पुस्तक परिचय क्रमांक:११३ कलाकार





वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-११३

 पुस्तकाचे नांव--कलाकार

 लेखकाचे नांव--रा.अ.कुंभोजकर

प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती अॉक्टोंबर २०१६

एकूण पृष्ठ संख्या-१०२

वाङमय प्रकार ----ललित लेखसंग्रह

मूल्य--१४०₹


📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖

      ११३|पुस्तक परिचय

           कलाकार

 लेखक--रा.अ.कुंभोजकर

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

नाटक सिनेमातील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व लाभलेले चित्रतपस्वी कलेतील भीष्माचार्य, अभिनेते,अभिनेत्री,गायक,नाटककार,

दिग्दर्शक,नाटक व चित्रपट कंपनीचे मालक असलेल्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या सर्जनशील मनांचा व्यक्तिवेध 'कलाकार' या माहितीपटात संपादक व पत्रकार रा.अ. कुंभोजकर यांनी करून दिलेला आहे.

रा.अ.कुंभोजकरांचा हा व्यक्तिचित्रसंग्रह असून चित्र व नाट्यक्षेत्रातील नामवंत कलाकारांचा कर्तृत्वपट उलगडून दाखविण्याचे कार्य आत्मीयतेने व रसिकतेने केले आहे. ज्ञानपीठ पारितोषिकाने सन्मानित केलेले ऋषीतुल्य प्रतिभावंत साहित्यिक वि.स.खांडेकर तथा भाऊसाहेब यांच्या साहित्यकृतीला लेखनाचा साज चढविण्याचे सुवर्णमय कार्य शागीर्दिचं होतं.ते करण्याचे मला लाभले हे माझे परमभाग्यच होय.कारण त्याचवेळी लेखनाचे तंत्र आणि मंत्र मला त्यांच्या मुखातून लाभले आणि माझ्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावत गेल्या. याचा मनोगतात आवर्जून लेखकांनी उल्लेख केला आहे. आणि मी सुगंधित आठवण माझ्या मनाच्या कुपीत अभिमानाने जतन करून ठेवली आहे.

रा.अ.कु़ंभोजकर हे संपादक, पत्रकार आणि लेखक अशा बिरुदाने लिखित माध्यमात परिचित होते.साहित्य,चित्रपट आणि नाटक या क्षेत्रातील कार्यपट वर्तमानपत्र व मासिकातून  लेखन करणारे ते स्तंभलेखक होते.ते माध्यमांच्या स्थित्यंतराचे साक्षीदार होते.भाषा आणि साहित्याची उत्तम बैठक असलेले पत्रकार होत.ते 'नाना' या नावाने सर्व परिचित होते.अभिरुचीसंपन्न वाचकांना केंद्रबिंदू मानून नित्यनेमाने शब्दसेवा करणारे सर्जनशील पत्रकार. त्यांची कारकीर्द वि.स.खांडेकर, डॉक्टर अ.वा.वर्टी व मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या हाताखाली घडत गेली.या सर्वांचे वाड़्मयीन ऋण हेच त्यांच्या लेखनाचे भांडवल होते.किर्लोस्कर,अमृत व साधना मासिकात आणि तरुण भारत दैनिकात त्यांनी संपादक म्हणून कार्य केलेले आहे.


रसिकांना आवडणाऱ्या सिने व नाट्यक्षेत्रातील दिग्गज कलाकारांचा हा व्यक्तिचित्र संग्रह आहे. रसिक प्रेक्षकांच्या मनावर मनोरंजनाची मोहर अन् भावनांची लकेर उमटविणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या गाजलेल्या भूमिकांचा सोनेरीपट समर्पक शब्दफुलोपऱ्यात मांडलेला आहे.तो वाचताना स्वातंत्र्यपुर्व काळ ते स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी काळातील ऋषीतुल्य कलाकारांची ओळख 'कलाकार'या अभिनय पटातून प्रस्तुत केली आहे.

 प्रभात फिल्म कंपनीची तुतारी अन् तिची निनाद अवकाशात कायमच तरंगत राहिली आहे.प्रभात चित्रांचे कलात्मक मूल्य अबाधित राहिले.तर अलौकिक कार्य अमरच राहिले आहे!अशा चित्रपटसंस्थेची सोनेरी कारकिर्द प्रथमतः उलगडून दाखविली आहे.कलाकार अस्तंगत होतात, संस्था नामशेष होतात; काहीच शाश्वत नसते. स्मरण राहते, आदर्श उरतात ते ध्येयनिष्ठा, एकजूट,कलामूल्ये यांची बूज ठेवून केलेल्या कारल्याचे!एकापेक्षा एक सरस कलापूर्ण मराठी चित्रपट निर्माण करून प्रभातने लहानमोठ्या कलावंतांना बरोबर घेऊन काहीतरी भव्यदिव्य करायला निघालेल्या प्रभातची किरणे कालौघात काळोखात बुडून गेली.आणि तिच्याबरोबर ती मंतरलेली वर्षेही निघून गेली!

नावीन्य हा बोलपटाचा आत्मा होता.या संस्थेने शेजारी, कुंकू,चंद्रसेना, गोपाळकृष्ण, अमरज्योती,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम,वंदे मातरम् आदी ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

हंसचे निर्माते चित्रतपस्वी बाबूराव पेंढारकर. 'चित्र आणि चरित्र'हे बाबुरावांचे आत्मचरित्र. चित्रपट अभिनेत्याने लिहिलेले पहिले पुस्तक. सरकारने उत्कृष्ट आत्मचरित्राचे पारितोषिक देऊन जणू या कलाकाराचा गौरवच केला आहे.'जे काही करायचे ते अत्युत्त्मच करेन' हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. जुजबी चार इयत्ता शिकलेल्या बाबूरावांच्या आत्मचरित्राला शासनाने पारितोषिक देऊन गोरविले,हा त्यांचा सन्मान सगळ्यात मोठा आहे. जीवनात आनंद निर्माण करण्याचा त्यांनी अटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या अनेक सिनेमातील गाजलेल्या भूमिकांचा सोनेरीपट मांडलेला आहे.महात्मा फुले चित्रपटातील जोतिबाची भूमिका,जय मल्हार मधील कल्लू बेरडाची भूमिका,सिंहगड मधील उदयभानूची भूमिका आदी भूमिकांनी त्या काळातील सिनेप्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या होत्या.बाबूराव चित्रनिर्मात्यापेक्षा ते अष्टपैलू अभिनयसम्राट होते.त्यांनी अभिनय नैपुण्याच्या बळावर शंभरएक  चित्रपटात भूमिका केलेल्या होत्या.


नटसम्राटाचे सिंहासन आजही अढळ आहे. कारण कसदार आणि भावोत्कट अभिनय करणारे गणपतराव जोशी. रंगभूमीची अखंड तीन तपे त्यांनी सेवा केली.विविध रसांच्या भूमिका यशस्वी केल्या.अस्सल अभिनय आणि स्वत:ला विसरुन काम करण्याची भावना. कसदार आणि तयारीचा आवाज त्यांना लाभलेला होता.आवाजाचा पल्ला आणि सामर्थ्य यांचा अचूक अंदाज त्यांना होता….

''नाटककार हा समाजाची दु:खे मांडतो आणि गणपतराव जोशी यांच्यासारखा कलावंत ती तेवढ्याच ताकदीने प्रेक्षकांच्या मनात उतरवतो. म्हणून मला वाटते,चांगला नट चांगल्या नाटककाराइतकाच श्रेष्ठ असतो.गणपतरावही तेवढेच श्रेष्ठ होते.नटांना जेव्हा समाज मानत नव्हता, तेव्हा त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती गणपतरावांनी.रंगभूमिच्या जगात ते छत्तिस वर्ष वावरले.त्या जगात वावरताना स्वत:चे कौटुंबिक दु:खही विसरले.आपल्या कलाकारीने लाखो रसिकांना मंत्रमुग्ध करुन कलेचा आस्वाद दिला.


नाट्य अभिनेते नटसम्राट दाजी भाटवडेकर. 'भाऊबंदकी'या प्रयोगात राघाबोदादाची भूमिका दाजी भाटवडेकर यांनी गाजविली होती. रंगमंचावर सर्वात ऐकताना प्रेक्षक श्र्वास रोखून श्रवण करीत होते.प्रदीर्घ मराठी नाट्यसेवा आणि अभिनयातील नैपुण्यामुळेच त्यांना भारत सरकारने १९६७ साली 'पद्मश्री' किताबाने गौरविले होते.प्रथम त्यांनी शाळकरी असताना किशोर वयात अनेक सोन्याचांदीचे बिल्ले छातीवर लटकवले होते.रंगभूमीवर पेस्तन काकाजी भूमिकेतून प्रथम रंग तोंडाला लावला ते १९६५ पर्यंत अनेक विविधढंगी भूमिका वठविल्या.तुझे आहे तुजपाशी मधील रसिले काकाजी,बेबंदशाहीत छत्रपती संभाजी, लग्नाचीबेडीतील गोकर्ण,संगीत सौभद्र संगीत नाटकातील बलराम,भावबंधन मधील घनश्याम तर म्युनिसिपालिटी या नाटकातील पांडबा असे परस्पर भिन्न रोल त्यांनी साकारले.नटाने मुद्रा अभिनय कसा करावा हे दाजींकडून शिकावे. नजरफेक कशी असावी.ओठांची व जबड्याची हालचाल कशी करावी.वाक्ये वजनदारपणे कशी उचलावीत,या साऱ्या गोष्टी दिग्दर्शक गणपतराव बोडस यांच्या कडून शिकायला मिळाल्या.असे ते आवर्जून कृतज्ञतापूर्वक नमूद करतात..


प्रतिभावान अभिनेते व नाटककार अप्पा टिपणीस मराठी रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते.आर्यावर्त नाट्यसंस्थेचे संस्थापक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपले जीवन व्यतीत केले.विविध कलागुणांनी आजची रंगभूमी उजळण्याचे काम या कलादीपांनी केले आहे.


मिश्किली अभिनयाने हसायला लावणारे दिनकर कामण्णा...अभिनेते व गायकनट म्हणून त्यांचा नावलौकिक होता.रंगमंचावर अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांनी विनोदाचा धागा जोडून घेण्याची बौध्दिक क्षमता त्यांच्यात होती.याचे अनेक किस्से त्यांच्या कलापटात रेखाटले आहेत.प्रयोग चालू असताना विनोदी नटाला हजरजबाबीपणामुळे दर्दी ष्रेक्षक टाळ्या वाजवून कौतुकाची मोहर उठवितात.कलेला सलाम करतात.'घराबाहेर'या प्रयोगात शौनक नावाच्या अजागळ तरुणांची भूमिका अनंत धुमाळ यांनी गाजविली होती.त्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिकांचे बेरिंगही अफलातून वठविले होते.पेडगावचे शहाणे या नाटकातील मद्रासी 

आचाऱ्याची भूमिका अफलातून वठविली होती.त्यातील पेहराव पाहूनच रसिक श्रोत्यांना हास्याची उकळी फुटायची.संवादाने प्रेक्षकांना खदखदून हसवायचे.त्यांनी चित्रपटसृष्टीतही प्रथित यश मिळवले होते.


दामूअण्णा मालवणकर आपल्या अभिनयाने आणि व्यंगाच्या हावभावाने खळखळून हास्याचे कारंजे उडवायचे.चित्रनाट्य सृष्टीत विनोदी ढंगाच्या भूमिका त्यांनी साकारलेल्या होत्या.विनोद निमिर्तीसाठी वेडेवाकडे अंग विक्षेप न करता मुद्राभिनयातून आणि शब्दांच्या उच्चारातून फुलतो.हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचे सिनेमे तणावग्रस्त मध्यमवर्गीयांना निर्भेळ मनोरंजनाची खाण होती.ज्यांचे गाण्याचे बोल कानात अमृताचे शिंपण करतात.त्या जेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचे व्यक्तिचित्र वाचताना अनेक भावगीतांच्या ओळी ह्रदयात उमटतात.वातावरणात माहोल तयार करण्याचं अद्भुत काम ही अवीट गीतं करायची. पु.ल.देशपांडे माणिकताईंचा सन्मान करतांना ते एकदा म्हणाले होते.,'लडिवाळा'हा शब्द खास माणिकताईंसाठीच लिहिला आहे.' त्या शब्दाचा उच्चार भाव ऋजुतेने करायच्या.

गाण्याच्या मैफिलीत रसिक श्रोते तल्लीन होऊन जायचे. एवढी ताकद माणिकताईंंच्या स्वरसाजात होती.सुरावर कमी-अधिक छाया- प्रकाश,वेचक हरकतींनी नटलेली मर्मस्थळे, लयींचा मोहक आविष्कार आणि अधूनमधून प्रकट होणाऱ्या पंजाबी ढंगाच्या हरकती आणि या साऱ्यातून प्रकटणारा भाव यामुळे त्यांची भावगीते अंत:करणारा पाझर फोडणारी होती.त्याचप्रमाणे जेष्ठ गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांचेही गायनक्षेत्रातील वैविध्यपूर्ण गोष्टींचा उहापोह या लेखात केलेला आहे. किशोरीताई अमोणकरांना त्या गुरुस्थानी मानत.तर आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्यातील सौंदर्य स्थळांचा परिचय त्यांना वसंतरावांमुळे झालेला होता.त्यांनी अनेक गाण्यांच्या मैफिलीत रंगविल्या आहेत.सवाई गंधर्व पुण्यतिथीनिमित्त पुणे येथील मैफिलीत तर रसिकश्रोते मंत्रमुग्ध झाले होते.वीसहजार प्रेक्षकांनी हजेरी लावली असताना फक्त माझ्याच गाण्याचा स्वर तिथं निनादत होता.याअविस्मरणीय मैफिलाचा आवाज आजही मला आळवत असतो.'कट्यार काळजात घुसली' हे नाटक किर्तीच्या शिखरावर पोहोचविणारे गायकनट वसंतराव देशपांडे.संगीत क्षेत्रात ४०वर्षीहून अधिककाळ स्वता:च्या स्वरतेजाने चमकणारे डॉ.वसंतराव देशपांडे.आपल्या आवाजाने श्रोतृवृदांना चिंब भिजविणारे वसंतराव.त्यांनी रंगभूमीवर अनेक संगीत प्रधान भूमिका सादर केल्या.मारवा हा राग त्यांचा विशेष आवडीचा होता.लय,भाव आणि रस या त्रिवेणी संगमात वाणी सुस्नात असणारे वसंतराव.खाजगी गप्पातही नकलांची जोड देवून तीही मैफिल जिंकत असत.


शारदा नाटकातील कोदंडाची भूमिका साकार करणारे गंगाधरपंत लोंढे.गायन आणि अभिनय कसदार करणारे आणि नाट्यसंस्थेचे व्यवहार कुशल चालक म्हणून ते प्रसिद्ध होते.वि.स. खांडेकर तथा भाऊसाहेब यांच्या अर्धांगिनी सौ. उषाताई खांडेकर यांचाही लेख प्रतिभावंत लेखकाची पत्नी गृहकर्तव्यदक्ष कशी असते. याचे उत्तम उदाहरण लेखक कुंभोजकर यांनी रेखाटले आहे.ते भाऊसाहेबांचे लेखनिक म्हणून सात वर्षे होते .त्यावेळच्या वेचकवेधक प्रसंगांच्या वर्णनातून त्यांची स्वभावपैलू उलगडून दाखविले आहेत.


मास्टर अविनाश म्हणजे गणपतराव मोहिते.बलवंत संगीत नाटक मंडळीत त्यांनी विविध भूमिका कसदार अभिनयाने साकारलेल्या होत्या.शाकुंतल मधील ऋषिकुमार ही भूमिका लक्षवेधी ठरलेली होती.त्यांच्या आवाज आणि गाण्यांचे किस्से रसिकांच्या उत्कट दातृत्वाची व बक्षिसांची  महत्ती व लौकिक दाखवितात.


मराठी चित्रपट सिल्व्हर व गोल्डन ज्युबली दिले.त्या सिनेजगतातील कलावंतांचे 'दादा'दादा कोंडके यांची नायिका उषा चव्हाण यांचा समारोपात जीवनपटातून अंतरंग मांडला आहे.त्याकाळातील सुप्रसिद्ध नर्तिका व लोकप्रिय अभिनेत्री उषा चव्हाण होत्या.त्या काळात अनेक रसिकांनी त्यांचे सिनेमे कित्येकदा पाहिले आसतील.ग्रामीण प्रेक्षक तर त्यांची लावणी पाहताना फटका उडवून आपला आनंद व्यक्त केला आहे.या लेखात लेखकांनी त्यांच्या मुलाखतीचा प्रसंगा रेखाटलेल्या आहे.


यातील कथा पुस्तक प्रकाशनापुर्वी दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत.लेखक रा.अ.कुंभोजकर यांनी ऋषितुल्य तपस्वी प्रतिभावंत मराठी कलावंतांची सिनेमा व नाट्यसृष्टीच्या नभांगणातील तारे व तारकांना 'कलाकार'या पुस्तकातून मुखवट्यामागच्या जिवंत चेहऱ्यांची ओळख करून दिली आहे.या समस्त कलाकारांचा आविष्कारच त्यांचे आयुष्य होते.हे त्यांनी केलेल्या रंगदेवतेच्या पूजेवरुन दिसून येते.कसदार अभिनय,मधाळ आवाज,सरावात सातत्य,मृद्राभिनय आणि प्रमाणिकपणाला सर्जनशीलतेची जोड देऊन रसिक मायबापांना निखळ आनंद दिला. त्यांच्या गाजलेल्या भूमिका आणि संहिता हा खरा दस्ताऐवज आहे.त्यांच्या कर्तृत्ववाचा सुवर्णपट उलगडून दाखविण्याचे कार्य संपादक रा.अ.कु़ंभोजकर यांनी दिव्यतेने पेलून त्यांच्या कार्याची व्यक्तिचित्रे प्रसिद्ध करून कलाकारांची खरी ओळख रसिकांना शब्दचित्रातून करून दिली आहे…..

लेखणीस त्रिवार मानाचा मुजरा!!!!

#############################

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे, वाई


लेखन दिनांक:२५मे २०२२









Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड