 'फिरस्ती'च्या निमित्ताने मोजता येणार नाहीत एवढ्या लढाया मी पाहिल्या.अगदी माणूस विरुध्द माणूस, माणूस विरुध्द पर्यावरण,तर माणसा विरुध्द व्यवस्था आदी.वाचकांपर्यत सर्व लढाया नेण्यासाठी सकाळ प्रकाशनाने ग्रंथ बनवला त्याबद्दल त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत.

'उजेड-अंधाराचं आभाळ'या ग्रंथात लेखक पंचवीस लेख समाविष्ट केलेले आहेत. फिरस्तीतील' As it is' लेखन केलेलं आहे.चिकित्सक व सूक्ष्मपणे निरीक्षण करून त्यांनी विषय समर्पक शब्दात समर्थपणे मांडलेले आहेत.या लेखांचे रसग्रहण करताना आपल्या कित्येकदा विचार करायला लावणारे लेखन आहे.आपल्या हृदयात समाजातील दुरावस्थेचे शल्य बोचत रहाते.

अवलिया कलाकाराप्रमाणे लेखणीची उपकार मनाला चटका देते.तर कधी नवनवीन उपक्रमांची माहिती करून देते.

'चुलीवरची मटण,भाकरी आणि मिसळ' या लेखात कोणत्याही रस्त्याने आपण भटकंती करताना आपल्या नजरेस खवय्येगिरीची ओळख करून देणारे मोठाले बॅनर आपली नजर वेधून घेतात. खास चुलीवरच्या घरगुती स्वयंपाकाचा उल्लेख तर आवर्जून केलेला असतो.  म्हणजे 'जुनं तेच सोनं' आपणाला नव्याने अनुभवयाला मिळतेय.मिसळीच्या अनेक वेगवेगळ्या प्रकाराचा ऊहापोह या लेखात मांडलेला आहे.

पर्यावरणाचा जागर करणारा लेख 'मुठेकाठचं स्वप्न'. पर्यावरणची जनजागृती करण्यासाठी ध्येयवेडी माणसं स्वत:कशी सुरुवात करतात. याचे विवेचन करणारा लेख आपणाला सामाजिक जाणीव करून देतो.आणि स्वत: चिंतन मनन करायला लावतो.नाशिक जिल्ह्यातील आंबाडला राकेश वानखेडे या प्राथमिक शाळेतील साहित्यिक शिक्षकाच्या उपक्रमांची पाहणी करायला संपादक जातात. तिथं त्यांना 'मोडा'ची बातमी समजते. मोडा म्हणजे शेतकऱ्यांची आठवड्याची एक दिवस सुट्टी.सामाजिक प्रश्र्नांबद्दल तिथं असणारी उदासिनता या लेखातून जाणवत राहते. शासकिय योजनांची 'कल्याणाच्या नावानं…'तर धार्मिक तिर्थक्षेत्री दान करण्यासाठी 'दानासाठी कचोरी'हा लेख वाचून आपण अजुनही बुरसटलेल्या विचारांना तिलांजली न देता,त्याच विचारांना चालना देतो.धार्मिक स्थळी दानधर्मासाठी अवडंबर कसे माजविले जाते. याचे जळजळीत वास्तव या लेखातून प्रकटते.

'उजेड-अंधाराचं आभाळ' हा लेख नवर्या पिढीत रुजू पाहणाऱ्या मरणाच्या ऋतूचे अनेक चेहरे उलगडून दाखवले आहेत. अपयश आले की आत्महत्या करणे.जणू काही १९८५-९० नंतर याची लाटच आली काय असे वाटते. अगदी शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या या भावस्पर्शी विषयांवरील व्यक्तता आलेखीय  निरीक्षणाने उकल केली आहे.

'सरकारी मरण लय डेंजर','गेल्या पोरी कुणीकडं?','जखम अजून भळभळतेयच', 'राजकुमार आला उशिरा आणि मृत्यू मात्र लवकर…', पंढरीच्या आसपास'आणि 'भुतांच्या जगात.'आदी लेखही सामाजिक जाणीवा बोथट अशा झालेल्या आहेत.याचे चिंतन करायला लावतात.

    भिकाऱ्यांच्या प्रश्र्नांबद्दल '८५ हजारांची गोष्ट'हा लेखही वाचताना भिकाऱ्यांकडे इतके पैसे असतात,त्याचे चिंतनीय वर्णन या लेखात आहे.तदनंतर सेल्फी विथ शिक्षक आणि विद्यार्थी हा शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांविषयी गैरविश्वास दाखविणारा कागदी नियम 'मास्तरची पकडापकडी'या लेखात मांडलेला आहे.शिक्षण आणि शिक्षकांची दयनीय अवस्था कशी होतेय.याचे उत्तम उदाहरण हा लेख आहे.

'एवढी लढाई कशापायी? बये, कु़ंकवापायी…''किनारा तुला पामराला','ऐ दिल-ए-नादान',कचरावेचक करणाऱ्या लोकांची 'त्यांच्याकडं दिवाळी नाही वाटतं!'हा लेख वंचितांचे दारिद्रय अधोरेखित करतो.

एखाद्या वलयांकित माणसावर सामान्य लोकं कशी गारुड होतात.त्यांच्या कार्याचा ठसा अभिमानाने मिरविण्यात त्यांना मोठेपणा कसा वाटतो.तो लेखही अप्रतिम आहे. भोर येथील बादशहा मोहम्मद शेख या व्यक्तिचा आदरणीय शरदचंद्र पवार यांच्याविषयीच्या आदर,प्रेम, राजकारण आणि समाजकारण यांचा उहापोह अतिशय खुमासदार शैलीत संवादातून मांडलेला आहे.सामान्यजणांच्या हृदयात अशा नेत्यांनी स्थान मिळवलेले असते.'मन मेलं;आता अवयव विक्री' आणि 'मेड फॉर यूएसए' आदी लेखही परिपूर्ण असून वाचनिय आहेत. त्यांनी प्रत्येक लेखातून सामाजिक प्रश्र्नांची उकल वास्तव शब्दात केली आहे.

वास्तवदर्शी लिखाण मनाला कसे चिंतन मनन करायला लावते.वैचारिक मालिकाच या ग्रंथात संपादक व लेखक आदरणीय उत्तम कांबळे यांनी पेरलेली आहे.खरोखरीच माणसाच्या आयुष्यात उजेड- अंधाराचा आभाळरुपात खेळ सतत चालू असतो.त्यालाच जीवनाची लढाई लेखकांनी म्हटले आहे.अप्रतिम विचारमालेची शृंखला या ग्रंथातून समजत जाते..

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई


 



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड