अक्षर नक्षत्र' दिवाळी अंक लेखन प्रसिध्दी
शिक्षण विभाग पंचायत समिती वाई आयोजित नवोदित लेखक व कवी मनाच्या प्राथमिक शिक्षकांच्या 'अक्षर नक्षत्र ' २०२२ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना गटविकास अधिकारी श्री नारायण घोलप, सहायक गटविकास अधिकारी श्री महेश कुचेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप यादव , गटशिक्षणाधिकारी श्री सुधीर महामुनी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री साईनाथ वाळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री विष्णू मेमाणे ,शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सहदेव फणसे व श्री राजेन्द्र दगडे, संपादिका सौ.निर्मला भांगरे मॅडम आणि संपादक मंडळ सदस्य, केंद्रप्रमुख, राजेन्द्र गायकवाड, विठ्ठल माने, रविंद्र बाबर, नवोदित कवी व लेखक, शिक्षकमित्र बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत दिवाळी अंक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यातील माझी भटकंती "कोंढावळे मुरा" या लेखास तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह,पुस्तक व दिवाळी अंक देवून गौरविण्यात आले.सर्वांचे मनस्वी आभार व धन्यवाद......
माझी भटकंती कोंढावळे मुरा
दिनांक १९ फेब्रुवारी २०२१
कोंढावळे गावाच्या तिन्ही बाजूंनी विळखा घातलेल्या सह्याद्री पर्वताची पश्र्चिम घाटातील कोळेश्वर डोंगररांग. या डोंगररांगेच्या गावाजवळच्या माथ्यावरील जंगलात भटकंतीला जायचं नियोजित होतं. धोम धरणाच्या मध्यभागी असणा-या नवरानवरी डोंगराच्या पश्चिमेला माडगणी आदिवासी पाड्याच्या कड्यावरील दुर्गम जंगलव्याप्त भागात धनगर व जंगमवस्ती आहे. ती कोंढावळे गावातीलच आहे. याच डोंगर मुऱ्यावरुन दररोज शाळेत पायी येजा करणा-या मुलांच्या समवेत २५ वर्षांपूर्वी पाहिलेली जंगलवस्ती पुनश्च मनसोक्त फिरावी.
मागील आठवणींना उजाळा देऊन तेथील वेचक वेधक ठिकाणं अधोरेखित करायला खरंच आतुरता होती. मोबाईलमध्ये निसर्गरम्य परिसराचे अवलोकन करून वेचक वेधक दृश्ये टिपावीत. कातळ वाटा,जंगलवाटा तुडवत शुध्द हवा आणि गर्द हिरव्या वृक्षाच्या संगतीत रफेट करावी. गरज भासल्यास एक दिवस त्याच वस्तीत रात्री मुक्काम करुन जंगलातील सूर्यास्त आणि सूर्योदयाचे विहंगम दृश्येमनसोक्त न्याहाळून त्यांची छबी कॅमे-यात टिपावी. असं ठरवून मी,माझा विद्यार्थी काशिनाथ आणि त्याचा दोस्त किसन; मला मुऱ्याला घेऊन जाण्यासाठी डोंगर पायउतार करुन शाळेत आले होते.
काही मुलामुलींची आमच्या सोबत जंगलवाटा फिरायला येण्याची इच्छा होती. नेमकी त्याचदिवशी रथसप्तमी सणामुळे काहींना देवदेव करायला रानात जावे लागले. त्यामुळे आदल्या दिवशी दहाएक जणांची आम्ही येणार म्हणून फायनल झालेली संख्या भ्रमंतीवेळी एका हाताच्या बोटावर आली.मग आम्ही तिघेजण भटकंतीला पाटीलवाडीच्या डांबरीसडकेने मार्गस्थ झालो. ते दोघंही तुरुतुरु मळलेल्या लालवाटेने चालायचे. चढणाच्या वाटेने मी मात्र चालताना काठीचा आधार घेत निघालो होतो. ढगाळ हवामानामुळे ऊनसावलीचा खेळ क्षणोक्षणी बघायला मिळत होता. पावलागणिक श्वासाची गती आणि घामाच्या धारा वाढायला सुरुवात झाली.दमछाक होऊन छातीचा भाता फसफसाय लागला.केंजळगड, रायरेश्वर दरा, धोम धरणाचे पाणलोट क्षेत्र पाठमोरी जात होते. सभोवतालचा परिसर न्याहाळत त्यातील कैक मनमोहक छब्या मनाच्या कप्प्यात साठवत आकाश, डोंगरदऱ्या आणि जमीनीची नेत्रसुखद दृश्ये कॅमेऱ्यात टिपत; कातळ पाषाण, कुसळाचे पिवळशार गवत,छोटी छोटी झुडूपे,तृणपाती आणि गवतफुलांना सेलिब्रिटी करत आम्ही फोटोग्राफी करत होतो.अधूनमधून पक्ष्यांचा कोलाहल कानावर पडायचा. तेव्हा तो कोणता पक्षी संचार करतोय ते दोघंही अचूक सांगायचे. मुलांबरोबर जंगलातल्या घडणाऱ्या गमती जमतीवर गप्पा मारत चढण चढत होतो. मातीची वाट जाऊन आता दगडाच्या ओबड धोबड वाटेने काठी टेकत पुढं जात होतो.सूसू आवाज करत वाऱ्याची गूज ऐकत अन् त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने शरीराला होणा-या गारव्याचा अनुभव घेत होतो.जणुकाही अलवारपणे फुंकर मारल्यासारखे वाटत होते. वाटेतीलच एका उंबराच्या झाडाखाली विसावलो. मुलं लगीच त्या झाडावर चढून बसली आणि पक्ष्यांसारखे आवाज काढत असताना; घारीचं स्वैरपणे शांत भरारी मारत एकाच जागेवर पंखांची फडफड करत सावज हेरण्याचं दृश्य बघायला मिळाले. अप्रतिम विहाराचं दृश्य.
'सर ,अजून तिनं टप्पे चढल्यावर टोंग येईल.मग कड्याखाली आडवं चालायचय' काशिनाथ म्हणाला.'मलाही माहित आहे.', असे म्हणून मीही लगेच होकार दर्शवला.त्यांचे वरचे मस्तपैकी विविध पोझचे फोटो खेचले.मग बिस्किटे खाऊन संथपणे खाली बघत बघत कातळ वाटेने चढणमार्गाला लागलो.टोंगवरची ती वाट खडकाळ दगडाची, निसरडी आणि उंचपुऱ्या पिवळ्या गवतातून जाणारी नागमोडी वळणाची होती.आजुबाजूचा विहंगम नयनरम्य परिसर न्याहाळत पुढं सरकत होतो. बारकाईने निरीक्षण केल्यावर झाडाचेफांद्यांचे ओबड -धोबड आकार एखाद्या पशुपक्ष्यांसारखे भासत होते. मस्तच फांद्यांचा नजारा दिसत होता. तदनंतर पुढे टोंगवर पोहोचलो. कड्याखालील गवत व झाडोऱ्याची दाटी दिसत होती.पुढे दोन वाटा फुटलेल्या होत्या.डावीकडीलील माडगणीला तर उजवीकडील कड्याखालून पश्चिमेला जाणारी होती.आम्ही पश्चिमेच्या मळलेल्या लालसर वाटेने पुढं जात जनावरांच्या पाऊलखुणा न्याहाळत झऱ्याजवळ पोहोचलो.लगेच काशिनाथने ओणवे होवून,तोंड लावून झऱ्याचे पाणी पिले. झरा उंबराच्या झाडाखाली खडकात होता.त्याच्यापुढे दहा-पंधरा फुटावर दगडमातीचा बांध घालून डबके बनविले होते. या पाण्याचा उपयोग रानातील गुरे व श्वापदांना होत असल्याच्या पाऊलखुणा दृष्टीस पडल्या.आता आम्ही कड्याखालच्या सपाटीला लालसर धुरळ्याच्या वाटेने चालत निघालो.इथली कड्याखालची वेगळीच नजाकत दिसत होती. कातळातीलच ओबड धोबड पायऱ्या चढून कड्यावरील जंगलव्याप्त परिसराच्या आरंभी आलो. दाऱ्यातून कड्यावरील जंगलपठारावर आलो. सभोवताली विहंगम नयनरम्य परिसर दिसत होता.एकाका झुडूपावर दोऱ्यांच्या गुंड्यासारखे गुंडाळलेले गोल गोल कापसाचे पुंजके झाडाला लगडलेले दिसत होते.खूपच वेगळी नजाकत बघायला मिळाली.
आता आम्ही गर्दछायेच्या जंगलातून पुढे पाचोळ्याच्या वाटेने निघालो.सगळीकडे मोठाल्या वृक्षाचे अक्राळविक्राळ विविधांगी आकार आणि त्यात गुंतलेल्या वेढलेल्या वेलींचे वेटोळे दिसत होते.पायाखाली पाचोळा तुडवत दोन्हीकडे करड्या रंगांच्या फांद्या आणि वेली अन् पर्णिका बघत तर वर हिरव्यागार पानापानांतून आकाशाचा माग काढत पुढचं अंतर कापत होतो. जंगलसफारीची भटकंती करायला मिळत होती.चंद्रमौळी झोपडीत जसा प्रकाशाचा कवडसा दिसतो तसं आज घनदाट वृक्षांमुळे पानांपानांतून प्रकाशाचे कवडसे दिसत होते.त्यातच वाऱ्याची भरारी आली की तनमनाला थंडाई स्पर्शून जाई, पानापानांची सळसळ वाढे,तुडवत चाललेल्या पाचोळ्याचा वेगळाच नाद तर अचानक पक्ष्यांचा अनोळखी आवाज कानी पडत होता.झाडवेलींचे वेगळेच आकार मनाला भुरळ घालीत होते.
जंगलातील जैवविविधतेचे आणि झाडोऱ्याचे मनसोक्तपणे वाचन आणि निरीक्षण करत, ही वाट संपून कधी एकदा काशिनाथचं घर दिसतयं असं झालं होतं. साधारणपणे दीड दोन किलोमीटरची जंगलवाट तुडविल्यानंतर घरं आणि शेतजमीन दृष्टीला पडली. गव्हाची काढणी करुन पेंढ्या रचून ठेवलेल्या होत्या.खळं शिंपण्याचं काम चालू होतं.जनावरांपासून पिकांची राखण करायला उपलब्ध साहित्याचा वापर करून माळा तयार केला होता. कौलारुघरं राख आणि शेणानं सारवलेल्या भिंती आणि शेणानं सारवलेलं अंगण लखलखीत दिसत होतं.सभोवती जंगलव्याप्त परिसराच्या मधील शेतजमीन साड्यांलावून सीमांकित केली होती.जंगली जनावरं भिववण्यासाठी माळा उभारला होता आणि ठिकठिकाणी फुटके डबे आणि बाटल्या झाडाझुडुपांना टांगलेल्या होत्या.हवेच्या आवेगावर त्यांच्या आवाजाचा चढ उतार होत होता. जंगलवाटेने माथ्यावरील काशिनाथच्या घराकडे मार्गस्थ झालो.
पालापाचोळ्यातील मळलेली लालसर मातीतली पायवाट तुडवत आम्ही पुढे निघालो होतो.सगळीकडे घनदाटझाडी ,त्यातील जाळीदार उंचच उंच वाढलेल्या वेली,वृक्ष,शेवाळलेल्या झाडांच्या फांद्या आणि बेफाम करणारं वारं अंगावर घेत आम्ही तंगडतोड करत होतो. साधारणपणे दहा वाजल्यापासून आमची भटकंती सुरू होती.जेवणाचे बारा वाजून गेले होते. भुकेची चाहूल लागली होती.पण निसर्गरम्य परिसरात झाडवेली आणि अनवट पाखरं बघताना तहानभूक हरपली होती.वाटेतल्या वेलींची आकर्षक नक्षी, झाडांचे मुक्त आकार,मुंग्यांचे मेणामातीची वाटोळी झाडावरचं घर,मव्हाचे कांदे आणि मध साठविण्यासाठी जंगलातल्या झाडांच्या खोडात ठेवलेल्या पेट्या इत्यादी बघत चाललो होतो.झाडावरुन उड्या मारत आमचे दोन वाटाडे मजा करत होते. सुमारे अर्धा तास पाचोळ्याची वाट तुडवल्यावर थोड्यावेळात दोन घरे आणि शेती दृष्टिक्षेपात आली.आमची चाहूल घेऊन एक कुत्रं भुंकत काशिनाथच्या जवळ येऊन पायाशी खेळू लागलो.त्याच्या पाठोपाठ कुत्र्याची आणखी दोन पिल्लं धावत आली.त्यांना काशिनाथने उचलून घेतले. ही जंगलवाट अशीच पुढे जोर गावाकडे, कोळेश्वर पठारावरील मंदिराकडे आणि किरोंडे व जांभळीच्या कड्यावरील पठाराकडे जातं असल्याची माहिती काशिनाथने दिली.लाकडाचा सरकता अडसर बाजूला करून शेणानं सारवलेल्या अंगणात आलो.
रथसप्तमी सणाला सूर्यप्रतिमा रांगोळीने रेखाटून सूर्य उगवताना पेटत्या शेणकुटावर गुंडगीत दुध उकळून ऊतू घालवायचे आणि नैवेद्य अर्पण केल्याचे ठळकपणे दिसले.अंगणातच केळीच्या बागा आणि चिवचिव फळांच्या वेलीने आमचे स्वागत केले.अंगणातच घोंगड्यावर बैठक मांडली. काशिनाथच्या वडिलांनी नमस्कार घालून, फ्रीजसारखं थंडगार पाणी हातपाय धुण्यासाठी दिलं.तदनंतर गप्पा गोष्टी झाल्या.मग घरातल्या ओटीवर आमची पंगत बसली. सणानिमित्त पुरण पोळीचा सुग्रास बेत केला होता. मनमुराद जेवणाचा आस्वाद घेतला. जेवताना काशिनाथचे वडील म्हणाले, 'गुरुजी,आज इथंच मुक्काम ठोका आणि सकाळी गणेशनगरच्या कड्याने खाली जावा.'मी तत्काळ मानेनेच नकार दर्शविला,आणि त्याचवेळी त्यांची मुलं मात्र मुक्कामाची आर्जव करीत होती. होय नाही करता करता,शेवटी मी रहाण्यास राजी झालो. जेवणानंतर त्याचे वडील अनिकेतला म्हणाले, 'सरांना जंगल माळ, काळूबाई मंदिर आणि माडगणीच्या कड्याकडनं फिरवून आण.'
जेवणानंतर मोबाईल रेंज पाहून घरी पत्नीला फोन केला.आज इथंच थांबून उद्या शाळा करुन घरी येईन असं सांगितलं.तदनंतर किसन माडगणीहून आलेल्या दोस्तांबरोबर त्याच्या घराकडे गेला.तदनंतर आम्ही तिघेजण त्यांच्या घरापासून दक्षिणेकडील वाटेने माळाला भटकायला निघालो.ढगाळ हवामानात पण पुर्वेचे वरचं वारं अधूनमधून अंगावर येत होते. 'याच वाटेने आमच्या गाई चरायला जातात.त्यांची राकोळी कुत्रा करत असतो.' असे अनिकेत बोलला. ते ऐकून मला नवलच वाटले.मी म्हणालो, 'कसं काय?' तर पुढं तो सांगू लागला, "सर,आम्ही सकाळी सकाळी सगळ्या गुरांना वाटेला लावतो. त्यांच्या बरोबर कुत्रा जातो.आपुण जातोय याच वाटेने गुरं कड्यापर्यतच चरत असतात.ती एकत्र चरतात,थोराड गाई वासरांच्या सभोवती कडं करतात''.एकत्र राहतात.कुत्र्याला एखाद्या प्राण्याची चाहूल लागली की तो जोरजोरात भुंकतो. त्याच्या भुंकण्याने गुरं सावध होतात.कुत्रा गुरांचा गुराखी बनून दक्ष रहातो हे ऐकल्यावर प्राणीजीवनाची थोरवी मला समजली.
त्यांच्या गुरांच्या व जंगली प्राण्यांच्या वास्तव घटनांचे वर्णन ऐकत ऐकत आम्ही एका भुसभुशीत मातीच्या उताराच्या भागात आलो. लाल माती धुरळ्यासारखी दिसत होती. आजूबाजूला दोन-तीन फुट उंचीचे जांभळे काळसर दगड दिसत होते. झाडोरा विरळ होता.उताराच्या बाजूला भुसभुशीत माती पाहून रायरेश्वर येथील सप्तरंगाच्या मातीची आठवण झाली.लगेच अनिकेतने काशिनाथला झाडांची मोठाली पाचसहा पानं तोडायला सांगितली.जवळच्याच झाडांची पाने काशिनाथने तोडली. बारकाईने लक्ष दिले तर वेगवेगळ्या रंगछटेची माती बघायला मिळतेय सर,असं अनिकेत मला सांगू लागला.प्रथमत:मलाही खरेच वाटेना म्हणून मी ही जवळ जावून बारकाईने पाहू लागलो .तर वेगवेगळ्या रंगांची माती दिसत होती.छोटासा तेथील दगड घेऊन त्यावर खरवडले तर वेगवेगळ्या रंगछटा आढळल्या. साधारणपणे पिवळी, पांढरी, लाल, गुलाबी आणि विटकरी अशा पंचम रंगाची माती आढळली.एक वेगळाच खजिना न्याहाळायला मिळाल्याचे समाधान वाटले.
ढगाळ हवामानामुळे महाबळेश्वरच्या डोंगरावरील हिरवाई,धोम,बलकवडी धरणं धूसर दिसत होती.तसचं माळानं चालत चालत काळूबाई मंदिराजवळ आलो. झाडांच्या गर्द छायेत उघड्यावर देवदेवतांच्या दगडांच्या मुर्ती होत्या. रानच्या देवांना मनोभावे नमस्कार करून पुढं भटकायला निघालो.इथल्या झाडांच्या खाली सभोवती गांडूळ आणि इतर कृमींची मातीची ओबडधोबड आकाराची उंचवट्यासारखी बीळं नजरेला पडत होती. आता उतारानं चालताना पाय जड होत होते. काही वेळा भेलकांडत होतो.कारण आज लय तंगडतोड झाल्याने उतरताना पायाचं गोळं दुखत असल्याची जाणीव व्हायला लागली.आधाराला आता काठीचा उपयोग होत होता. अचानकपणे पाऊस टिपकायला सुरुवात झाली.कड्यावरुन तुपेवाडीच्या शिवारातील पीकांचे हिरवेगार आकार आयत- चौकोनात दिसत होते.समोरच धरणाचा फुगवटा आणि त्या पल्याडची रायरेश्वर डोंगररांग नजरेत भरत होती. वळणावळणाच्या काळसर रस्त्याने ये-जा करणारी वाहने खेळण्यातल्या गाड्यांएवढी दिसत होती.बाजूने मोकाट वारं फवारा सोडलेल्या झोतासारखं अंगावर आदळत होतं. सायंकाळ होत आली होती. पावसाचा शिडकावा थांबला होता. पिवळ्यातांबूस छटा ढगाळ वातावरणामुळे अस्पष्ट दिसत होत्या. त्यामुळे सांजवेळचं दृश्य धूसरच दिसत होते.पण आतापर्यंतच्या या भटकंतीत परिसराचे मनमोहक निसर्गसौंदर्य पाहून न्याहाळून मन तृप्त झाले होते.
श्री रविंद्रकुमार गणपत लटिंगे शाळा: कोंढावळे वाई
मोबाईल:: ७०८३१९३४११
Comments
Post a Comment