हुरडा पार्टी

गावाकडची हुरडा पार्टी माघ आणि फाल्गुन महिन्यात शेतकऱ्यांची शेतातील कामांची लगीनघाई असते.शाळूच्या रानावर पाखरांचं थवं दिवसभर पोटऱ्यातील कणसातलं चिकाळू कोवळं दाणं खायला घिरट्या घालत असत्यात. राखण करायला शेतात माळा (मचाण) घातलेला असतो.तिथं ऊभं राहून गोफणीने ढिकळं नाहीतर दगड भिरकावत अन् तोंडानं आरडतवरडत राखण चाललेली असते.काहीजण उन्हातान्हात राखण करायला लागू नये म्हणून पाखरांना भिववण्यासाठी बुजगावणी उभारतात तर काहीजण जुन्या निकामी ऑडिओ कॅसेटमधील प्लॅस्टिक रीळ चोहीकडे लावत तर काहीजण प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी पिशव्या नाही तर पत्र्याचे डबे बांधावरल्या झाडाला टांगत.वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रिळं आणि पिशव्या नाचकाम करताना त्यांचा वेगळाच फडफडता आवाज ऐकायला यायचा.त्या आवाजाने पाखरं शाळूच्या पिकाकडे फिरकत नसत. तर कुणाच्या ऊसाला तोड आलेली असते. तर कुणाच्यात हळद काढणी,शिजवणी आणि वाळविणीच्या कामाची धांदल उडालेली असते. काहींचा ऊस गुऱ्हाळाला न्यायचा असतो.काहींचं गव्हाला पाणी पाजायचं काम असतं. तर काही ठिकाणी शिवारात ...